या 5 कारणांमुळे मुंबई इंडियन्सचं IPL मधून पॅकअप झालं

  • पराग फाटक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स, आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कर्णधार आणि मुख्य फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना रोहित शर्माला अपयश आले.

इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा गतविजेता मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या हंगामात लीग राउंड अर्थात प्राथमिक फेरीतच बाहेर पडला.

मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017 अशी तीन वर्षं IPLच्या चषकवर आपलं नाव कोरलं आहे. मात्र यंदा धडपडत ढेपाळत खेळणाऱ्या मुंबईला आपली जादू दाखवता आली नाही. काय आहेत मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीतूनच बाहेर पडण्याची कारणं?

1. रो'हिट' नाही

कर्णधार रोहित शर्माला सूर न गवसणं हे मुंबई इंडियन्ससाठी IPLच्या अकराव्या हंगामात प्लेऑफ अर्थात बाद फेरीत न जाण्याचं प्रमुख कारण आहे.

रोहित शर्माची बॅट तळपणं आणि मुंबई इंडियन्स विजयपथावर असणं या दोन गोष्टी समानार्थी म्हणाव्यात अशा आहेत. यंदाच्या हंगामात सुरुवातीला ओपनिंगला येणारा रोहित नंतर मिडल ऑर्डरमध्ये खेळायला लागला. मात्र ज्या शैली आणि कलात्मकतेसाठी रोहित ओळखला जातो ते हरवल्यासारखं वाटलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रोहित शर्माला सूर न गवसणं मुंबई इंडियन्सच्या पॅकअपचं प्रमुख कारण ठरलं.

"रोहित शर्मा हा वनडे आणि ट्वेन्टी-20तला अव्वल बॅट्समन आहे. ओपनर म्हणून खेळताना त्याच्या नावावर अचंबित करणारे विक्रम आहेत. असं असताना रोहित मुंबई इंडियन्ससाठी सगळ्या सामन्यात ओपनिंग करत नाही हे चकित करणारं आहे," असं माजी खेळाडू आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी म्हणाले.

IPLच्या दहा हंगामात रोहितने दरवर्षी 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र यंदाच्या हंगामात त्याने खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये 15, 11, 18, 94, 0, 2, 56, 0, 24, 11, 36, 0, 6, 13 रन्स काढले. म्हणजे 14 सामने मिळून 286 धावा केल्या. ही आकडेवारी ट्वेन्टी-20 स्पेशलिस्ट रोहितच्या लौकिकाला साजेशी नाही.

रोहितचा फॉर्म ढेपाळत असताना मधल्या फळीतील बॅट्समननी साथ न दिल्याने मुंबईवर बाद फेरीतूनच परतण्याची वेळ ओढवली.

"रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा हुकूमी एक्का आहे. यंदाच्या हंगामात त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. रोहितची कामगिरी चांगली होत नसताना बाकी बॅट्समन विशेषत: मधल्या फळीतील बॅट्समनला आपली कामगिरी उंचावता आली नाही," असं माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू नीलेश कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

2. विदेशी बार फुसका

IPL स्पर्धेत एका संघाला एका मॅचमध्ये चार विदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी असते. यंदाच्या हंगामात विदेशी खेळाडूंनी मुंबई इंडियन्सची निराशा केली.

वेस्ट इंडिजचे एल्विन लुईस आणि किरेन पोलार्ड, दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी, बांगलादेशचा मुस्ताफिझूर रहमान, ऑस्ट्रेलियाचा बेन कटिंग यापैकी कोणीही संघाच्या विजयात हातभार लावू शकले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कीरेन पोलार्ड

वर्षानुवर्षं मुंबईच्या ताफ्यात असणाऱ्या पोलार्डला सुरुवातीच्या सामन्यांनंतर संघातून डच्चू देण्याची वेळ ओढवली.

गेल्या हंगामानंतर मुंबईने जोस बटलर, लेंडल सिमन्स, टिम साऊदी या फॉर्मात असलेल्या विदेशी खेळाडूंना संघातून काढून टाकलं. हे सगळे प्लेयर्स यंदा दुसऱ्या संघांसाठी चांगली कामगिरी करत आहेत.

3. 'ती' एक ओव्हर

संथ आणि अडखळत सुरुवात ही मुंबई इंडियन्सची अनेक वर्षांची ओळख. हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात गती मिळून विजयपथावर येणं ही मुंबई इंडियन्सची खासियत.

यंदाच्या हंगामात हे पुनरागमनाचं कौशल्य मुंबईला दाखवता आलं नाही. या हंगामात मुंबईला प्लेऑफ गाठता न येण्याचं कारण म्हणजे शेवटच्या ओव्हरमधली सुमार कामगिरी.

20+19 षटके चांगला खेळ करणाऱ्या मुंबईने यंदा अनेक सामने शेवटच्या ओव्हरमध्ये गमावले आहेत. स्वैर बॉलिंग, सोपे कॅचेस सोडणं आणि रन-आउटच्या संधी मिस करणं, अशा बेसिक चुकांमुळे मुंबई इंडियन्सच्या हातातोंडाशी आलेले विजय प्रतिस्पर्धी संघाने हिरावून घेतले आहेत.

"डेथ बॉलिंग अर्थात शेवटच्या ओव्हर्समध्ये कर्णधार रोहित शर्माकडे जसप्रीत बुमराह हा एकच भरवशाचा पर्याय होता. अशा परिस्थितीत कर्णधाराला निर्णय घेताना मर्यादा येतात," असं निरीक्षण नीलेश कुलकर्णी यांनी नोंदवलं.

4. फिरकीचा मामला सैल

आशिया उपखंडातल्या खेळपट्ट्या फिरकी अर्थात स्पिनसाठी ओळखल्या जातात. मुंबई इंडियन्सने मॅचविनर असा स्पिनरच ताफ्यात समाविष्ट केला नाही.

सरप्राईज पॅकेज म्हणून मुंबईने नवख्या मकरंद मार्कंडेय या स्पिनरला संघात घेतलं. पहिल्या तीन सामन्यात 10 विकेट घेत मकरंदने दमदार सुरुवात केली. मात्र लवकरच प्रतिस्पर्धी संघांना मकरंदच्या बॉलिंगमधलं मर्म उमगलं. याचाच परिणाम म्हणून मकरंदच्या बॉलिंगवर सहजपणे रन्स होताना दिसल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शेवटच्या षटकांमध्ये धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं अशा दोन्ही आघाड्यांची जबाबदारी जसप्रीत बुमराहने एकट्यानेच सांभाळली.

कृणाल पंड्याच्या कामचलाऊ फिरकीच्या बळावर मुंबईने किल्ला लढवला.

गेल्या हंगामांनंतर अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग आणि करण शर्मा यांना बाजूला करण्याची चूक मुंबईला महागात पडली.

याबाबत सुलक्षण कुलकर्णी सांगतात, "एक बॉलिंग युनिट म्हणून मुंबई इंडियन्सच्या मर्यादा जाणवल्या. हार्दिक पंड्याने विकेट्स जरूर मिळवल्या मात्र रन्स खूप दिल्या. मुंबई इंडियन्स संघाने ज्या खेळाडूंना सोडून दिलं आहे ते खेळाडू प्रतिस्पर्धी संघांसाठी चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत."

5. वानखेडेच्या बालेकिल्ल्याला भगदाड

IPL संघांसाठी घरचं मैदान प्रेक्षकांचा पाठिंबा आणि परिस्थिती ठाऊक असल्याने निर्णायक असतं. वानखेडेवर मॅच म्हणजे मुंबई इंडियन्सचा विजय हमखास मानला जातो.

मात्र यंदा तसं चित्र दिसलं नाही. यंदाच्या हंगामाची पहिलीच मॅच वानखेडेवर होती. हंगामाची सुरुवात दणक्यात करण्याची संधी मुंबईकडे होती. मात्र चेन्नई सुपर किंग्सने त्यांना चीतपट केलं.

गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या दिल्लीनेही वानखेडेवर मुंबईला नमवण्याची किमया केली.

सुलक्षण कुलकर्णी यांच्या मते मुंबई इंडियन्सच्या कोचिंग ताफ्यात अनेक मातब्बर मंडळी आहेत. मात्र सल्ला देण्यासाठी खूप जण असल्याने नक्की कोणाचं आणि काय ऐकायचं, असा प्रश्न खेळाडूंसमोर पडतो.

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन,

हिजाबमध्ये क्रिकेट खेळतात या काश्मिरी महिला

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)