'मी 14 वर्षांचा होतो तेव्हा धर्मगुरूनं माझ्यावर बलात्कार केला'
- आमीर पीरझादा
- बीबीसी प्रतिनिधी
पाहा व्हीडिओ : 'मी १४ वर्षांचा होतो, जेव्हा त्यांनी माझ्यावर बलात्कार केला'
काश्मीरमधल्या 31 वर्षांच्या एका तरुणानं आपल्यावर झालेल्या बलात्काराबद्दल गेल्या 14 वर्षांत कुणालाच सांगितलं नव्हतं. आपली ओळख न सांगण्याच्या अटीवर त्यानं बीबीसीच्या आमीर पीरझादा यांना आपली व्यथा सांगितली -
माझ्या काकांना व्यापारात मोठा तोटा झाला होता. काही मदत होईल म्हणून ते धर्मगुरूकडे गेले होते. सोबत ते मलाही आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन गेले होते. मी तेव्हा 14 वर्षांचा असेन.
त्या गुरूनं सांगितलं की त्याच्याकडे असलेलं जिन (मंतरलेले द्रव्य) पाजलं की सगळ्या अडचणी दूर होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ते फक्त 10-14 वर्षांच्या मुलाशीच बोलतात.
ज्या दिवशी आम्ही त्या धर्मगुरूला भेटलो, तेव्हा त्यानं माझ्या काकांना मला तिथेच ठेवून घेण्याची विनंती केली. त्याच्याकडे असलेल्या जिनचा प्रभाव फक्त रात्रीच होतो, असं त्यानं काकांना सांगितलं.
मग त्याने माझ्यावर बलात्कार केला.
असं एका वर्षांत तीनदा माझ्यावर बलात्कार झाला. माझ्या नात्यातल्या कुणालाही हे माहिती नव्हतं. कुणाकडे याबद्दल वाच्यताही करायची मला भीती वाटत होती. मी आता अडकलोय याची मला कल्पना आली.
दोन आठवडे मला इतक्या वेदना होत होत्या की मला चालता येत नव्हतं. माझ्याबरोबर काहीतरी भीषण घडलंय हे माझ्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबीयांना कळलं नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे.
बलात्कार: एक काळिमा
मुलांबरोबर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची फारशी दखल घेतली जात नाही, कारण त्यांना काळिमा लागण्याची भीती असते.
मानसशास्त्रज्ञ उफ्रा मीर सांगतात, "स्त्रियांसाठी जसे काही नियम आहेत, तसं समाजाने पुरुषांसाठीसुद्धा काही नियम आखून दिले आहेत. पुरुषांबरोबर झालेला लैंगिक अत्याचार हा लांच्छनास्पद मानला जातो. पुरुषांसाठी जे नियम आहेत त्यानुसार पुरुष हा स्वतंत्र, संयमित असावा आणि त्याने पीडित होऊ नये, अशी समाजाची अपेक्षा असते."
काश्मीरमध्ये राहणारा हा पीडित सुद्धा अपराधीपणाची भावना उराशी बाळगून होता. "यात माझी काही चूक नाही, मग आपण याबद्दल का बोलू शकत नाही, हा प्रश्न मनात यायला मला 14 वर्षं लागली," तो तरुण सांगतो.
"मला खरंच असं वाटतं की लहान मुलांना स्वत:ची सुरक्षा कशी करावी, हे सांगण्याची काहीतरी व्यवस्था आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतच असावी. त्यामुळे आपली अशी काही छळवणूक झाली तर त्याला कसं तोंड द्यायचं, हे समजेल," तो सांगतो.
त्या धर्मगुरूविरोधात काही तरुणांनी तक्रार केल्यानंतर हा पीडित तरुण समोर आला आहे. आता तो इतरांसोबत हा खटला लढतोय.
"14 वर्षांनंतर एक दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याला मी टीव्हीवर बोलताना ऐकलं. या धर्मगुरूविषयी कुणालाही कुठली तक्रारी असेल तर समोर येण्याचं आवाहन त्या पोलीस अधिकाऱ्याने केलं. तेव्हा या व्यक्तीविरुद्ध आणखी खटले सुरू आहेत, असं मला कळलं."
बालपणी बलात्कार झालेली ही व्यक्ती आता एक बालहक्क कार्यकर्ता आहे. बाललैंगिक अत्याचारांप्रकरणी तो लढा देतो आणि वाचा फोडायला मदत करतो.
त्याला अपेक्षा आहे की येत्या काही काळात बाललैंगिक अत्याचाराला तोंड देण्यासाठी ठोस कायदे असतील आणि शिक्षणव्यवस्थासुद्धा त्यासाठी अनुकूल असेल.
शिक्षा खरंच पुरेशी?
तज्ज्ञांच्या मते बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुरेशी व्यासपीठं उपलब्ध नाहीत. आणि हा फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक छळसुद्धा असतो. त्यामुळे ते आतून अगदी कोसळून जातात.
2002 साली जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली की मुलं आणि पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांकडे दुर्लक्ष झालंय आणि ही एक गंभीर समस्या आहे.
भारतात दर पंधरा मिनिटाला एका मुलावर लैंगिक अत्याचार होतो. 2016 साली 36,022 बाललैंगिक अत्याचाराची प्रकरणं नोंदवली गेली.
"बाललैंगिक अत्याचाराबद्दल लोक बोलायला कचरतात आणि पीडित व्यक्ती मुलगा असेल तर आणखीच कचरतात. म्हणूनच अनेक खटले दुर्लक्षित राहतात," असं काश्मीर विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक यासिर अब्बास सांगतात.
12 वर्षांखालील मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची घोषणा सरकारने मागच्या महिन्यात केली होती. पीडित 16 वर्षांखालील असेल तर किमान शिक्षेची मर्यादासुद्धा वाढवली आहे.
कठुआ आणि उनाव प्रकरणं ज्या पद्धतीने हाताळली गेली, त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठली होती. म्हणून सरकारने कायद्यात हे बदल तातडीने केले.
सध्या मुलांवर बलात्कारासाठी 10 वर्षं तर मुलींवर बलात्कारासाठी 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. पण 'रॉयटर्स' वृत्तसंस्थेनुसार या नवीन बदलातही पुरुष पीडित व्यक्तींसाठी कुठलीही तरतूद नाही.
"या वटहुकुमामुळे बलात्काराच्या शिक्षेत वाढ झाली. पण मूळ कायदाच जेंडर न्युट्रल नाही. त्यामुळे सामान्य गुन्हेगारी कायद्यानुसार मुलावरचा बलात्करा अजूनही बलात्कार मानला जाणार नाही. त्यामुळे बलात्कारासाठी ज्या कठोर शिक्षेची तरतूद केली जात आहे, ती मुलगा पीडित असेल तर लागू होणार नाही," असं प्रा. हकीम यासिर अब्बास सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)