कर्नाटक : उद्या दुपारी 4 वाजता 'विधान सौध'मध्ये काय होणार?

कर्नाटक विधान सौध Image copyright Getty Images

सुप्रीम कोर्टानं शनिवारी दुपारी 4 वाजता येडियुरप्पा सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. कशी असेल ही प्रक्रिया?

1. विधिमंडळाचे सचिव सगळ्यांत आधी सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून आलेल्या ज्येष्ठ सदस्याचा शोध घेतील.

2. त्या सदस्याचं नाव हंगामी सभापती म्हणून राज्यपालांना कळवण्यात येईल. राज्यपाल त्या सदस्यास हंगामी सभापतीपदाची शपथ देतील.

3. हंगामी सभापती त्यानंतर विधिमंडळाच्या सचिवांना, सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शपथविधीसाठी विधानसभेत उपस्थित राहण्यास कळवावे असे आदेश देतील.

4. नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी बराच काळ चालेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं दिलेली दुपारी 4 वाजताची डेडलाइन पाळणं शक्य होणार नाही. त्यासंदर्भात, कर्नाटक विधानसभेचे माजी सभापती के. आर. रमेशकुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "अशा परिस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. पण वेळेबाबत शब्दश: अर्थ घेतला जात नाही."

5. सदस्यांचा शपथविधी झाल्यावर दोन पर्याय उरतात.

अ.) हंगामी सभापतींनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावं. ब.) सभापतींची निवड करावी.

6. मतदान सुरू होईल तेव्हा प्रथम आवाजी मतदान घेतलं जाईल. त्यानंतर जर मतविभागणीची मागणी झाली तर, कोरम बेल वाजवण्यात येईल. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद केले जातील. मग आमदारांना उभं राहण्यास सांगून मतमोजणी केली जाईल.

7. ही प्रक्रिया झाल्यावर सभापती निकाल जाहीर करतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)