ट्रंप- किम चर्चा का फिसकटली : वाचा शुक्रवारचा बीबीसी मराठी राउंड अप

फोटो स्रोत, AFP
किम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप
ट्रंप- किम चर्चा फिसकटली आणि इतर मोठ्या बातम्या बघा - एका दृष्टिक्षेपात. .. बीबीसी मराठी राउंड अपमध्ये.
1. मोदी- ट्रंप चर्चा फिसकटली
12 जूनला सिंगापूरमध्ये होणारी अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेतून डोनाल्ड ट्रंप यांनी माघार घेतली आहे. जागतिक तणाव निवळण्यासाठीच्या प्रयत्नांना यामुळे मोठा फटका बसला आहे.
या दोन राष्ट्रनेत्यांच्या चर्चेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं. पण भारतीय प्रमाण वेळेनुसार काल संध्याकाळी अचानक ट्रंप यांच्याकडून ही चर्चा होऊ शकत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या पत्रात ट्रंप म्हणाले, "आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात तुमची लवकरात लवकर भेट घ्यायची होती. मात्र तुम्ही प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रचंड राग आणि द्वेष खुलेपणाने दिसत होता. आताच्या घडीला भविष्याचा विचार करून तुमची भेट घेणं रास्त ठरणार नाही."
या पत्राआधी अगदी काही तास उत्तर कोरियाने अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे उद्धवस्त केल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेच्या आग्रहानुसार उत्तर कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात होतं. नेमक्या घडामोडींचे अपडेट्स इथे पाहा.
2. मोदींचं 'फिटनेस चॅलेंज' चर्चेत का?
फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजची सर्वत्र चर्चा होत आहे. आपल्या कार्यालयातच पुश-अप्स मारतानाचा एक व्हीडिओ राठोड यांनी शेअर करत लोकांना आपला फिटनेस फंडा शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच एक नवा हॅशटॅग तयार वापरला - #HumFitTohIndiaFit.
विशेष म्हणजे मोदींनीही हे चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच मी ही माझा फिटनेस व्हीडिओ शेअर करेन, अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे. एकीकडे देशात पेट्रोल आणि स्टरलाईटचा मुद्दा तापलेला असताना, मोदींच्या या ट्वीटमुळे जनतेमध्ये थोडीशी नाराजी पसरल्याचं दिसत आहे. मोदींच्या ट्वीटमुळे मोदी का चिडले इथे वाचा.
3. आता फेसबुक तुमचे न्यूड फोटो का मागतंय?
सूडाच्या भावनेतून एखाद्यानं तुमचे नग्न किंवा अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले किंवा करण्याच्या बेतात असेल तर ते आता लगेच ब्लॉक करणं शक्य होणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे - तुम्हाला तुमचे नग्न फोटो फेसबुकला पाठवावे लागणार आहेत. तुम्ही म्हणाल ही काय नवीन भानगड?
फेसबुक त्या नग्न फोटोचं एक प्रिंट स्टोर करून ठेवेल. आणि असा फोटो कुणीही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर टाकताच फेसबुकला तो कळेल आणि तत्काळ तो ब्लॉक केला जाईल. पण हा खटाटोप फेसबुक का करतंय? सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
4. रोहिंग्या कट्टरवाद्यांनी 99 हिंदूंना मारलं, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा दावा
फोटो स्रोत, EPA
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यान म्यानमारमध्ये अनेक रोहिंग्या मुस्लीम कट्टरवाद्यांनी हिंदूचा संहार केल्याचं अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनं म्हटलं आहे.
अरसा (Arakan Rohingya Salvation Army) या गटानं 99 हिंदू नागरिकांची हत्या केली असं या मानवाधिकार संघटनेनं म्हटलं आहे. अरसानं मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
5. किशनगंगेच्या पाण्यावरून भारत- पाकिस्तानातमध्ये नवा वाद
फोटो स्रोत, Sajjad Qayyum/AFP/GETTY
पाकिस्तान आणि भारतात सिंधू पाणी वाटपावरून असलेला वाद अजूनही संपलेला नाही. त्यामध्ये सध्या किशनगंगा नदीच्या पाण्यावरून वाद पेटलेला आहे. किशनगंगा ही झेलमची उपनदी आहे. तिला पाकिस्तानात नीलम नदी असं नाव आहे.
वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने सिंधू करारावर दोन्ही देशांनी सह्या केलेल्या असल्या तरी अजूनही दोन्ही देशात पाणी वापरारून धुसफूस सुरू असते. भारतानं किशनगंगेच्या पाण्यावर वीजनिर्मिती प्रकल्प नियोजित केला आहे. त्याला पाकिस्तानचा विरोध आहे.
यावर सुहैल अहमद यांनी बीबीसी हिंदीसाठी केलेलं या प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण इथे वाचा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)