#5मोठ्याबातम्या : विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात राष्ट्रवादी

mls.org.in

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी 2, राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. एका जागेचा निकाल शिल्लक आहे. याशिवाय आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहू या.

1.विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात राष्ट्रवादी

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. तर, कोकणातील जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी मिळाला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेने या निवडणुकीत बाजी मारल्याचं चित्र आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

परभणी - हिंगोलीत शिवसेना-भाजप युतीचे विप्लव बाजोरिया, वर्धा चंद्रपूरात भाजपचे डॉ. रामदास आंबटकर, नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि कोकणात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झाल्याची बातमी 'सकाळ'नं दिली आहे.

2. पेन्शनसाठी 4 महिने घरात ठेवला आईचा मृतदेह

वाराणसीमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबाने निवृत्तीवेतनाच्या लालसेपोटी चार महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या ७० वर्षीय आईचा मृतदेह घरात ठेवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. चार महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आईवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिच्या मुलांनी रसायन लावून तिचं शरीर घरात ठेवलं होतं. पोलिसांच्या छाप्यात ही बाब उघडकीस आली.

'लोकसत्ता'च्या बातमीनुसार, ही घटना वाराणसी शहरातील भेलूपूर भागातील कबीर नगर येथे घडली. मृत महिलेचं नाव अमरावती असं होतं. अमरावती यांचे पती दयाप्रसाद यांचं वर्ष २००० मध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर अमरावती यांना ४० हजार रुपयांचं निवृत्तीवेतन मिळत असे. दरम्यान, १३ जानेवारी रोजी अमरावती यांचं निधन झाले. मुलं आईचा अंगठा घेऊन दर महिन्याला बँकेतून निवृत्तीवेतन काढून आणत होते.

3. नाट्य संमेलनात 60 तासांचा महाअंक

मुलुंडमध्ये 13 ते 15 जून दरम्यान आयोजित 98वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा सलग 60 तास रंगणार आहे. आतापर्यंतच्या नाट्यसंमेलनाची परंपरा मोडीत काढत यंदाचं नाट्यसंमेलन वैविध्यपूर्ण पद्धतीने आयोजित करण्याचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानस आहे. 13 जून रोजी दुपारी 4 वाजता नाट्यदिंडीने सुरू होणारा हा महाअंक 16 जूनच्या पहाटे चारपर्यंत सुरू राहील. संगीत रंगभूमीवरच्या ज्येष्ठ कलाकार कीर्ती शिलेदार या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, जूनमध्ये आयोजित या नाट्यसंमेलनासाठी 'टी फॉर थिएटर आणि टी फॉर ट्रंक' अशी संकल्पना निर्धारित करण्यात आली असून या माध्यमातून मराठी रंगभूमी ज्या रंगमंच कामगारांच्या आधारावर बहरली त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आहे. केवळ व्यावासायिक नाटकेच नाही, तर लावणी, झाडीपट्टी, नमन, दंडार या लोककलांच्या सादरीकरणाचा अनुभव तरुण रंगकर्मी आणि रसिकांना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असं नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितलं.

4. आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठा धक्का?

देशात आता निवडणुका झाल्या, तर मोदी सरकारला सत्ता तर मिळेल, पण भाजपच्या जागा मात्र कमी होतील, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. 26 मे रोजी मोदी सरकारची 4 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे 2019च्या निवडणुकांआधी यंदाचं वर्ष मोदींसाठी सेमीफायनल ठरलं आहे.

एकीकडे विरोधकांनी सरकारविरोधी मोट बांधली आहे, तर दुसरीकडे पुन्हा पूर्ण बहुमतानं सत्तेत येऊ असं भाजपला विश्वास आहे. म्हणूनच देशाचा मूड काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वेक्षण केले. यात भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळतील, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे भाजपला काठावरचं बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. तिकडे आगामी राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या निवडणुकीत मात्र भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

5. भारतीय साक्षीदार पाकिस्तान कोर्टात जाणार?

26/11च्या मुंबई हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पाकिस्तानमधल्या कोर्टानं भारतीय साक्षीदारांना कोर्टात हजर राहण्याबाबत पाकिस्तानच्या केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे. 27 भारतीय साक्षीदार बोलावण्याबाबत 27 जूनपर्यंत निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

डॉननं दिलेल्या बातमीनुसार, न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी सुनावणीदरम्यान हे आदेश दिले. पाकिस्तानी संशयितांची ओळख पटवण्यासाठी भारतीय साक्षीदारांना बोलावण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)