पालघर पोटनिवडणूक : 'मराठी वि. उत्तर भारतीय संघर्षातून भाजपला होऊ शकतो फायदा'

  • प्रशांत ननावरे
  • बीबीसी मराठीसाठी
योगी -उद्धव

फोटो स्रोत, Getty Images

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला चांगलाच राजकीय रंग चढलेला पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

इथल्या उत्तर भारतीयांच्या मतांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपनं प्रचारात उतरवलं. त्यामुळे इथल्या उत्तर भारतीयांना चुचकारण्यासाठी तसंच उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा संघर्ष उभा राहिल्यास, त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो, याची चाचपणी बीबीसीनं केली. त्यासाठी आम्ही काही विश्लेषक, पत्रकार आणि अभ्यासकांशी चर्चा केली.

या मतदारसंघात उत्तर भारतीयांचं सर्वाधिक प्राबल्य असल्याने सर्व राजकीय पक्षांचं या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. म्हणून उत्तर भारतीयांना चुचकारण्यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरारमध्ये सभा ठेवण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील याच मतदारसंघात प्रचारसभा घेतली.

'शिवसेना अफझलखान'

योगी आदित्यनाथ यांनी देखील या सभेत शिवसेनेवर टीका केली. शिवसेना शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अफजल खानाचं काम करत आहे. शिवसेनेनं वनगा यांना उमेदवारी देऊन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचंही आदित्यनाथ सभेत म्हणाले. तर, आदित्यनाथ म्हणजे भाड्याचे प्रचारक असल्याचा पलटवार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केला.

योगी आदित्यनाथ यांना निवडणूक प्रचारात उतरवण्यामागे भाजपची नेमकी कोणती रणनीती आहे? हा प्रश्न बीबीसीनं राजकीय विश्लेषकांपुढे उपस्थित केला. यावर बोलताना 'द हिंदू' वृत्तपत्राचे पत्रकार अलोक देशपांडे सांगतात की, "भाजपनं मतदारसंघानुसार जात आणि भाषेच्या आधारावर रणनीती आखली आहे. योगी आदित्यानाथ यांची सभा त्याच रणनीतीचा भाग होता. यातून मराठी आणि उत्तर भारतीय असा संघर्ष उभा राहून त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो."

"भोजपुरी अभिनेते आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांची प्रचारफेरी नालासोपारा येथील उत्तर भारतीयांच्या वस्तीतून आयोजित करण्यात आली होती. शिवाय सध्या उत्तर प्रदेशातील बनासर पट्ट्यातील आमदार आणि नेते शहरी मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत."

फोटो स्रोत, Getty Images

पालघर लोकसभा मतदारसंघाची विभागणी शहरी आणि ग्रामीण नव्हे तर शहरी आणि आदिवासी अशी होते. जास्तीत जास्त मतदार शहरी भागात असून त्यामध्ये उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. या मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा डाव भाजपने आखल्याचं मत आलोक देशपांडे यांनी नोंदवलं.

वनगा कुटुंबीयांना सापत्न वागणूक

चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना दिलेली सापत्न वागणूक यामुळे आधीच मतदारसंघामध्ये नाराजी होती. त्यात वनगा कुटुंबीयांनी थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. पोटनिवडणुकांमध्ये सतत हार मानावी लागत असल्याने भाजप चिंतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्यासाठी व्यक्ती महत्त्वाची नसून जिंकणं महत्त्वाचं असल्याचं आलोक देशपांडे म्हणाले.

"भाजपनं निवडणुकीच्या प्रचारात कसलीच कसर राहू नये यासाठी देशभरातून नेत्यांची फौज या मतदारसंघात पाठवली आहे. डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. वसई महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणच्या एका हॉटेलातून नियोजनाची सूत्रे हलविण्यात येत आहेत", अशी माहिती 'लोकसत्ता'चे पत्रकार सुहास बिऱ्हाडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

फोटो स्रोत, Getty Images

"मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदरमधील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालघर मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. कॉर्पोरेट जनसंपर्क, हायटेक प्रचार यंत्रणा आणि वॉर रूम बनवण्यात आल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबवण्यात येत असून कामात कुठेही ढिसाळपणा येऊ नये आणि नियोजनबद्ध काम व्हावे यासाठी प्रत्येक कामासाठी नेत्यांना स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली", असं सुहास बिऱ्हाडे म्हणाले.

भाजपचा आदिवासी चेहरा

भाजपाचा आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले ठाण्याजनजीकच्या पालघर मतदारसंघातील खासदार चिंतामण वनगा यांचे जानेवारी महिन्यात दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. उच्च विद्याविभूषित वनगा यांनी पालघरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. १९९६ मध्ये वनगा पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये पुन्हा लोकसभा आणि २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत चिंतामण वनगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा २ लाख ३९ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा श्रीनिवास हे उमेदवारीसाठी उत्सुक होते. मात्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान पोटनिवडणूक जाहीर झाली असतानाच वनगा यांची पत्नी जयश्री यांनी पुत्र श्रीनिवास आणि प्रफुल्ल यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला.

स्थानिक राजकीय परिस्थिती

शिवसेनेनं दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात प्रवेश देत शिवसेनेविरोधात रणनीती आखली आहे. काँग्रेसकडून माजी खासदार दामू शिंगडा यांना देण्यात आलेली उमेदवारी आणि बहुजन विकास आघाडीने (बविआ) माजी खासदार बळीराम जाधव यांना रिंगणात उतरवल्यानं ही पोटनिवडणूक चौरंगी होणार असं चित्र सध्यातरी दिसत आहे.

"वसईच्या पश्चिम पट्ट्यातील २९ गावं महापालिकेच्या अखत्यारितून वगळण्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं. पंरतु भाजपा सरकारनं ही गावं महापालिकेत समाविष्ट केल्यानं येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी गावं वगळण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र लोकांचा त्यावर विश्वास नाही. या पट्ट्यातील ख्रिस्ती मतदारांचा कल हा कायमच काँग्रेसकडे राहिला आहे. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्वाची ठरेल", असं मत सुहास बिऱ्हाडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना नोंदवलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

वसईच्या पश्चिम पट्ट्यातील २९ गावं महापालिकेच्या अखत्यारितून वगळण्यासाठी मोठे आंदोलन झाले होते. पंरतु भाजपा सरकारने ही गावं महापालिकेत समाविष्ट केल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

विक्रमगड, जव्हार, तलासरी या भागात आदिवासींची संख्या जवळपास सत्तर हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे ही मतं निर्णायक ठरणार आहेत. या भागात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व आहे. सीपीएम (लाल बावटा) ने किरण गहला यांना उमेदवारी दिली आहे.

गुजराती, पारशी मतदारांसाठी स्मृती इराणींची सभा

"गुजराती आणि पारशी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या डहाणूत प्रचारसभा घेणार आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता गुजराती भाषिक मतदारांसाठी तळ ठोकून आहेत. यावरूनच भाजपनं ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे दिसतं", असंही सुहास बिऱ्हाडे म्हणाले.

मतदारसंघातील प्रश्नांकडे सर्वपक्षीयांची पाठ

पोटनिवडणुकीत कुठलाही पक्ष मतदारंसघातील प्रश्नांवर भूमिका घेत नाही. मात्र पालघर जिल्ह्यातील २६ गांवांमधून जाणारी बुलेट ट्रेन, डहाणूच्या किनाऱ्यावर होऊ घातलेले वाढवण बंदर बडोदा-पनवेल महामार्ग, कुपोषणाची समस्या आणि सूर्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या मतदारंसघात आहेत.

"विकास प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमार आणि साडेतीन हजार शेतकरी उध्दवस्त होण्याचा धोका आहे. शिवाय पालघर जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील टंचाईवर उतारा म्हणून तेथे पाणी हवे असताना, तेथील शेतकरी ते मागत असतानाही सुर्या धरणाचे पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरारला देण्याचा घाट एमएमआरडीएने १३०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाद्वारे घातला आहे. हा घाट कुणासाठी, कशासाठी घातला जात आहे?", असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना उपस्थित केला.

फोटो स्रोत, Ulka Mahajan/Facebook

फोटो कॅप्शन,

सूर्या धरणाचे पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरारला देण्याचा घाट एमएमआरडीएने १३०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाद्वारे घातला आहे. हा घाट कुणासाठी घातला जातोय, असा संतप्त सवाल उल्का महाजन यांनी उपस्थित केला.

"भाजपनं सर्व ताकद पणाला लावली आहे. शिवसेना इथल्या नगरपालिकांमध्ये सत्तेत आहे. त्याद्वारे त्यांनी शांतपणे प्रचार सुरू ठेवला आहे. बलवान उमेदवारच भाजपनं पळवल्यानं काँग्रेसची आधीच गोची झाली आहे. त्यात काँग्रेसचं व्यवस्थापन म्हणावं तितकं मजबूत दिसत नाही. बहुजन विकास आघाडीचं या मतदारसंघात सर्वाधिक वर्चस्व असल्यानं सेना-भाजपनं त्यांना छेडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण आम्ही कुणालाही उत्तर देणार नाही", असं 'बविआ'च्या नेत्यांचं म्हणणं असल्याचं आलोक देशपांडे यांनी सांगितलं.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. पालघर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदान झालं होते. पण मे महिना असल्यानं अनेक मतदार गावी गेले आहेत. तसंच कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या मतदारांनी कामाला दांडी मारण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या

मतदारसंघ २०१४ २०१८

डहाणू २,३०,९०१ २,५१,४३८

विक्रमगड २,४२,१३३ २,५३,१८४

पालघर २,३२,८६० २,५८,७९१

बोईसर २,४५,२२४ २,५७,०१६

नालासोपारा ३,४८,१८६ ४,२९,२७३

वसई २,७८,६०५ २,७४,३०४

एकूण मतदार १५,७७,९०९ १७,२४,००६

पालघर मतदारसंघाची रचना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील दोन विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण जागांना खुले, तर ४ अनुसुचित जाती म्हणजे आदिवासींसाठी राखीव आहेत. सहापैकी वसई (हितेंद्र ठाकूर), नालासोपारा (क्षितीज ठाकूर) आणि बोईसर (विलास तरे) मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. डहाणू (पास्कल धनारे) आणि विक्रमगड (विष्णू सावरा) भाजपच्या ताब्यात आहेत तर पालघरमध्ये अमित घोडा हे शिवसेनेचे आमदार आहेत.

२०१४ मध्ये या लोकसभा मतदारसंघाची मतदारसंख्या १५ लाख ७७ हजार ९०९ होती. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आणि मतदारांचे प्रमाणही वाढले. जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार २०१४ च्या तुलनेत १ लाख ४६ हजार ९७ मतदारांची संख्या वाढली आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. २०१४ रोजी ३ लाख ४८ हजार १८६ मतदार असलेल्या नालासोपारा मतदारसंघात ८१ हजारांची भर पडून मतदारसंख्या आता ४ लाख २९ हजार २७३ एवढी झाली आहे. त्यामुळे नालासोपारा हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ठरला आहे. विशेषतः या मतदारसंघात उत्तर भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)