...आणि INS तारिणीच्या 6 समुद्रकन्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून परतल्या

  • प्रमोद आचार्य आणि आरती कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
INSV Tarini

फोटो स्रोत, लौकिक शिलकर

फोटो कॅप्शन,

भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 'तारिणी' च्या पथकाचं स्वागत केलं.

'INSV तारिणी' ही सागरकन्यांची शिडाची बोट गोव्याच्या किनाऱ्यावर येताना नौदलाचे अधिकारी दुर्बिणीतून पाहत होते. त्यांच्या बोटीचा माग घेत नौदलाचं हेलिकॉप्टरही आकाशात भिरभिरत होतं. भारतीय नौदलासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण येऊन ठेपला होता.

तारिणीच्या टीमची बोट जेव्हा किनाऱ्याला लागली तेव्हा भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं. एवढं कौतुक का, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आठवण करून देऊया - नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी या शिडाच्या बोटीतून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे!

या टीमचं नेतृत्व करत होत्या कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, तर त्यांच्या सोबत होत्या लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता.

ऑक्टोबरमध्ये गोव्याहून निघाल्यानंतर या टीमने 28 हजार सागरी मैलांचं अंतर पार केलं. त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, फॉ़कलंड या देशांमधून प्रवास केला. या प्रवासात त्यांनी अरबी समुद्र, प्रशांत महासागर आणि दक्षिणेकडचा महासागर पार केला. त्यांनी दोन वेळा विषुववृत्तही पार केलं आहे.

फोटो स्रोत, Indian Navy

फोटो कॅप्शन,

'INSV तारिणी'च्या टीमचं मायदेशात व्हेल शार्क माशाने असं स्वागत केलं.

ऑस्ट्रेलियामधलं फ्री मँटल, तिथून न्यूझीलंडमधलं लिटलटन, मग फॉकलंड बेटांवरचं पोर्ट स्टॅनली आणि अखेरीस दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनचा टप्पा पार करून त्या गोव्यात INS मांडवी या नौदलाच्या तळावर दाखल झाल्या.

"ही पृथ्वीपरिक्रमा म्हणजे स्त्रीशक्तीचा आविष्कार आहे," असे उद्गार कॅप्टन वर्तिका जोशी यांनी काढले. "महिला कसं जग सर करू शकतात हे तर जगाला दिसलंच. त्याच बरोबर भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' शक्तीचा आविष्कार आहे," असं कॅप्टन वर्तिका म्हणाल्या.

INSV तारिणी ही 14.4 मीटर लांबीची बोट पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे.

"या महिला अधिकाऱ्यांनी रचलेला इतिहास हा फक्त महिलांसाठीच नव्हे तर तरुण पिढीला स्फूर्ती देणारा आहे," अशा शब्दांत भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. नौदलप्रमुख सुनील लांबा यांनीही या पथकाचा यथोचित सत्कार केला.

फोटो स्रोत, Indian Navy

फोटो कॅप्शन,

'INSV तारिणी'च्या टीमचा जगाच्या सफरीदरम्यानचा एक क्षण

लेफ्टनंट कमांडर पी स्वाती सांगते, ''फॉकलंड आयलंडपासून न्यूझीलंडपर्यंतचा आमचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. या प्रवासात आम्ही अनेक वादळांचा सामना केला. ती मोठमोठी चक्रीवादळं होती. त्यात 10-10 मीटरच्या उंचच उंच लाटा फुटायच्या. अशा वेळी बोट 180 कोनात उलटीसुलटी फिरायची. या लाटांच्या तडाख्यातून सावरून बोट पुढे न्यावी लागायची. पण एकीकडे स्टीअरिंगचा ताबा घ्यायचा आणि दुसरीकडे दिशा चुकू द्यायची नाही, ही आमची खूप मोठी कसोटी होती. पण सगळ्या वादळांमधून आम्ही सहीसलामत बाहेर पडलो."

'तारिणी'च्या या टीमने विषुववृत्त आणि अंटार्क्टिका यामधून प्रवास केला. दक्षिण महासागरातून प्रवास करताना गोठवणाऱ्या थंडीशी सामना करणंही सोपं नव्हतं.

पण ही साहसी मोहीम पूर्ण करताना त्यांनी समुद्री संशोधनातही योगदान दिलं आहे. या संशोधनासाठी महत्त्वाचा डाटा त्यांनी या मोहिमेत एकत्र केला. हे सगळं करत असताना समुद्र सफरीचा पूर्ण आनंदही घेतला.

लेफ्टनंट पायल गुप्ता गोव्यात पोहोचल्यावर खूपच भावनिक झाली होती. ती म्हणते, "भारताच्या बाहेर जाऊनही आम्हाला कधीच परकं वाटलं नाही. जगभरातल्या भारतीय लोकांनी आम्ही जाऊ तिथे आमचं स्वागत केलं. दिवाळी, होळी अशा सणांच्या वेळी आम्ही समुद्रात असलो तरी किनाऱ्यावर गेलं की हे सण साजरे व्हायचे. त्यावेळी भारतीय साता समुद्रापार कसे पोहोचले आहेत त्याची जाणीव व्हायची."

फोटो स्रोत, Indian Navy

फोटो कॅप्शन,

'INSV तारिणी' ची समुद्रसफर

भारतीय नौदलाच्या 'ओशन सेलिंग नोड' या विभागाने याआधीही अशा सागर परिक्रमाचं आयोजन केलं होतं. पण पूर्णपणे महिलांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केल्याने आता त्यांना पुढच्या मोहिमा खुणावत आहेत.

'INSV तारिणी'च्या या महिला अधिकाऱ्यांनी या बोटीवरून त्यांचे अनुभव 'बीबीसी मराठी' ला सांगितले होते. ही मोहीम सुरू होण्याआधीची जय्यत तयारी, मग गोव्याहून प्रयाण आणि नंतर विषुववृत्त पार केल्यानंतरचं सेलिब्रेशन हे सगळे क्षण त्यांनी शेअर केले.

त्यांचा हा नऊ महिन्यांचा हा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे, असं या मोहिमेचे जनक निवृत्त व्हाइस अॅडमिरल मनोहर औटी यांनी सांगितलं.

"तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे समुद्राला माहीत नसतं. त्यामुळेच आम्हाला ही मोहीम आमच्यासाठी अजिबात वेगळी वाटत नाही," असं तारिणीची बोट किनाऱ्यावर येतानाचं दृश्यं पाहताना लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीचे हे उद्गार पुन्हा पुन्हा आठवत राहतात.

व्हीडिओ कॅप्शन,

भारतीय नौसेना: महिला अधिकारी निघाल्या आहेत जगभ्रमंतीला

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)