#5मोठ्याबातम्या : पेट्रोल चार रुपयांनी महागण्याची शक्यता

पेट्रोल Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहू या.

1. पेट्रोल चार रुपयांनी महागणार

कर्नाटक निवडणुकीच्या आधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचं ते पूर्ववत मिळण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किंमती चार रुपयांनी वाढवाव्या लागणार आहेत. म्हणून येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलची किंमत चार रुपयांनी वाढणार असल्याची माहिती ब्रोकरेज कंपन्यांनी दिली असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सोमवारपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे.

2. बंगले रिकामे करण्याची माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस

मुख्यमंत्रिपद गेलं तरी बंगले न सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. तरी देखील त्यांनी बंगले रिकामे केले नाहीत, म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं सहा माजी मुख्यमंत्र्यांना बंगले रिकामे करण्याची नोटीस पाठवली आहे.

मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, एन. डी. तिवारी, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह या माजी मुख्यमंत्र्यांनी अद्याप आपले बंगले सोडले नाहीत. या नेत्यांना 15 दिवसांत बंगले रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे, असं वृत्त बिझनेस स्टॅंडर्डनं दिलं आहे.

दरम्यान, मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. ही भेट या बंगल्यासंदर्भात असल्याचं म्हटलं जात आहे.

3. 'आमच्याकडे जास्त आमदार आहेत, आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार'

कर्नाटकमध्ये सर्वाधिक आमदार भाजपकडे आहेत म्हणून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिलं आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली. काँग्रेसतर्फे शुक्रवार हा 'लोकशाही वाचवा दिन' म्हणून पाळण्यात येणार असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

बिहार, मणिपूर आणि गोव्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य असलेल्या पक्षाला निमंत्रण का देण्यात आलं नाही असा सवाल करण्यात येत आहे.

'बिहारमध्ये आमच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळं आम्ही सत्तास्थापनेसाठी दावा करणार,' असं लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

गोव्यातील काँग्रेसचे आमदार देखील सत्तास्थापनेसाठी आंदोलन करणार आहेत.

4. पुण्यातील एका विद्यापीठातकुलगुरूंची डिग्रीच बोगस

शिक्षण क्षेत्रात बोगस पदव्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा असते. त्यातच पुण्यातील एका खासदी विद्यापीठाच्या कुलगुरुंची पीएचडी बोगस असल्याची धक्कादायक बातमी लोकमतनं दिली आहे.

स्पायसर विद्यापीठाचे कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले यांची पीएचडी बोगस असल्याचे पोलीस तपासणीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी त्यांच्यासह दोन प्राध्यापकांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बनावट पदव्या मिळवून देणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

5. फेसबुकने केली 58 कोटी फेक अकाउंट डीलिट

Image copyright Getty Images

फेसबुकनं 58.3 कोटी फेक अकाउंट डीलिट केली असल्याचं सांगितलं आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

फेसबुवकवर मार्क झुकरबर्गनंही यासंदर्भात स्वतः काही माहिती दिली आहे.

समाजात तेढ वाढवणाऱ्या, हिंसात्मक, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कोट्यवधी पोस्ट गेल्या महिन्यात आम्ही डीलिट केल्या आहेत, असं झुकरबर्ग म्हणाले आहेत.

फेसबुकनं ट्रान्सपरन्सी रिपोर्ट रीलिज केला आहे. त्यामध्ये ही माहिती वाचायला मिळेल असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)