शांताबाई ते मंदामाई : YouTubeवर प्रादेशिक गाण्यांची चलती

मंदामाई Image copyright FACEBOOK/SUMIT RAUT
प्रतिमा मथळा मंदामाई गाणं गाजलं आणि सुमित यांना ओळख मिळाली

'मंदामाई शिकलेली नव्हती का, मंदामाई अडाणी होती का...' चार महिन्यांपासून हे गाणं हळदीच्या अनेक समारंभांमध्ये, लग्नातल्या डीजेवर, कॉलेज कट्ट्यांवर आणि लोकल ट्रेनमध्येही वाजू लागलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण किंवा प्रादेशिक गाण्यांची लोकप्रियता, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष म्हणजे विरार-पालघर या पट्ट्यातल्या तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या गाण्याला यूट्यूबवर चारच महिन्यांमध्ये 92 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. आधीपासूनच युट्युबवर धुमाकूळ घालणाऱ्या प्रादेशिक गाण्यांमध्ये मंदामाईचाही समावेश झाला आहे. पण या गाण्याची जन्मकहाणीही भन्नाट आहे.

कसं झालं मंदामाई?

मंदामाई गाण्यामुळे एका रात्रीतच प्रचंड लोकप्रिय झालेले सुमित राऊत बोईसरमधल्या दीप ग्लोबल या शाळेत शिक्षक आहेत. ते सांगतात, "खरं तर हे पारंपरिक गाणं आहे. आम्ही मित्रांच्या हळदीला वगैरे जायचो, तिथे गाण्यांमध्ये 'मंदामाई शिकलेली नव्हती का' ही एकच ओळ मध्येच यायची. ते काय आहे, हेदेखील आम्हाला माहीत नव्हतं. मग आम्ही दोन मित्रांनी एकत्र येऊन या ओळीच्या पुढे अख्खं गाणं लिहिलं."

Image copyright FACEBOOK/SUMIT RAUT
प्रतिमा मथळा मंदामाईला 40 लाख व्ह्यू मिळाल्यानंतर सुमित यांच्या फेसबूक पेजवर हा फोटो झळकला

'मंदामाई शिकलेली नव्हती का' या ओळीचं पूर्ण गाणं करताना मग सुमित आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या भागातल्या पालघर स्टेशन, बोईसर स्टेशन, पाचपतीचा नाका असे संदर्भ घेतले. त्यामुळे हे गाणं या पट्ट्यात लगेचच लोकप्रिय झालं, असं सुमितना वाटतं.

"'मंदामाई'मध्ये खरं तर फार काही वेगळं किंवा खास नाहीये. तरीही लोकांना ते आवडतंय. भारतातच नाही, तर परदेशातही हे गाणं ऐकलं, हे सांगणारे अनेक जण आम्हाला भेटतायत," सुमित सांगतात.

सहाय्यक डान्सरपासून स्वतंत्र गायकापर्यंत मजल

'मंदामाई' गाजल्यानंतर आता सुमित चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत. पण त्यांचा हा प्रवास खडतर होता.

सुमित सांगतात, "मला डान्सची आवड आहे. मी डान्स शिकलोय. पण मुख्य डान्सर म्हणून कधी काम मिळालं नाही. मग इतर गाण्यांच्या व्हीडिओ अल्बममध्ये मागे नाचणाऱ्या मुलांमध्ये नाचलोय."

सुमित यांनी आतापर्यंत शांताबाई, नाच शालू नाच, कल्लुळाचं पाणी अशा अनेक गाजलेल्या गाण्यांच्या व्हीडिओमध्ये नाच केला आहे.

"अनेकदा वाटायचं की, आपलंही गाणं यावं. किंवा आपणही मुख्य कलाकार म्हणून चमकावं. आता 'मंदामाई' प्रसिद्ध झाल्यावर अचानक मलाही खूप प्रसिद्धी मिळाली आहे. 'मंदामाई'चा गायक म्हणून मलाही कार्यक्रमांमध्ये गायला मिळतं," सुमितना आपल्या गाण्याचा अभिमान आहे.

ही गाणी का गाजतात?

पण मंदामाई हे काही यूट्युबवर गाजलेलं पहिलंच गाणं नाही. याआधीही अनेक प्रादेशिक गाण्यांनी यूट्युबवर धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या कलाकारांनाही यूट्युबद्वारे व्यासपीठ मिळत असून ते जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

'बघतोय रिक्षावाला' हे गाणं आलं आणि त्या गाण्याच्या गायिकेला, रेश्मा सोनावणेला रातोरात प्रसिद्धी मिळाली. ही गाणी एवढी लोकप्रिय का होतात, हे रेश्मा यांना विचारलं असता त्या म्हणतात, "ही गाणी ऐकताना लोकांना मजा वाटत असेल. झुरत मरत गायलेल्या गाण्यांपेक्षा अशी मोकळेपणे गायलेली गाणी त्यांना जास्त उत्साही वाटत असतील."

संगीत समीक्षक आणि पुणे लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम यांनीही नेमक्या याच गोष्टीकडे लक्ष वेधलं. ते म्हणतात, "बऱ्याचदा आपल्या संगीताच्या जाणिवा शहरी असतात. पण या गाण्यांमध्ये नागर आणि ग्रामीण जाणिवांचा मिलाफ होतो. त्यामुळेच ती लोकांना जास्त भावतात."

Image copyright YOUTUBE/ULTRA MUSIC
प्रतिमा मथळा मंदामाई गाण्याच्या व्हीडिओमध्ये सुमित असे लहान मुलांमध्ये बिनधास्त नाचताना दिसतात

सुमितही नेमकं असंच म्हणतात. ते सांगतात, "शहरातल्या उच्चभ्रू लोकांमध्ये मोकळेपणा नसतो. तो मोकळेपणा गावाकडे किंवा आगरी-कोळी समाजात आहे. गाणं सुरू झालं की, पावलं आपोआप थिरकायला लागतात. त्यांना भिडणारं गाणं दिलं की, लोक ते डोक्यावर घेतातच."

या गोष्टीला एक तांत्रिक जोडही आहे. या गाण्यांच्या एवढ्या प्रचंड लोकप्रियतेबद्दल यूट्युबकडे विचारणा केली असता यूट्युब इंडियाच्या एंटरटेंनमेंट विभागाचे प्रमुख सत्या राघवन म्हणाले, "गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इंटरनेटचं जाळं झपाट्याने विस्तारलं आहे. यात ग्रामीण भागाचाही समावेश आहे. ग्रामीण भागातले लोक त्यांच्या इंटरनेटचा वापर यूट्युबवरचे व्हीडिओ बघून सुरू करतात. अशा वेळी त्यांच्या संवेदनांना भिडणारं काही त्यांना दिसलं की, ते लोकप्रिय होतं."

तात्पुरती लोकप्रियता

ही गाणी जेवढ्या झपाट्याने गाजतात, तेवढ्याच झपाट्याने त्यांच्याबद्दलचं वेड कमीही होताना दिसतं. यावर प्रकाश टाकताना संगोराम सांगतात, "कोलावरी डी हे गाणं आलं आणि अक्षरश: समाजमानस वेडं झालं. पण ते तात्पुरतं होतं. आता कोलावेरी डी अनेकांना आठवतही नाही."

यामागचं कारणही ते सांगतात. ते म्हणतात, "सांगीतिकदृष्ट्या या गाण्यांमध्ये वेगळं किंवा खूप उच्च असं काही नसतं. या गाण्यांचे शब्दही अनेकदा सामान्यच असतात. शांताबाई याच गाण्याचं उदाहरण घ्या! त्या गाण्यातल्या यमकांमुळे ते गाजलं. या गाण्यांमधला बेदरकारपणा लोकांना आवडत असावा."

Image copyright Youtube/ULTRA MUSIC
प्रतिमा मथळा रसिकाच्या लग्नात गाण्यातला हा प्रसंग

"तसंच यामागे मानवी मेंदूचाही भाग आहेच. मानवी मेंदूला सतत नवनवीन काहीतरी हवं असतं. त्यामुळेच आपलं आयुष्य प्रभावी राहतं. के. एल. सहगल सोडा, आताच्या पिढीला बाबा सहगल पण आउटडेटेड वाटतो. मुंबई, तुझा माझ्यावर भरवसा नाय का, या गाण्याचंही तेच होतं. त्यात एक धक्कातंत्र होतं. तेवढ्यापुरतं ते लोकप्रिय झालं."

"दुसरा मुद्दा म्हणजे एखादं गाणं यशस्वी झालं की, त्याच धाटणीची गाणी यायला सुरुवात होते. पण ती गाणी विशेष चालत नाहीत," संगोराम हे निरीक्षण नोंदवतात.

प्रसिद्धी आणि झगमगाट

यूट्युबसारख्या माध्यमावर आपलं गाणं लोकप्रिय झालं की, ते थोड्याच काळात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं. त्यामुळे अगदी काल-परवापर्यंत लोकांना माहीत नसलेले कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतात.

सुमित सांगतात, "आधी इतर गाण्यांमध्ये सहाय्यक डान्सर म्हणून काम केल्यावर त्यांना कोणीच ओळखत नव्हतं. पण गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये त्यांना येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टमध्येही वाढ झाली आहे."

हा मुद्दा थोडासा पुढे नेत रेश्मा सांगतात, "चेहरा ओळखीचं होणं हे आमच्या क्षेत्रात तेवढं महत्त्वाचं नाही. यूट्युबसारख्या माध्यमाचा फायदा म्हणजे तुमचा आवाज लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचतो. तुमचा आवाज लोकांना आवडला, तर तुम्हाला आणखी गाणी मिळतात, आणखी कार्यक्रम मिळतात."

सुमितही या गोष्टीला दुजोरा देतात. ते म्हणतात, "यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमात गेलो की, एका कोपऱ्यात असायचो. आता मंदामाईने मला थेट स्टेजच्या मध्यभागी आणलं आहे. आतापर्यंत शाळा-कॉलेजमधले मित्रमैत्रिणी ओळखही दाखवत नव्हते. आता अचानक त्यांनी बोलायला सुरुवात केली."

यूट्युब इंडियाचे सत्या राघवनही हा मुद्दा अधोरेखित करतात. ते म्हणतात, "सगळ्याच स्तरांमधील लोकांनी आपली प्रतिभा जगासमोर मांडण्यासाठी यूट्युब त्यांना व्यासपीठ देतं. देशातल्या कानाकोपऱ्यातून खूप वेगवेगळे आणि अत्यंत नवखे कलाकार पुढे येत आहेत आणि यूट्युबमुळे त्यांना चांगलाच फायदा होत आहे. आमच्यासाठी तर ही खूपच चांगली गोष्ट आहे."

आम्ही गाणी ऐकतो कारण...

या गाण्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे आणि खूप वेगवेगळ्या वयोगटातला आहे. पण त्यातही जास्त करून तरुण मुलांमध्ये ही गाणी जास्त प्रसिद्ध आहेत.

भरत ठाणेकर हा ठाण्यात राहणारा तरुण सांगतो, "आमच्या कोळी समाजात लोकगीतांची मोठी परंपराच आहे. ती गाणीही ठेका धरायला लावणारी आहेत. पण या गाण्यांमध्ये एक प्रकारचा मोकळेपणा आहे. तो आम्हाला जास्त आवडतो. आता आमच्या नातेवाईकांपैकी कोणाकडेही हळदीचा कार्यक्रम असला, तर तिथे मंदामाई, शांताबाई, रिक्षावाला अशी गाणी लागतातच."

Image copyright Youtube/SUMEET MUSIC
प्रतिमा मथळा 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्याच्या व्हीडिओमधलं हे दृश्य

परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद अशा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये मात्र ठाणे, पालघर, वसई, कर्जत या पट्ट्यातील कलाकारांच्या गाण्यांपेक्षा आनंद आणि मिलिंद शिंदे यांची गाणी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कलाकारांची गाणी जास्त लोकप्रिय आहेत.

औरंगाबादमध्ये राहणारा तेजस गुंजकर सांगतो, "आमच्याकडे 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय', 'बोल मैं हलगी बजाऊं क्या' अशा गाण्यांची क्रेझ आहे. काही जणांना ही गाणी आवडत नाहीत. पण एकदा का ती तुमच्या कानावर पडली, की तुमचे पाय आपोआप थिरकायला लागतात. हीच या गाण्यांमधली मजा आहे. ही गाणी इतकी आवडतात की, माझ्या लग्नातही डीजेला हीच गाणी वाजवायची तंबी दिली होती. कदाचित हेच कारण असेल की, माझे सगळे मित्र वरातीत सलग तीन तास नाचत होते."

पैसे मिळतात का?

यूट्युब इंडियाच्या सत्या राघवन यांच्या म्हणण्याप्रमाणे ही गाणी तयार करणाऱ्यांना जाहिरातींच्या माध्यमातून पैसे मिळतात. त्यांचं चॅनेल किंवा त्यांनी टाकलेला कंटेंट चार हजार तास बघितला गेला किंवा एक हजार सबस्क्रायबर झाले की, त्यांना जाहिराती मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतात.

पण हे उत्पन्न कलाकारांना दिलं जातं अथवा नाही, हा प्रश्न वेगळा आहे. ही गाणी तयार करणारे कलाकार आणि ती प्रसिद्ध करणाऱ्या म्युझिक कंपन्या यांच्यात होणाऱ्या करारावर ते अवलंबून असतं.

Image copyright Youtube/Naina Music
प्रतिमा मथळा खुशी से रख लो नाम रे बाबा...

रेश्मा सांगतात, "यूट्युबकडून मिळणारे पैसे सोडा, अनेकदा आम्हाला आमच्या गाण्याचं मानधनही मिळत नाही. ते देतानाही लोक थोडं कमी करता येईल का, असं विचारतात."

सुमित राऊतही तसे पैसे न मिळाल्याचंच सांगतात. किंबहुना लोकांमध्ये अल्पावधीतच अत्यंत प्रसिद्ध झालेल्या मंदामाईच्या कलाकारांनी हे गाणं फुकटातच केल्याचं सुमित सांगतात.

पण या कलाकारांना यूट्युबच्या माध्यमातून पैसे मिळतात, यूट्युबचं म्हणणं आहे.

यूट्युबवरची 'लाखा'तली गाणी

Image copyright Youtube/Sumeet Music
प्रतिमा मथळा शांताबाई हे गाणं इतकं गाजलं की, प्रसारमाध्यमांना त्याची दखल घ्यावी लागली होती.

1. शांताबाई

मंदामाईसारखी इतरही अनेक गाणी युट्युबवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. या सगळ्या गाण्यांची खासियत म्हणजे ती लोकसंगीताच्या बाजातली आहेत. यातलं सगळ्यात गाजलेलं गाणं म्हणजे 'शांताबाई'! दोन-तीन वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याने त्या वेळी लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड मोडले होते.

विशेष म्हणजे मंदामाई प्रमाणेच शांताबाई या गाण्याचे शब्दही काव्यात्मक नव्हते. फार पूर्वी आलेल्या आशीर्वाद या चित्रपटात अशोक कुमार यांनी गायलेलं 'रेलगाडी' हे गाणं काहीसं या धर्तीचं होतं.

या गाण्याला आतापर्यंत तीन कोटी 70 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. हा रेकॉर्ड नसला, तरी कोणत्याही चित्रपटात नसलेलं हे गाणं इतक्या लोकांनी पाहिलं आहे.

2. बघतोय रिक्षावाला

या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यूट्युबवर गाजलेली ही बहुतांश गाणी ठाणे, डोंबिवली, पालघर, विरार, भिवंडी, दिवा, उरण या आगरी-कोळी बहुल पट्ट्यातल्या कलाकारांची आहेत. याच साखळीतलं एक गाणं म्हणजे बघतोय रिक्षावाला!

रेश्मा सोनावणे यांनी गायलेल्या आणि गाजलेल्या अनेक गाण्यांपैकी एक असलेलं हे गाणं सुरुवातीला फक्त अल्बममध्ये होतं. त्या वेळीही हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. इतकं की, कोणताही हळदीचा समारंभ किंवा कोणतीही मिरवणूक या गाण्याशिवाय पूर्ण होत नव्हती.

या गाण्यात ऱ्हिदम महत्त्वाचा आहे. लोकांना थिरकायला ऱ्हिदम आवश्यक असतो. गाण्याच्या बीट्स खूप फास्ट आहेत. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमात किंवा कोणत्याही समारंभात आजही हे गाणं आवर्जून लावलं जातं, रेश्मा सांगतात.

Image copyright Youtube/Sumeet Music
प्रतिमा मथळा बोल मैं हलगी बजाऊं क्या...

3. बोल मैं हलगी बजाऊ क्या

'मेरे लाड को, सासरवाडको लेके जाऊं क्या... मैं तुझसे मिलनें आ जाऊं क्या, और बोल में हलगी बजाऊ क्या' असे शब्द असलेलं हे गाणं आणि त्याचा व्हीडिओ यूट्यूबवर धम्माल उडवत आहे.

सुमित म्युझिक नावाच्या कंपनीने अपलोड केलेला हा व्हीडिओ दोन कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सागर बेंद्रे यांनी लिहिलेल्या या गाण्याला साजन विशाल यांनी चाल दिली आहे आणि ते सागर बेंद्रे यांनी गायलं आहे.

ही कलाकार मंडळी आहेत पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र परिसरातली! त्यांनी केलेली ही गाणी मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग इथे तुफान गाजतात.

4. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं... तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय... जवा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. या गाण्यानंही लोकांना वेड लावलंय. आतापर्यंत हे गाणं यूट्युबवर 2.5 कोटी लोकांनी बघितलं आहे.

हे गाणंसुद्धा सुमित म्युझिक या कंपनीनेच केलं आहे. साजन विशाल यांची चाल असलेलं हे गाणं संकल्प गोळे याने गायलं आहे. हे गाणंही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रचंड लोकप्रिय आहे.

Image copyright Youtube/Sumeet Music
प्रतिमा मथळा आला बाबुराव

5. आला बाबुराव

आला बाबुराव या गाण्याची लोकप्रियता एवढी आहे की, मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लग्नाची वरात सध्या या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. शांता झाली शालू झाली, आता कुणाचं नाव... आला बाबुराव आता आला बाबुराव... असं हे गाणं आहे.

या गाण्याला यूट्युबवर 3 कोटींपेक्षा जास्त लोकांचे व्ह्यू आहेत. हे गाणंही सुमित म्युझिकने बाजारात आणलं असून ऋषिकेश कांबळे यांचे शब्द आहेत. हे गाणं मोनु अजमेरी यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि रोमियो कांबळे यांनी गायलं आहे.

6. कल्लुळाचं पाणी

साधारण दोन वर्षांपूर्वी हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. खरं तर गोंधळाच्या धाटणीत केलेलं हे गाणं भक्ती परंपरेतलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. या गाण्याचे दोन तीन व्हीडिओ युट्युबवर आहेत. हे व्हीडिओ 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहेत.

Image copyright Youtube/Sumeet Music
प्रतिमा मथळा कल्लुळाचं पाणी

हे गाणंही सुमित म्युझिक या कंपनीने युट्युबवर टाकलं आहे.

7. आनेजाने वाले लोग कोई

या गाण्यातल्या 'कोई कोंबडा कापता हैं, तो कोई बकरा कापता हैं' अशा शब्दांमुळे आणि गाण्याच्या ऱ्हिदममुळे हे गाणं भलतंच गाजत आहे. 'खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम' या शब्दांनी सुरू होणारं हे गाणं आगरी-कोळी समाजातल्या कलाकारांनी बनवलं आहे. हे गाणं ठाणे, मुंबई पट्ट्यात तर ऐकलं जातंच, पण ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे.

या गाण्यात लोणावळ्याजवळच्या कार्ल्यातली एकविरा देवी, मुंब्र्याची मुंब्रादेवी, विरारची जीवदानी देवी अशा वेगवेगळ्या देवींच्या देवस्थानाची सैर घडवली आहे. या गाण्याचे विचित्र शब्दच गाण्याचा USP आहे, असं म्हणता येईल.

8. रसिकाच्या लग्नात

अलिबाग, मुंबई, उरण, ठाणे, पालघर या पट्ट्यात अगदी एखादंच लग्न असं असेल की, ज्या लग्नात रसिकाच्या लग्नात हे गाणं वाजलेलं नाही. सातच महिन्यांपूर्वी युट्युबवर या गाण्याचा व्हीडिओ टाकला.

या गाण्याला सध्या 37 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू आहेत. हे गाणं आगरी-कोळी गाणी गाणारे गायक जगदीश पाटी यांनी गायलं आहे. जगदीश पाटील यांचं 'पह्यला गाव माजा जाम भारी व्हता' हे गाणंही या पट्ट्यात लोकप्रिय आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)