'#AreYouFitToBePM' : मोदींनी फिटनेस चॅलेंज स्वीकारलं अन् नेटिझन्स चिडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजची सर्वत्र चर्चा होत आहे.

आपल्या कार्यालयातच पुश-अप्स मारतानाचा एक व्हीडिओ राठोड यांनी शेअर करत लोकांना आपला फिटनेस फंडा शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच एक नवा हॅशटॅग तयार वापरला - #HumFitTohIndiaFit.

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी भारताचा क्रिकेट कॅप्टन विराट कोहलीला ही फिटनेस चॅलेंज दिलं आहे. विराटने हे चॅलेंज फक्त स्वीकारलं नाही तर पूर्ण देखील केलं आहे.

फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटनं आणखी तीन जणांना हे चॅलेंज दिलं आहे - त्याची पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

विशेष म्हणजे मोदींनीही हे चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच मी ही माझा फिटनेस व्हीडिओ शेअर करेन, अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे.

पण मोदींच्या या ट्वीटमुळे एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे.

एकीकडे देशात पेट्रोल आणि स्टरलाईटचा मुद्दा तापलेला असताना, मोदींच्या या ट्वीटमुळे जनतेमध्ये थोडीशी नाराजी पसरल्याचं दिसत आहे.

मोदींच्या ट्वीटला उत्तर देत, ब्रिजेश लिहितात, "आदरणीय पंतप्रधान, मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही स्टेरलाईट प्रकरणाचा निषेध करत, वेदांत कंपनीला त्यांनी पर्यावरण कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या प्रतिष्ठानाला टाळं ठोका"

तसंच, #AreYouFitToBePm असं खोचक हॅशटॅगरूपी प्रश्नही ब्रिजेश यांनी विचारला आहे.

Image copyright Twitter

आणखी एक युजर गजेंद्र यांनी उपाहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, "मुंबईकरांनो, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कारण तुम्हाला इंधन दरवाढीला सामोरं जायचंय."

Image copyright Twitter

विराट कोहलींनी आपली निराशा केल्याचं सस्तिका राजेंद्रन यांनी म्हटलं आहे. त्या ट्वीट करतात, "नरेंद्र मोदी, मला वाटतं की तुम्ही सगळ्यांत आधी आपण पंतप्रधान बनण्यासाठी फिट आहोत का, हे जाणून घ्यायला एक #FitnessChallenge घेतलं पाहिजे. तुम्ही नक्की त्यात सपशेल नापास व्हाल."

सस्तिका राजेंद्रन पुढे लिहितात, "विराट कोहली तुम्ही किती सहजपणे तामिळ नाडूच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं आहे, हे पाहून माझी निराशा झाली आहे."

Image copyright Twitter

तर रोहिणी सिंग विचारतात, "फिटनेस चॅलेंज क्यूट आहे. पण सरकारमधून कुणीतरी या इंधन दरवाढीवरही लक्ष देणार की नाही?"

Image copyright Twitter

विवेक यांनीही ट्वीट करत आपलं संताप व्यक्त केला आहे. ते लिहितात, "एकीकडे, देशातील नागरिकांना मारलं जातंय, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहेत, अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी विराट कोहलीसोबत फिटनेस चॅलेंज खेळण्यात व्यस्त आहेत."

Image copyright Twitter

दरम्यान, राज्यवर्धन सिंह राठोड यांचं हे चॅलेंज राजकारण्यांनी, खेळाडूंनी तसंच बॉलिवूडमधल्या अनेक कलाकरांनी स्वीकारत, या मोहिमेत आपला खारीचा वाटा दिला आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही हे चॅलेंज स्वीकारत अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू, अभिनेते सलमान खान आणि सौम्या टंडन यांना चॅलेंज दिलं आहे.

तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील हे चॅलेंज स्वीकारत, योगासन करून दाखवलं आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राज यांनी देखील हे चॅलेंज स्वीकारत, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि धावपटू पी. टी. उशा यांना चॅलेंज केलं आहे.

तर मिथालीचं चॅलेंज स्वीकारत पी. टी उशा यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

बरं, या सगळ्यांत बॉलिवुड कसा मागे राहू शकतो.

अभिनेता हृतिक रोशनने देखील एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यानंतर त्यानं टायगर श्रॉफ आणि कुणाल कपूरला चॅलेंज दिलं आहे.

पण हृतिकच्या व्हीडिओ ट्वीटवरची ही एक प्रतिक्रिया लक्षणीय ठरली -

Image copyright Twitter

हृतिकने दिलेल्या चॅलेंजचा मान राखत टायगर श्रॉफनेही आपलं व्हीडिओ शेअर केला आहे.

तर, विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारत, अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील आपला फिटनेस फंडा शेअर केला आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेल्या या ट्रेंडच्या लाटेवर काँग्रेसही स्वार झाली आहे, पण थोड्या राजकीय वळणावर.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना इंधनाचे दर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा काँग्रेस देशव्यापी आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे. त्यांचं हॅशटॅग आहे - #FuelChallenge.

यापुढे काय होणार? तुम्हाला काय वाटतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)