गाझा पट्टी: निर्बंध आणि संघर्षात अडकलेलं मानवी आयुष्य

एका पॅलेस्टिनियन मुलाची माता Image copyright Reuters

गेल्या तीन दिवसांपासून इस्रायल आणि कट्टरवाद्यांमध्ये वाढलेल्या तणावानंतर गाझा पट्टीत पुन्हा संघर्ष पेटला आहे.

या परिसरात एवढा तीव्र संघर्ष शेवटचा जुलै-ऑगस्ट 2014 मध्ये पाहायला मिळाला होता. याची सुरुवात शुक्रवारी झाली जेव्हा गाझा पट्टीवरील निर्बंधांविरुद्ध निदर्शनं सुरू झाली. कट्टरवाद्यांपर्यंत शस्त्रास्त्रं पोहोचू न देण्यासाठी हे निर्बंध महत्त्वाचे आहेत, असं इस्रायलला वाटतं.

निदर्शनांदरम्यान एका पॅलेस्टिनियन कट्टरवाद्याने दोन इस्रायली सैनिकांवर गोळीबार केला. याचा प्रतिकार करताना इस्रायलने एक हवाई हल्ला करून दोन कट्टरवाद्यांना संपवलं.

इथेच ठिणगी पडली आणि त्यातून सध्याचा संघर्ष सुरू आहे. यात आतापर्यंत किमान चार इस्रायली आणि 23 पॅलेस्टिनियन लोकांचा मृत्यू झाला आहे.

पण काय आहे गाजा पट्टीचा संघर्ष? आणि कसं आहे या बंदिस्त क्षेत्रातली जीवनशैली?

गाजा संघर्षाचा इतिहास

गाझा पट्टी 41 किमी लांब आहे आणि 10 किमी रुंद आहे. या पट्ट्यात साधारण 19 कोटी लोक राहतात. भूमध्य सागर, इस्रायल आणि इजिप्तनं या भागाला वेढलं आहे.

गाझा पट्टीवर आधी इजिप्तचा ताबा होता. 1967 सालच्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलनं या भागावर ताबा मिळवला. आणि इस्रायलनं 2005मध्ये या भागातून आपलं सैन्य आणि जवळपास 7,000 लोकांना मागे घेतलं.

Image copyright UN OCHA
प्रतिमा मथळा गाझा परिसर

हा प्रदेश पॅलेस्टिनियन प्रशासनाच्या ताब्यात आहे. पण 2007 ते 2014च्या काळात हा भाग हमास या कट्टरवादी संघटनेनं बळकावला होता. 2006मध्ये पॅलेस्टिनियन विधिमंडळाच्या निवडणुका हमासनं जिंकल्या. पण फताह या गटाबरोबर त्यांचं वैमनस्य अगदी हिंसाचाराच्या पातळीवर होतं.

जेव्हा हमासनं या भागावर ताबा मिळवला तेव्हा इस्रायलनं या भागावर लागलीच बंधनं घातली. वस्तू आणि लोकांची ने-आण बंद करण्यात आली. त्याचवेळी इजिप्तनं गाझाच्या दक्षिण सीमेवर नाकाबंदी केली.

हमास आणि इस्रायल यांच्यात 2014मध्ये मोठा संघर्ष झाला. गाझामधून होणारे रॉकेट हल्ले थांबवण्याचा प्रयत्न इस्रायल करत होता तर कट्टरवादी हमास त्यांच्यावरील बंधनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते.

स्वातंत्र्याची चळवळ

2013च्या मध्यानंतर इजिप्तनं गाझासोबतच्या राफा सीमेवर तस्करीवर बंदी आणली. या तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या सीमा ओलांडणारी भुयारं शोधण्यात आली होती. त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या गाझा भागात प्रवेश करणं कठीण झालं.

ऑक्टोबर 2014 पासून इजिप्तनं या सीमेचं उत्तमरीत्या रक्षण केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ती उघडली जाते.

Image copyright Getty Images

संयुक्त राष्ट्रांच्या Office for the Coordination of Humanitarian Affairs (OCHA) नं जाहीर केलेल्या एका अहवालानुसार एप्रिल 2018पर्यंत राफा सीमा 17 दिवसांसाठी उघडली गेली होती. या काळात केवळ 23,000 नोंदणीकृत लोकांनी सीमापार केली आहे किंवा करण्याची वाट पाहत आहेत.

गाझा पट्टीच्या उत्तरेत इस्रायलच्या इरेझ भागात प्रवेश करणाऱ्यांची संख्या 2017च्या तुलनेत या वर्षी थोडी वाढली आहे. मात्र निर्बंधांच्या आधी होता तेवढा वावर आता नक्कीच नाही.

2017च्या पूर्वार्धात 240 पेक्षा कमीच पॅलेस्टिनी लोकांनी गाझापट्टी सोडली आहे. सप्टेंबर 2000 मध्ये हेच प्रमाण दिवसाला साधारण 26,000 होतं.

अर्थव्यवस्था

1990 पेक्षा जास्त गरिबी सध्या गाझामध्ये पाहायला मिळते. जागतिक बॅंकेच्या एका अहवालानुसार गाझाच्या अर्थव्यवस्थेत 2017मध्ये केवळ 0.5 टक्क्यांनी वाढ झाली होती.

1994मध्ये गाझाचं दरडोई वार्षिक उत्पन्न 2,659 डॉलर होतं, जे 2018मध्ये 1,826 डॉलरवर आलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इजिप्तच्या सीमेखाली शस्त्रास्त्रं आणण्यासाठी एक बोगदा खोदण्यात आला होता.

याच अहवालानुसार बेरोजगारीचं सर्वाधिक प्रमाण गाझात असल्याचं म्हटलं आहे. वेस्ट बॅंकेच्या तुलनेत गाझातलं बेरोजगारीचं प्रमाण दुप्पट म्हणजेच 44 टक्के आहे.

त्यातही चिंतेची बाब म्हणजे युवकांच्या बेरोजगारीचं प्रमाण 60 टक्के आहे.

ताज्या आकडेवारीनुसार वेस्ट बॅंकच्या तुलनेत गाझात दुप्पट दारिद्र्य आहे, म्हणजेच 39 टक्के. संयुक्त राष्ट्रांच्या रिलीफ अॅंड वर्क एजन्सीनं जर त्यांना सहाय्य केलं नसतं तर हे प्रमाण याहून अधिक राहिलं असतं.

गाझातली 80 टक्के लोकसंख्या ही संयुक्त राष्ट्रांकडून मिळणाऱ्या सहाय्यता निधीवर अवलंबून आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

शिक्षण

गाझाची शैक्षणिक व्यवस्था धोक्यात आहे. United Nations Relief and Works Agency for Palestine Refugees in the Near East अर्थात UNRWA च्या मते 94% शाळा या डबल शिफ्ट व्यवस्थेत चालतात. म्हणजे काही विद्यार्थी सकाळी शाळेत येतात आणि काही विद्यार्थी संध्याकाळी.

Image copyright AFP/Getty
प्रतिमा मथळा संयुक्त राष्ट्रातर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळेत अनेक विद्यार्थी जातात.

UNRWA या भागात 250 शाळा चालवते. त्यामुळे साक्षरतेचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण ज्या शाळा संयुक्त राष्ट्रांतर्फे चालवल्या जात नाही त्यांना या संघर्षाचा धक्का बसला आहे.

2014च्या संघर्षाचा परिणाम 547 शाळा, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयांवर झाला आहे. त्यापैकी काही शाळा अजूनही पूर्वपदावर आलेल्या नाहीत.

यामुळे आता वर्गाचा आकार वाढला आहे. 2017 साली एका वर्गात 40 विद्यार्थी बसत होते, असं संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल सांगतो.

UN Fund for Population Activities (UNFPA)च्या अंदाजाप्रमाणे 2015 साली गाझामध्ये 6.3 लाख विद्यार्थी होते आणि 2030 पर्यंत ही संख्या 12 लाख होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ या पट्ट्यात आणखी 900 शाळा आणि 23000 अतिरिक्त शिक्षकांची गरज आहे.

लोकसंख्या

जगातल्या सगळ्यांत दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक गाझापट्टी आहे. इथे प्रतिचौरसकिलोमीटर क्षेत्रात 5,479 लोक राहतात. 2020पर्यंत एवढ्याच क्षेत्रफळात 6,197 लोक राहत असतील.

Image copyright UN OCHA
प्रतिमा मथळा गाझाची तरूण लोकसंख्या.

या भागात राहणाऱ्या लोकांची संख्या या दशकाच्या अखेरीस 22 लाख पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तसंच 2030 पर्यंत ही संख्या 31 लाख होण्याची शक्यता आहे.

गाझा पट्टीत तरुणांची संख्या जास्त आहे. इथल्या जवळपास 40 टक्के लोकांचं वय 15 वर्षांपर्यंत आहे.

Image copyright UN OCHA
प्रतिमा मथळा लोकसंख्या.

इस्रायलनं 2014पासून सीमेवर स्वतःच्या बचावासाठी एक बफर झोन तयार केला आहे. या झोनमुळे गाझामधल्या लोकांना राहण्यासाठी आणि शेतीसाठी आणखी कमी जागा उरली आहे.

आरोग्य

सीमेवरच्या निर्बंधांमुळे गाझामधली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.

राफा सीमा बंद केल्यामुळे इजिप्तला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार 2014च्या आधी इजिप्तमध्ये उपचारासाठी एका महिन्यात सरासरी 4,000 लोक जात असत.

Image copyright AFP/Getty
प्रतिमा मथळा वीज आणि इंधनाच्या कमतरतेमुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

नाकाबंदीनंतर गाझा पट्टीतल्या लोकांना इजिप्तला उपचारासाठी इस्रायलमार्गे जावं लागतं. पण वैद्यकीय कारणांसाठी इजिप्तकडून मिळणाऱ्या परवानग्यांचं प्रमाणही 2012च्या 54 टक्क्यांवरून 2017 मध्ये 97 टक्क्यांवर आलं आहे.

नाकाबंदीमुळे औषधं, दैनंदिन गरजेच्या वस्तू, यंत्रं यांचा वाहतुकीवरसुद्धा परिणाम झाला आहे. त्यात डायलिसिस मशिन आणि हार्ट मॉनिटर मशिन मिळणंही अवघड झालं.

शिक्षणाप्रमाणेच संयुक्त राष्ट्र 22 आरोग्य सुविधा केंद्र चालवण्यात मदत करतं. पण इस्रायलबरोबरच्या संघर्षात अनेक रुग्णालयांचं नुकसान झालं आहे. 2000 पासून प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या 56 हून 49 वर आली आहे. याच काळात लोकसंख्या दुपटीनं वाढली आहे.

इलेक्ट्रिक जनरेटरसाठी लागणाऱ्या इंधनाच्या अभावामुळे वैद्यकीय सोयींवर परिणाम झाला आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते तीन रुग्णालयं आणि दहा वैद्यकीय केंद्र बंद पडली आहेत.

अन्न

गाझा पट्ट्यातल्या लोकांना अन्नपाण्याच्या सुविधा मिळतात तरी लक्षावधी किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे.

शेतजमिनी आणि मत्स्यव्यवसायावर इस्रायलनं घातलेल्या बंधनांमुळे आव्हानांमध्ये वाढ झाली आहे.

इस्रायलनं जाहीर केलेल्या बफर झोनमध्ये 1.5 किमीच्या पट्ट्यात गाझामधल्या लोकांना शेती करता येत नाही. त्यामुळे दरवर्षी त्यांना 75000 टन इतका तुटवडा सहन करावा लागतो.

Image copyright AFP/GETTY
प्रतिमा मथळा काही काळापूर्वी गाझामध्ये मत्स्यव्यवसाय सुरू होता.

ज्या भागात बंधनं घातली आहेत तोच भाग सगळ्यात जास्त सुपीक आहे. त्यामुळे शेत क्षेत्रातल्या जीडीपीचं प्रमाण 1994 मध्ये 11 टक्के होतं. 2018मध्ये ही टक्केवारी 5 टक्के झाली आहे.

इस्रायलनं मासेमारीवरसुद्धा बंधनं घातली आहेत. किनाऱ्यावरील एका विशिष्ट भागापर्यंतच मासेमारी करता येते. संयुक्त राष्ट्राच्या मते समजा मासेमारीवरील बंदी उठवली तर गाझातल्या लोकांना रोजगार तर मिळेलच, त्याबरोबर प्रोटिन्ससुद्धा मिळेल.

2012मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनुसार मासेमारीची मर्यादा 3 नॉटिकल माईलपासून 6 नॉटिकल माईलपर्यंत वाढवण्यात आली होती.

पण गाझा भागातून झालेल्या रॉकेटच्या माऱ्यामुळे ही मर्यादा पुन्हा 3 नॉटिकल माईल करण्यात आली होती. या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या पॅलेस्टिनी फिशिंग बोटवर इस्राईलचं नौदल गोळीबार करतं.

वीज

गाझा पट्टयात वीज जाणं हे रोजचंच आहे. तिथं सरासरी 3 ते 6 तास वीज असते.

या पट्ट्यात मुख्यत: वीज इस्रायलकडून मिळते. गाझाचा स्वतःचा सुद्धा एक वीज प्रकल्प आहे. त्यात थोडासा वाटा इजिप्तचा आहे. पण जितकी वीज हवी त्याच्या एक तृतियांशापेक्षा ती कमी आहे असं जागतिक बँकेचं म्हणणं आहे.

गाझा वीज प्रकल्प आणि वीज जनरेटरसुद्धा डिझेलवर चालतात आणि इथं डिझेल अतिशय महाग आहे.

Image copyright AFP/Getty
प्रतिमा मथळा वीज जाणं हे इथे रोजचंच आहे.

बाहेरच्या भागात एक गॅस प्रकल्प आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते या गॅस प्रकल्पामुळे वीजेची गरज पूर्ण होऊ शकते.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार हा प्रकल्प पुन्हा गॅसवर चालवला तर हजारो डॉलर्स वाचतील आणि त्यातून निघणारे आऊटपूट सुद्धा वाढेल.

पाणी आणि स्वच्छता

गाझामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि तसंच गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत देखील नाही. जमिनीतून उपसा करता येईल इतकं पाणी देखील जमिनीत मुरलेलं नाही. काही ठिकाणी बोअर आहेत पण लोकांची गरज भागेल इतका मोठा पाणी साठा इथं उपलब्ध नाही.

गाझातल्या बहुतांश घरांमध्ये नळ जोडणी आहे, पण जागतिक बॅंकेचं म्हणणं आहे की पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही. तसंच पाण्याची गुणवत्ता समाधानकारक नसते. गाझामध्ये काही घरांना टॅंकरनं पाणी पुरवठा केला जातो.

Image copyright AFP/Getty

दुसरा प्रश्न आहे सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा. 78 टक्के घरं ही सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थेशी जोडली गेली आहेत. पण ट्रिटमेंट प्लॅंटची स्थिती दयनीय आहे.

हे प्लॅंट ओव्हरलोड होतात. अंदाजे 90 दशलक्ष लीटर सांडपाणी ( काही प्रमाणात शुद्ध केलेलं ) हे मेडिटेरेनियन समुद्र आणि खुल्या तलावात सोडलं जातं. याचाच अर्थ असा आहे की गाझातलं 95 टक्के भूमिगत पाणी हे प्रदूषित आहे.

सांडपाणी रस्त्यांवर वाहण्याचा देखील धोका आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)