#5मोठ्याबातम्या: क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्या पत्नीला पोलिसाकडून मारहाण

जडेजा

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. रवींद्र जडेजा यांच्या पत्नीला मारहाण

क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्या पत्नीला जामनगर येथील पोलिसाकडून मारहाण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

जडेजा यांची पत्नी रीवा या कारनं जात होत्या. त्यांच्या कारचा मोटरसायकलबरोबर अपघात झाला, त्या अपघातानंतर पोलीस कॉन्स्टेबल संजय आहिर यांनी त्यांना मारहाण केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

2. ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी यांचं मुंबईमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. वजूद आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

त्यांनी आतापर्यंत 45 नाटकं, 16 चित्रपट आणि 7 मालिकांमध्ये काम केलं आहे.

व्यवसायानं शास्त्रज्ञ असलेले हेमू अधिकारी लोकविज्ञान, अण्वस्त्र विरोधी शांतता चळवळीत काम करत होते. ते आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही ओळखले जायचे, असं एबीपी माझानं म्हटलं आहे.

3. चुकीच्या सिग्नलमुळं लोकल भरकटली

चुकीचा सिग्नल मिळाल्यामुळे मुंबईमध्ये लोकल चुकीच्या दिशेला भरकटली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी बेलापूरसाठी सुटलेली लोकल वडाळ्याला आली.

तेथून पुढे गुरूतेग बहाद्दूर नगर येथे जाण्याऐवजी ती भरकटली आणि वांद्रे स्थानकाच्या दिशेने निघाली. ही चूक मोटरमन आणि गार्ड यांच्या लक्षात आली.

4. ती ऑडिओ क्लिप खोटी - काँग्रेस आमदार

कर्नाटक बहुमत ठरावाच्या वेळी भाजपनं काँग्रेसच्या आमदारांना फोन केले असा आरोप करण्यात आला होता. पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना त्यांनी फोन केले होते. त्याचा पुरावा म्हणून काँग्रेसनं एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती.

ती ऑडिओ क्लिप खोटी असून भाजपला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं काँग्रेस आमदार शिवराम हेब्बर यांनी म्हटलं आहे, असं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

काँग्रेसनं तीन ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केल्या होत्या. त्यापैकी एका क्लिपमध्ये शिवराम हेबर यांच्या पत्नीला फोन करून भाजपनं ऑफर दिली होती असं म्हटलं होतं. तसा कोणताही फोन आपल्या पत्नीला आला नव्हता असं हेब्बर यांनी स्पष्ट केलं.

5. काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती - देवेगौडा

फोटो स्रोत, AFP

कर्नाटकात काँग्रेसला आम्ही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली, असा गौप्यस्फोट जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी केल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे म्हटलं. मी आघाडी करण्यास परवानगी दिली. त्यावेळी काँग्रेसनं कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनविण्याची इच्छा व्यक्त केली. पण आम्ही त्यांना त्यांचा मुख्यमंत्री बनवा असं सांगितलं. पण त्यांनी त्यास नकार दिला, असं देवेगौडा यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)