परभणी: 'रमजानच्या महिन्यातही कामं सोडून आधी पाणी भरावं लागतं'

सफायबी Image copyright Amey pathak
प्रतिमा मथळा सफायबी सांगतात की ऐन उन्हाळ्यात रमजान आल्यानेही पाण्याची अडचण वाढली आहे.

"रमजानचा महिना आहे, पण सगळी कामं सोडून आधी पाणी भरावं लागतं. जर घरात पाणीच नाही तर घर कसं चालणार?"

परभणीच्या परसावत नगरमध्ये सकाळी 11-11.30च्या सुमारास वेगळीच लगबग सुरू होती. "टॅंकर आनेवाला है, टॅंकर आनेवाला है..." असं म्हणत 10-12 वर्षांची मुलं रस्त्यावर ओरडताना दिसत होती.

घराघरातून पाण्याचे मोठाले ड्रम घेऊन महिला आणि पुरुष बाहेर येताना दिसू लागले. गल्लीतील सगळ्या रहिवाशांनी आपले ड्रम शिस्तबद्धपणे रांगेत लावले आणि टॅंकर येणार म्हणून वाटेकडे डोळे लावून बसले.

"आमच्यासाठी हे नेहमीचं आहे बाबा," परभणीच्या परसावत नगरात राहणाऱ्या सफायबी शेख सांगतात.

"पाणी कधी येईल याचा नेम नाही," त्या पुढे सांगतात. "रमजानचा महिना आहे. सगळी काम सेहरच्या आधी आटोपावी लागतात. ज्या दिवशी टॅंकर येणार त्या दिवशी तर ते आल्याशिवाय बाहेर पण जाता येत नाही."

"यावर्षी तरी बरं आहे. काही वर्षांखाली अवघड होतं. आता निदान पाणी दारापर्यंत येतं. पण पाणी भरेपर्यंत आमच्या मालकांना (पतीला) घराबाहेर पण जाता येत नाही," त्या सांगतात.

सफायबी यांचे पती भाजी विकून आपलं कुटुंब चालवतात. पण पाण्याच्या समस्येमुळं त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचं त्या सांगतात.

"ज्यांना पाणी विकत घ्यायला परवडतं ते घेऊ शकतात पण हातावर पोट असणारे लोक टॅंकरसाठी 200-250 रुपये कुठून आणणार?" त्या सवाल करतात.

सफायबी यांच्यासारखेच परभणीत हजारो लोकांचे हाल होत आहेत. शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्यामुळं परभणीकरांचा उन्हाळा अधिकच तीव्र झाला आहे.

'पाणी विकत घेतो'

त्यात उन्हाळ्यात रमजान आल्यामुळं पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेगळा काढावा लागत आहे. ज्या लोकांना कामाच्या वेळी बाहेर पडणं आवश्यक आहे त्यांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आहे.

दर्गा रोड भागात राहणारे ऑटोमोबाइल व्यावसायिक जावेद अन्सारी यांचं हेच म्हणणं आहे.

"पाणी येणार म्हणून घरी थांबून कसं चालेल? कामावर जावंच लागतं ना," अन्सारी सांगतात.

मग ते पाण्याची व्यवस्था कशी करतात?

"पाणी विकत घेतो. 250 रुपयांना 1000 लीटरची टाकी मिळते. पाच-सहा जणांच्या कुटुंबाला ती दोन-तीन दिवस पुरते. महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये वेगळे खर्च करावे लागतात," अन्सारी सांगतात.

पाण्याची टंचाई शहरातल्या इतर भागातही आहे. पाथरी रोडवर असलेल्या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास सोडून पाणी भरावं लागत असल्याचं चित्र दिसतं.

पाण्यासाठी हातात बाटल्या घेऊन रांगेत उभे असलेले विद्यार्थी तिथं दिसले. त्यांनी सांगितलं की "इथं नळाला पाणी 15-15 दिवस येत नाही. मग टॅंकर आलं की आम्ही रांगेत उभं राहतो."

परभणीत पाणी कुठून येतं?

परभणीला येलदरी धरणातून पाणी मिळतं. इसापूर मार्गे पाणी आणून ते राहटी प्रकल्पात सोडलं जातं आणि तेच पाणी पाइपलाइनने परभणीला येतं, अशी माहिती दैनिक दिलासाचे कार्यकारी संपादक संतोष धारासूरकर यांनी दिली.

या व्यतिरिक्त परभणीला पाणी लोवर दुधना प्रकल्पातून येतं. लोवर दुधनातलं पाणी नदीच्या मार्गानं राहटी बंधाऱ्यात सोडलं जातं, मग ते परभणीला मिळतं, असंही ते सांगतात.

Image copyright Amey pathak
प्रतिमा मथळा गल्लीतील सगळ्या रहिवाशांनी आपले ड्रम शिस्तबद्धपणे रांगेत लावले आणि टँकरची वाट पाहू लागले.

"लोवर दुधनामध्ये सध्या 40 टक्के पाणी आहे. पाण्याचा साठा मुबलक आहे जर योग्य वितरण झालं तर नक्कीच फायदा होईल," असा विश्वास ते व्यक्त करता.

"परभणीची भूजल पातळीदेखील मराठवाड्यातील इतर भागांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे लोकांना वापरण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात आहे. पण ज्यांच्याकडे बोअर नाहीत त्यांना पाणी मिळणं कठीण होतं," असं निरीक्षण धारासूरकर नोंदवतात.

पण परभणीत पाण्याची ही समस्या का उद्भवली?

कृत्रिम पाणीटंचाई

जलमित्र फाउंडेशनचे संस्थापक डॉ. राजगोपाल कलानी सांगतात, "परभणीचा पाण्याचा प्रश्न पाण्याच्या कमतरतेमुळं नाही तर पाण्याचं वितरण व्यवस्थितरीत्या होत नसल्यामुळं आहे. ही एक प्रकारची कृत्रिम पाणीटंचाई आहे."

"परभणीला ज्या पाणी पुरवठा व्यवस्थेद्वारे पाणी पुरवठा केला जातो ती जुनी झाली आहे. तिचं डिजाईन 33 वर्षांसाठीचं होतं. अजूनही ही व्यवस्था पूर्ण झालेली नाही. बंधाऱ्याची उंची वाढवणं, पाइपलाइन दुरुस्ती करणं ही कामं झाली नाही. त्यामुळे परभणीत कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि ही स्थिती किती दिवस राहील, हे सांगता येणार नाही," असं कलानी सांगतात.

कोट्यवधी खर्च झाले पण परभणी तहानलेली

परभणीचा पाण्याचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर परभणीची पाणी पुरवठा योजना काय आहे? हे समजून घेणं आवश्यक आहे.

ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी समजावून सांगतात, "शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे 40 वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना आखण्यात आली होती. त्याच व्यवस्थेवर परभणीच्या पाण्याचं वितरण केलं जातं. या योजनेमध्ये सुधारणा झाली. तिचं बजेट वाढवण्यात आलं. त्या योजनेला सुधारित पाणी पुरवठा योजना असं म्हटलं गेलं."

Image copyright Amey pathak

"1999 मध्ये परभणीसाठी सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी या योजनेचं बजेट 131.6 कोटी रुपये इतकं होतं. गेल्या वीस वर्षांमध्ये पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला पण परभणी तहानलेली आहे," असं जोशी यांचं निरीक्षण आहे.

"शासकीय आकडेवारीनुसार पाण्यासाठी आतापर्यंत एकूण 205 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुधारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आतापर्यंत 190 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 151 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर अमृत योजनेसाठी 102 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 54 कोटी खर्च झाले आहेत. म्हणजेच एकूण 205 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. पण परभणीकरांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे," असं जोशी सांगतात.

मग दोष कुणाचा?

"परभणीच्या पाणीप्रश्नाचा खरा 'व्हिलन' कोण असेल तर ती जुनी मोडकळीला आलेली पाणी पुरवठा योजनाच आहे," असं जोशी यांचं म्हणणं आहे.

जोशी यांच्या मताशी सरकारी अधिकारी देखील सहमत आहेत.

पाणी पुरवठा विभागाचे शहर अभियंता वसीम पठाण सांगतात, "पाणी पुरवठा योजना 15 वर्षांपूर्वीच कोसळली आहे. सध्या जी योजना कार्यरत आहे ती 1.25 लाख लोकांचा विचार करून आखण्यात आली होती. आता परभणीची लोकसंख्या अंदाजे 3.5 लाख आहे. त्यामुळे या योजनेवर तणाव येत आहे. टाक्या तितक्याच आहेत, पाइपलाइन तशीच आहे पण लोकसंख्या वाढली."

"वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सध्या प्रशासनातर्फे काम केलं जात आहे. येलदरीहून पाणी येण्यासाठी नवी पाइपलाइन टाकली जाणार आहे तसेच टाक्यांची संख्या वाढवता येईल. काही ठिकाणी अंडरग्राउंड पाइपलाइन दुरुस्त केली जात आहे," असं पठाण सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)