#5मोठ्याबातम्या : पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त होणे शक्य - पी. चिदम्बरम

पेट्रोल पंप

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त होणे शक्य - पी. चिदंबरम

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोलचे दर लिटरमागे 25 रुपयांनी कमी करणे शक्य आहे. पण सरकार तसे न करता सामान्य ग्राहकांचे अन्याय्यपणे शोषण करीतच राहील, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी केला.

चिदंबरम यांनी ट्विटरवर लिहिलं की, खनिज तेलाचे दर कमी झाल्यानं सरकारची पेट्रोलच्या एका लिटरमागे 15 रुपयांची बचत होते. यामुळे पेट्रोलचे दर लिटरमागे 25 रुपयांनी कमी करणे शक्य आहे. पण तसे न करता सरकार लोकांची फसवणूक करते आहे, असंच चित्र आहे.

सरकार पेट्रोलचे दर कमी करण्याऐवजी त्यावर लिटरमागे 10 रुपयांचा कर लावतं आणि मग दर एक-दोन रुपयांनी कमी करून ग्राहकांची फसवणूक करतं.

यासंदर्भातलं वृत्त लोकमतनं दिलं आहे. सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढलेले असल्यानं माध्यमांत तसंच समाज माध्यमांत त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या चार वर्षांच्या पूर्तेतेबद्दल इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये, इंधन दरात कपात करणं म्हणजे कल्याणकारी योजनांच्या निधीत कपात करणं असल्याचं स्पष्ट केलं आहे. दर कमी करण्यासाठी सबसिडी दिल्यास त्याचा फटका वेगवेगळ्या योजनांना बसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

2. शिवसेनाप्रमुखांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही! - योगी

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. शिवसेनेची वर्तमान परिस्थिती पाहून सर्वांत जास्त दु:ख बाळासाहेबांच्या आत्म्याला होत असेल, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर बुधवारी हल्ला केला.

फोटो कॅप्शन,

योगी आदित्यनाथ

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आदित्यनाथ यांची विरारमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. एकही भारतीय असा नाही, ज्याच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर नाही. बाळासाहेबांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. त्यांनी नेहमी समोरून लढत दिली.

समाजात फूट पाडणाऱ्यांचा आणि राष्ट्राला कमकुवत करणाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांनी सुरू केलेली परंपरा कमजोर होत असताना पाहून त्यांच्या आत्म्याला प्रचंड दु:ख होत असेल, असं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं. हे वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

तर, 'श्रीनिवास वनगांना भाजपनं उमेदवारी दिली असती, तर याच व्यासपीठावरुन भाजपचा प्रचार केला असता. स्वत:चा लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावल्याचं बातमी सामनानं केली आहे. नालासोपारा येथील वसंत नगरी मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली.

3. महाराष्ट्राचे 5 आमदार बचावले

महाराष्ट्रातून जम्मू-काश्मिरला गेलेल्या आमदारांच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून पाचही आमदार बचावले.

महाराष्ट्रातले पाच आमदार पंचायत राज समितीच्या कामानिमित्त 19 मे रोजी जम्मू काश्मिरला गेले आहेत. या पथकामध्ये राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे आणि आमदार दीपक चव्हाण, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील आणि आमदार तुकाराम काते तर भाजपचे आमदार सुधीर पारवे यांचा समावेश आहे.

जम्मू आणि काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात बिज बिहारीमध्ये एका गजबजलेल्या गावात अतिरेक्यांनी हा हल्ला केला. आमदारांच्या गाडीत काही अधिकारीही होते, मात्र सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, असं एबीपी माझाच्या बातमीत म्हटलं आहे.

4. एक वर्षं, एक निवडणूक

निवडणूक आयोगानं कायदा आयोगाला दिलेल्या प्रतिसादात 'एक वर्ष, एक निवडणूक' असा पर्याय सुचवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेबरोबरच सर्व राज्यांच्या निवडणुका घेण्याबद्दल विचार करावा, असं आवाहन केलं आहे. त्याचा अभ्यास करणाऱ्या कायदा आयोगानं निवडणूक आयोगाचं मत मागवलं होतं.

निवडणूक आयोगानं 24 एप्रिल रोजी दिलेल्या प्रतिसादात 'एक वर्ष, एक निवडणूक' असा पर्याय सुचवला असल्याचं इंडियन एक्सप्रेसनं बातमीत म्हटलं आहे. कायदा आयोगानं पाच घटनात्मक मुद्दे आणि 15 सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्दे विचारार्थ निवडणूक आयोगाकडे दिले होते. एक देश एक निवडणुकीलाही आपला पाठिंबा असल्याचं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे.

5. निरंजन डावखरे भाजपमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाचे विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी आमदारकी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का असून, डावखरे हे आज, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीच्या एका गटाकडून सातत्यानं डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. या गटानं २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत आपले वडील आणि तत्कालीन उपसभापती वसंत डावखरे यांचा पराभव घडवून आणला, असा दावा निरंजन यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे. तथापि, ठाणे जिल्ह्यातल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे निरंजन यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)