ही कुमारस्वामींची 'दुसरी बायको' आहे? मग एका महिला नेत्याचे दोन नवरे असते तर...?

  • दिव्या आर्य
  • बीबीसी प्रतिनिधी
अभिनेत्री राधिका कुमारस्वामी
फोटो कॅप्शन,

एच. डी. कुमारस्वामी यांनी सार्वजनिरित्या कधीच राधिका कुमारस्वामी यांना आपली पत्नी म्हणून सांगितलेलं नाही.

सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यात कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे एका छोट्या मुलीसह अभिनेत्री राधिकासोबत दिसत आहेत.

व्हॉट्सअपवर या फोटोवरून अनेक उलट-सुलट मेसेज व्हायरल होत असून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत.

कुमारस्वामी यांना काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरला चिकटवून ठेवणारा एक दुवा म्हणजे राधिका आहे, असं या मेसेजेसमध्ये सांगितलं जात आहे. 'सबकुछ चलता है'च्या नावाखाली काहीही पाठवलं जातं आणि काहीही शेअर केलं जातं.

या सगळ्यामागे उत्सुकता आहे आणि काही प्रश्न दडले आहेत. ही उत्सुकता म्हणजे, खरंच एच. डी. कुमारस्वामींनी दुसरं लग्न केलं होतं का? अभिनेत्री राधिकासोबत त्यांचे अनैतिक संबंध होते का? या संबंधातून त्यांना एक मुलगी आहे का? ते दोघं कधी एकत्र राहायचे का?

एच. डी. कुमारस्वामी यांनी विधानसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केलं होतं. त्यात त्यांनी आपली पहिली पत्नी म्हणून अनिता यांचं नाव लिहिलं आहे. त्यांनी सार्वजनिरीत्या कधीच राधिका कुमारस्वामी यांना आपली पत्नी म्हणून सांगितलेलं नाही.

कुमारस्वामीच कशाला? भारतीय राजकारणातल्या अनेक नेत्यांची उदाहरणं घ्या. पहिली पत्नी घरात असताना बाहेर इतर महिलेशी त्यांचे संबंध असतात. इतकंच नव्हे तर या महिला त्यांच्या घरातही राहिल्या आहेत किंवा त्यांच्याशी त्यांनी दुसरं लग्नही केलं आहे.

फोटो कॅप्शन,

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या एच. डी. कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी म्हणून सांगितल्या जाणाऱ्या अभिनेत्री राधिका यांच्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

तामिळनाडूच्या द्रविड मुण्णेत्र कळघमचे (DMK) नेते करुणानिधी यांना तिसऱ्या पत्नीपासून कनिमोळी हे अपत्य झालं. तसा उल्लेख त्यांच्या शपथपत्रातही आहे. आणि आता कनिमोळी लोकसभेत खासदारही आहेत.

द्रमुक नेते टी. आर. बालू यांनी आपल्या शपथपत्रात आपल्या दोन्ही बायकांची नावं लिहिली आहेत.

पण अशी कोणतीही महिला नेता कदाचित तुमच्या माहितीत नसेल, जिचा पहिला नवरा जिवंत असताना तिनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले आहेत, किंवा पहिल्या नवऱ्याला घटस्फोट न देता दुसऱ्यासोबत एक घरात राहत असेल. नवरा असताना दुसऱ्याशी लग्न केल्याचंही ऐकिवात नाही.

आश्चर्य वाटतंय ना हे ऐकून! हा विचार तुम्हाला विचित्र वाटला असेल. एखाद्या महिला नेत्याच्या चारित्र्याबद्दल मनात प्रश्नंही उठले असतील. जसे एखाद्या पुरुष नेत्याच्या मैत्रिणीबद्दल प्रश्नं उठतात ना, अगदी तसेच प्रश्नं आताही तुम्हाला पडले असतील.

पण त्या पुरुष नेत्यावर कधी प्रश्न उपस्थित होत नाहीत. जर चर्चा झालीच तर ती सोशल मीडियावर काही दिवस फिरते. पण एखाद्या महिला नेत्यानं असं काही केलं तर तेही असंच दुर्लक्षित केलं जाईल का?

फोटो कॅप्शन,

द्रविड मुनेत्र कळघमचे वरिष्ठ नेते करुणानिधी यांना तिसऱ्या पत्नीपासून कनिमोळी हे अपत्य झालं. ज्या आता लोकसभेत खासदार आहेत. याचा उल्लेख त्यांच्या अॅफीडेविटमध्येही आहे.

पुरुष नेते नेहमीच प्रेम संबंध ठेवताना दिसून आले आहेत. दुसरी लग्नही त्यांनी केली आहेत. जनतेनंही त्यांना स्वीकारलं आहे आणि नुसतं स्वीकारलंच नाही तर त्यांना वारंवार निवडूनही दिलं आहे.

पहिली पत्नी किंवा पती जिवंत असताना, त्यांना घटस्फोट न देता जर एखाद्यानं दुसरं लग्न केलं तर ते भारतीय दंड विधानाच्या 494 व्या कलामांतर्गत बेकायदेशीर आहे. असं असून देखील करुणानिधी आणि टी. आर. बालू यांच्यासारखे पुरुष दुसरं लग्न करतात आणि त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.

कारण हा कायदा दखलपात्र नाही. म्हणजेच पोलीस स्वतः माहिती घेऊन एखाद्या पुरुष किंवा महिलेवर दुसरं लग्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करत नाही. तसंच, अटक सुद्धा करू शकत नाही.

जोपर्यंत त्यांची पहिली पत्नी किंवा पती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत नाही तोवर त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही.

हा कायदा मुस्लीम महिलांनाही लागू होतो. पण मुस्लीम पुरुषांना 'मुस्लीम पर्सनल लॉ'मुळे चार लग्न करण्याची सूट आहे. जर त्यांनी पाचवं लग्न केलं तर ते या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतात, आणि तिथेही पहिल्या पत्नीने त्याची तक्रार केल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल.

या सगळ्यातली एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पहिली बायको तक्रार करेल किंवा करणार नाही, पण त्या माणसाच्या दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता ही नाहीच.

त्यामुळे त्याची दुसरी पत्नी त्याच्या वडलोपार्जित संपत्तीत तर भागीदार नसतेच. पण जर त्याने आपल्या मृत्युपत्रात तिच्या नावे काही लिहिलं नसेल तरीही तिला त्याने जमवलेल्या संपत्तीत वाटा मिळणार नाही.

शिवाय, तिला तर घटस्फोटानंतर पतीकडून पोटगी मागण्याचाही अधिकार नाही.

फोटो कॅप्शन,

काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आणि यानंतर त्यांच्या व राधिका यांच्या संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली.

दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या कृत्याला कायद्यात दखलपात्र गुन्हा मानलं जावं, अशी शिफारस 2009 मध्ये 'लॉ कमिशन ऑफ इंडिया'ने केली होती. म्हणजे पहिल्या पत्नीनं जर दबावाखाली नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली नाही, तरी पोलीस स्वतः त्याची दखल घेत दुसरं लग्न करणाऱ्या नवऱ्याविरोधात कारवाई करतील.

पण असं अद्याप झालेलं नाही आणि जनतेचं लक्ष असूनही पुरुष अशी नाती सर्रास बनवताना दिसतात.

यात एक लक्षात असू द्या की, मी दुसऱ्या पत्नीबद्दल बोलत असले तरी हा कायदा एखाद्या महिलेच्या दुसऱ्या नवऱ्यासाठीही लागू आहे.

पण राजकारणात बऱ्याच पुढे आलेल्या महिला कदाचित अशी जोखीम त्यांच्या आयुष्यात उचलण्यास धजावणार नाहीत. समाजानेही त्यांना कधी दुसऱ्या लग्नाचा विचार किंवा प्रेम संबंधांचा विचार मनात आणण्याची जागा आणि आत्मविश्वास दिला नाही.

तुम्हीच सांगा ना, एखाद्या महिला नेत्याच्या अशा संबंधांकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकाल का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)