सोलापूर : 'आठवड्यातून एक दिवस येतं पाणी, त्या दिवशी आम्ही कामावर जात नाही'

SOLAPUR, WATER SHORTAGE Image copyright DATTA THORE
प्रतिमा मथळा पाणी भरण्याच्या कामातून लहान मुलंही नाही सुटत

"सा(सहा) दिवसातनं एक बार पाणी येतं. त्या दिवशी नवरा किंवा मी कामाला नाय जात. सगळा दिस पाण्याचाच," असं घोंगडे वस्तीत राहणाऱ्या उज्ज्वला सुतार सांगतात.

"आधी दारातला बॅरल भरतो. मग घरातल्या घागरी भरून ठेवतो. मग स्टीलची टाकी. आणि मग एक माठ, दोन हंडे, दोन कळशा, दोन बादल्या, एखादं टोपलं, पाण्याच्या २५-२५ बाटल्या, जग, एवढेच काय तांबेसुध्दा भरून ठेवतो. एवढं भरलं की मग पाच दिवस पाण्याची चिंता नाही," अशी त्यांची पाण्याच्या दिवसाची कहाणी.

खरंतर ही कहाणी फक्त उज्ज्वला सुतार यांची किंवा घोंगडे वस्तीची नाही तर अख्ख्या सोलापूर शहराची आहे. शहरातल्या कुठल्याही वस्तीत घराबाहेर पिवळा, पांढरा, निळा नाहीतर काळ्या रंगाचा बॅरल ड्रम दिसतो, ज्यात लोक आपापलं पाणी साठवतात.

सुरुवातीपासून औद्योगिक शहर अशी ओळख राहिलेल्या सोलापूर शहरातल्या बहुतेक सूत गिरण्या आता बंद झाल्या. पण इथं आलेला कामगार वर्ग आता इथंच स्थायिक झालाय. कालांतराने शहर वेडंवाकडं वाढलं आणि काही मूलभूत सोयीसुविधांचं नियोजन मात्र झालं नाही. आणि त्यातूनच उभा राहिलेला एक भीषण प्रश्न, तो म्हणजे पाणी टंचाईचा.

पाण्याच्या दिवशी कामाला खाडा

पाणी टंचाईविषयी बीबीसी मराठीने अनेकांना बोलतं केलं. सगळ्यांचं एकच म्हणणं - महानगरपालिका म्हणते चार दिवसांआड पाणी सोडलं जातं. पण अनेक वस्त्यांमध्ये पाच दिवसांनी पाणी येतं, कुठे सहा दिवसांनी तर कुठे आठ!

Image copyright DATTA THORE
प्रतिमा मथळा घरांच्या बाहेर ड्रमच ड्रम

भवानी पेठेत राहणारे रेणुका आणि बाबू लंगोटे यांच्याकडे दर पाच दिवसात एकदा पाणी येतं.

"पती टेलरिंगचं काम करतात. मीही तंबाखू भरायला कारखान्यात जाते. पण पाण्याच्या दिवशी दोघांचा खाडा होतो. पुढच्या दिवसांसाठी पाणी भरायचं असतं," रेणुका सांगतात.

"लवकर आधी आमची आंघोळ उरकतो. ती सुद्धा त्याच दिवशी मनासारखी करता येते. एरवी एका बादलीत कसंबसं काम चालतं. मग कपडे धुवायचा वारही तोच. हे सगळं झालं की घरातलं प्रत्येक भांडं पाण्याने भरायचं," अशी पाण्याच्या दिवसाची दिनचर्या रेणुका यांनी सांगितली.

दोन खोल्यांच्या त्यांच्या घरात पाण्याची भांडीच जास्त आहेत.

सोलापूर शहराची लोकसंख्या आहे साडे दहा लाख. शहर नियोजनाच्या अभावामुळे यातली साडेचार लाख लोकसंख्या पाणी टंचाईला सामोरी जाते आहे.

स्थानिक प्राध्यापक नवनाथ काळदाते यांनी सोलापूरची परिस्थिती उलगडून सांगितली. "चाळीस टक्के जनता रोजंदारीवर जगणारी आहे. विडी कारखाने, वस्त्रोद्योग आणि MIDC कारखान्यात हे लोक काम करतात. त्यांचा जीवनमान बेताचाच. त्यामुळे महानगरपालिकेच्या नळावर ही छोटी माणसं अवलंबून. म्हणून उन्हाळ्यात ही परिस्थिती दिसते," असं काळदाते यांनी सांगितलं.

मुलांची बुडते शाळा, काहींना पाहुणे नकोत

मड्डी वस्तीतल्या मंगल साळुंखे यांना आता वयामानाने नळावर पूर्वीसारखं पाणी काढणं जमत नाही.

"ड्रम आणि भांड्यातलं पाणी पिण्यासाठी पुरतं. वापरायच्या पाण्याचं काय? त्यामुळे कुणी नातेवाईक येऊच नये, असं वाटतं. येऊ नका असं कळवावं लागतं," मंगलबाई सांगत होत्या.

Image copyright DATTA THORE
प्रतिमा मथळा घरात पाण्याची भांडीच जास्त

अशी कितीतरी उदाहरणं आहेत.

अशोक चौकातले सदाशिव लाटे यांना साप्ताहिक सुटीचा दिवस बदलून घ्यावा लागला. त्यासाठी दुकान मालकाबरोबर त्यांचा वादही झाला. तर जोडभावी पेठेतल्या गिरीष लोका यांना जवळच्या एका लग्नालाही पाण्यामुळे जाता आलं नाही.

पाण्याच्या दिवशी पाणी भरणं हे काम इतकं महत्त्वाचं की अनेक जण मुलांना शाळेलाही पाठवत नाहीत. मुलांची आवरासावर कोण करणार? शिवाय मुलं घरी राहिली तर पाणी भरायला तेवढीच मदत.

पुणा नाका परिसरात राहणाऱ्या भागवत नाटीकर यांनी आम्हाला ही वस्तुस्थिती सांगितली. आणि अवंतीनगरमधल्या लोकमंगल शाळेच्या सहशिक्षिका प्रीती कांबळे यांनी त्याला दुजोरा दिला.

"ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी उपस्थिती निम्म्यावर येते. अनेकदा पालकांना कामावर जाणं गरजेचं असतं. मग मुलांना पाणी भरायला मदतीला थांबवून घेतात," असं कांबळे बाईंनी सांगितलं.

Image copyright DATTA THORE
प्रतिमा मथळा टँकर आला तर अशी उडते झुंबड

'नई जिंदगी'च्या इमरान युनूस सालार यांची समस्या वेगळीच.

"दिवसभर आम्ही कष्टाचं काम करतो. रात्री शांत झोपावं म्हटलं तर आमच्या वस्तीत रात्रीच पाणी येतं. खोली भाड्याने घेतानाही 'पाण्याचं तुमचं तुम्ही बघा', असं सांगूनच सौदा झाला होता," असं सालार सांगतात.

सालार यांनी आता आसपासच्या परिसरात कुठल्या नळाला कधी पाणी येतं याचं संशोधनच केलं आहे, जेणेकरून त्या वेळेत पाणी भरता यावं.

पाण्याचा दुष्काळ की नियोजनाचा अभाव?

खरंतर शहरातल्या कुठल्या भागात कधी पाणी येणार, याचं वेळापत्रक आहे. पण 'हेड टू टेल' जाताना पाणी कधी 'टेल'पर्यंत पोहोचतच नाही. मग भागाच्या शेवटच्या रांगेत घरं असलेल्यांची अडचण होते.

शिवाय मोटारीने पाणी खेचून घेणारे दांडगाईचे लोक असतात. त्यामुळे पाणी आलं तरी सात टक्के लोकांना पाणीच मिळत नाही. अशांची अवस्था अत्यंत वाईट होते.

सोलापुरातील पाण्याचा हा दुष्काळ का?

एक म्हणजे शहरातील अंतर्गत जलवाहिनी निकृष्ट असल्याने पाणीगळती 30 टक्क्यांच्या घरात आहे. असलेल्या पाण्यापैकी 30 टक्के पाणी शहरवासीयांना मिळतच नाही. शिवाय 15 टक्के भागात जलवाहिन्याच पोहोचलेल्या नाहीत.

Image copyright DATTA THORE
प्रतिमा मथळा सोलापूरमध्ये लहान मुलंही पाणी साठवण्याच्या कामात गुंतलेली

दुसरं म्हणजे, शहराच्या गरजेपेक्षा पाणीच कमी येतं. शहरात पाण्याच्या इनकमिंगविषयी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी सांगतात, "शहराच्या पाण्यासाठी तीन स्रोत आहेत. पहिला इंग्रजांनी 1932 साली बांधलेला हिप्परगा तलाव."

"दुसरा स्रोत म्हणजे 1968 साली झालेला टाकळी बंधारा. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत वर्षातून चारदा 5 TMC पाणी सोडलं जातं. ते टाकळी बंधाऱ्यात येतं."

"तिसरा स्रोतही उजनीचा आहे, पण पाईपलाईनचा. सोलापूर शहराला आहे त्या चार दिवसाला एकदा या सूत्राप्रमाणे पाणी द्यायचं म्हंटले तरी दररोज 135 MLD पाणी लागतं. आपण तीन स्रोतांमधून 100 MLD पाणी उचलतो. म्हणजे 35 MLD ची तूट आहे," असं धनशेट्टी यांनी स्पष्ट केलं.

100 MLD पाण्यात 30 टक्के गळती पकडली तर लोकांचे पाण्याचे हाल लक्षात येतात.

ब्रिटिश कालीन पाईपलाईन आता निरुपयोगी

सोलापूरला पाणीपुरवठा करणारी 1932 सालची पाईपलाईन आता पार थकली आहे. अनेक ठिकाणी फुटली आहे, असं शहराचे माजी महापौर पुरणचंद पुंजाल यांनी सांगितलं.

"इतर शहरात कळ दाबली की पाणीपुरवठा सुरू होतो. सोलापूरमध्ये मात्र जुन्या पद्धतीने चाव्या फिरवाव्या लागतात," असं ते सांगतात. थोडक्यात म्हणजे अद्ययावत यंत्रणा आणण्याची गरज असल्याचं पुंजाल यांनी सांगितलं.

उजनी धरणाचा प्रश्न

सोलापूर शहराला मुख्य पाणीपुरवठा उजनी धरणातून होतो. पण तिथला पाणीप्रश्न पूर्वीपासून पेटलेला आहे.

पाणीप्रश्नाचे अभ्यासक एजाज हुसेन मुजावर यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. "पाण्यासाठीची टाकळी योजना अत्यंत अव्यवहार्य आणि पाण्याचा अपव्यय करणारी आहे."

Image copyright DATTA THORE
प्रतिमा मथळा उजनी धरणाचा वाद कायमाच

सोलापूरसाठी उजनी धरणातून 1.5 ते 2 TMC प्रमाणे चार वेळा पाणी सोडलं जातं. ते भीमा नदीमार्गे टाकळी बंधाऱ्यात येतं. पण त्यातील फक्त 0.82 म्हणजे अगदी 1 TMC पाणीही सोलापूरला येत नाही," असं ते सांगतात.

हे पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातले शेतकरी मोटारीने खेचून शेतीला वापरतात, असा त्यांचा आरोप आहे. आणि म्हणूनच या पाण्यावर पहिला अधिकार सोलापूरकरांचा असावा, अशी त्यांची मागणी आहे.

या मागणीवरून पूर्वीही राजकारण आणि आंदोलन झालं आहे.

पाणी टंचाईतून सुटका कशी होणार?

यासाठी पालिका प्रशासनाची भिस्त सध्या नव्या उजनी समांतर योजनेवर आहे.

मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पाणी टंचाई ओळखून उजनी धरणातून समांतर जलवाहिनीला मंजुरी मिळवली आहे. 439 कोटींची ही योजना आहे, ज्यामुळे आपल्याला 110 MLD अतिरिक्त पाणी दररोज मिळेल."

येत्या तीन-चार वर्षांत ही योजना पूर्ण करण्याचा मानस आहे, असंही ते म्हणाले. सध्या मात्र सोलापूरच्या जनतेला पाऊस पडेपर्यंत पुढचे २० दिवस अपुऱ्या पाण्यात कसे काढायचे याची भ्रांत पडली आहे.

(दिल्लीहून बीबीसी मराठी प्रतिनिधी ऋजुता लुकतुके यांच्या माहितीसह)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)