#5मोठ्याबातम्या : कुमारस्वामी यांचा आज शपथविधी

कुमारस्वामी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. कुमारस्वामी यांचा आज शपथविधी

कर्नाटकची राजधानी बंळगुरूमध्ये आज एच.डी. कुमारस्वामी मुख्यंत्रिपदाची शपथ घेतील. दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

यावेळी जेडीएसचे 12 तर काँग्रेसचे 22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. काँग्रेसकडून जी. परमेश्वर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शपथविधीनंतर आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडू असंही त्यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला देशातल्या 12 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधीसमवेत मायावती आणि ममता बॅनर्जी देखील उपस्थित राहणार आहेत.

2. विमानाला उशीर झाला तर पैसै परत

केंद्र सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठा बदल करण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार विमानाच्या उड्डाणास विलंब झाला तर विमान कंपन्यांना प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

त्याचप्रमाणे तिकीट आरक्षित केल्यानंतर ते २४ तासांच्या आत रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे नवीन नियम लागू होतील.

हवाई वाहतूक क्षेत्रातील या प्रस्तावित नियमांबद्दल नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी माध्यमांना माहिती दिली.

3. प्रादेशिक पक्षांच्या मालमत्तेत वाढ

देशातल्या 32 स्थानिक पक्षांचं 2016-17 मधलं उत्पन्न 321.03 कोटींवर गेल्याचं नुकतंच 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) तर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आलंय.

सकाळनं यासंदर्भात बातमी दिली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. समाजवादी पक्षाचं एकूण उत्पन्न 82.76 कोटी असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या 'तेलुगू देसम पक्षा'चं उत्पन्न (टीडीपी) 72.92 कोटी आहे. तर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचं एकूण उत्पन्न 48.88 कोटी असल्याची माहिती अहवालात उघड झाली आहे.

4. आजी आजोबा पाळणाघरं नाहीत

'आजी आजोबा ही काही पाळणाघरं नाहीत... नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांची नाही तर आई-वडिलांची आहे,' अशा स्पष्ट शब्दांत कौटुंबिक न्यायालयानं पालकांची कानउघडणी केल्याची बातमी झी 24 तासने दिली आहे.

पुण्यातील एका महिलेनं आपली बाजू मांडताना आपले सासू-सासरे हे वेगळे राहत असून आपल्या मुलांची जबाबदारी टाळत असल्याचं म्हटलं होतं.

त्यावर कौटुंबिक न्यायालयानं या महिलेला फटकारतांना हे वक्तव्य केलंय. प्रत्येक आजी-आजोबांना आपल्या नातवंडांना सांभाळणं शक्य असेलच असं नाही. त्यामुळे आजी-आजोबांनी सुखद आयुष्याचा त्याग करून मुलांचा सांभाळ करणं गरजेचं नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

5. स्टेट बँकेला ऐतिहासिक तोटा

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार सार्वजनिक क्षेत्रातली अग्रणी बँक असलेल्या स्टेट बँकेनं सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक तुलनेत नफ्याकडून तोट्याकडे प्रवास नोंदवला आहे.

वाढत्या थकित कर्जामुळे बँकेला 31 मार्च 2018 अखेर संपलेल्या तिमाहीत 7718 कोटींचा तोटा सोसावा लागला आहे.

तिमाहीगणिक बँकेचा तोटा विस्तारलाच आहे. 2017-18ला स्टेट बँकेला 6547 कोटीचं नुकसान झाल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)