IPL 2021: भारतीय क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स कुठून आणि कशा आल्या?

  • पराग फाटक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
क्रिकेट, आयपीएल, चीअरलीडर्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

आपला परफॉर्मन्स सादर करताना चीअरलीडर्स

तो दिवस होता 18 एप्रिल 2008. बेंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडिययम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं. बेंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या झहीर खानने पहिला बॉल टाकला. कोलकाताच्या ब्रेंडन मॅक्क्युलमने प्रचंड ताकदीच्या बळावर बॉल स्टेडियममध्ये भिरकावून दिला.

प्रेक्षकांना झहीर आणि मॅक्क्युलम दोघेही लक्षात राहिले नाहीत. कारण तो बॉल प्रेक्षकात जाताक्षणीच डीजेचा आवाज टिपेला पोहोचला आणि बाजूच्या तात्पुरत्या डेकवर चार गौरांगना नाचू लागल्या!हे भारतीय प्रेक्षकांसाठी नवं होतं.

हातात झिरमिळ्या, मिनी- (खरंतर नॅनो) स्कर्ट, वर तंग टॉप (त्याला टॉप म्हणण्यापेक्षा चोळी ही संज्ञा अगदी चपखल), त्यावर त्यांच्या फ्रँचाइजीचे अर्थात टीमचं नाव बोल्ड टाइपात आणि हाय-हील्स शूज, अशा कमनीय बांध्याच्या तरुणींनी तालबद्ध नाच केला... अवघी काही मिनिटंच. मग झहीर पुन्हा रनअपवर आला आणि गौरांगना थांबल्या.

BCCI संचालित आणि ललित मोदी यांचं ब्रेनचाइल्ड असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगने (IPL) पहिल्या फटक्यात चीअरलीडर्स हा आकर्षक प्रकार सादर करत भारतीय क्रिकेटरसिकांना क्लीन बोल्ड केलं.

2007 मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकापासूनच चीअरलीडर्स प्रकाराची क्रिकेटमध्ये सुरुवात झाली. मात्र त्या खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या त्या IPLमुळेच. फोर, सिक्स गेली किंवा एखादी विकेट पडली की नाचणाऱ्या या बया कोण, असा सवाल भारतीय क्रिकेटरसिकांना पडला.

चीअरलीडिंगचा उगम कुठला?

चीअरलीडर्स या संकल्पनेचा उगमही अमेरिकतील. साधारणत: 1869 मध्ये अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाच्या बेसबॉल आणि फुटबॉल सामन्यांदरम्यान या चीअरलीडर्स प्रकाराची पहिल्यांदा नोंद झाली. त्या वेळी खेळाडूच बाकी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत होते. विशेष म्हणजे आता चीअरलीडर्स म्हणजे 'ललना'च असं समीकरण फिक्स्ड आहे. मात्र या परंपरेची सुरुवात पुरुष चीअरलीडर्सनी झाली!

आणि आता जसं तुम्हाला चीअरलीडर्स म्हणजे काहीतरी थिल्लर, मादक, अश्लील असं वाटतंय ना - तसं बिल्कुल नाहीये. जिम्नॅस्टिक्स, गाणं, नृत्य यांनी मिळून बनलेला ही एक कला, एक खेळ आहे. हो खेळ.

आता याला खेळ म्हणावं की नाही यावरून विचारपंडितांमध्ये खल आहे. असो! चीअरलीडर्स हा एक क्रीडाप्रकारच.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

1950 साली युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या फुटबॉल टीमसाठी चीअर करताना चीअरलीडर्स

1894 मध्ये मिनोस्टा विद्यापीठाचा जॉनी कॅम्पबेल नावाचा एक पदवीधर तरुण फुटबॉलच्या सामन्यादरम्यान कंटाळला. यावर उपाय म्हणून त्याने खेळाडूंना आणि आपल्या संघाला म्हणजेच मिनोस्टाच्या नावाने विशिष्ट लयीत प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. सुसंबद्ध प्रकारचं चीअरलीडिंग या दिवशी अस्तित्वात आलं.

यानंतर त्यात गाणं, नृत्य, कसरती असे बदल होत गेले. साधारणत: 1907च्या आसपास चीअरलीडिंगमध्ये महिलांचा समावेश झाला आणि यानंतर या क्षेत्रावर त्यांचीच मक्तेदारी आहे.

अमेरिकेत चीअरलीडिंग हे शालेय, महाविद्यालयीन प्रक्रियेचा हिस्सा आहे. नृत्य आणि जिम्नॅस्टिक्स हे कौशल्य असणाऱ्या मुलींना अगदी लहान वयापासूनच प्रशिक्षण सुरू होतं. केवळ प्रशिक्षणापुरतं याचं स्वरूप मर्यादित नसतं.

चीअरलीडिंगच्या स्थानिक म्हणजे गाव-शहर तसंच आंतरशालेय, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर नियमित स्पर्धा घेतल्या जातात. आपापल्या शाळेत अव्वल असणाऱ्या मुली यामध्ये सहभागी होतात. मात्र हे सगळं अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता.

फोटो स्रोत, Tony Duffy / Getty Images

फोटो कॅप्शन,

1999 सालच्या एका फुटबॉल सामन्यादरम्यान लॉस एंजेलिस रॅम्सच्या चीअरलीडर्स

चीअरलीडिंगच्या निमित्ताने या मुली आपल्या नृत्यावर, शारीरिक कसरतींवर प्रचंड मेहनत घेतात.

चीअरलीडिंग दिसायला आकर्षक असलं तरी प्रत्यक्षात यामध्ये लयबद्धता आणि शिस्तीची प्रामुख्याने गरज असते आणि त्यासाठीच मुलींना कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. व्यावसायिक पातळीवर चीअरलीडिंगच्या अनेक प्रसिद्ध लीग आहेत. यापैकी काही म्हणजे NBA चीअरलीडिंग लीग, NHL आइस डान्सर्स.

IPL दरम्यान दिसणाऱ्या चीअरलीडर्स बघून तुम्हाला हे काहीतरी थिल्लर चाललंय, असं वाटू शकतं. मात्र तसं सर्वस्वी नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images

चीअरलीडिंगसंदर्भात काही आंतरराष्ट्रीय संघटना कार्यरत आहेत. International Federation of Cheerleadingची स्थापना 1998 मध्ये जपानमधल्या टोकियोमध्ये झाली आहे. Universal Cheerleading Association, National Cheerleaders' Association अशा संघटना चीअरलीडर्ससाठी काम करीत आहेत.

चीअरलीडिंग या व्यवसायाचा पसारा आता जगभर पसरला आहे. क्रीडा क्षेत्रातील एक अग्रणी वाहिनी म्हणजे ESPN. या वाहिनीने 1997मध्ये चीअरलीडिंगच्या एका मोठ्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं आणि सारं चित्रच पालटलं. 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'Bring it on' या चित्रपटामुळे चीअरलीडिंगची क्रेझ अजूनच वाढलं.

बिझी वेळापत्रक

या चीअरलीडर्सची काही मुख्य कामं ठरलेली आहेत. स्टेडियममध्ये आपल्या संघांच्या, क्लबच्या खेळाडूंना, संघ-सदस्यांना प्रोत्साहन देणं आणि यासाठी आपल्या नृत्याच्या, कसरतींच्या माध्यमातून डायहार्ड पाठीराख्यांना, समर्थकांना आपल्या संघासाठी घोषणा देण्यासाठी, वाद्यं वाजवण्यासाठी प्रवृत्त करणं. एका प्रकारे संघाच्या विजयात त्या मानसिकदृष्ट्या खूप मोठी भूमिका बजावताना दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

चीअरलीडर्सचं काम वाटतं तेवढं सोपं नसतं

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

दुसरं महत्त्वाचं म्हणजे चीअरलीडर्सचा जो काही वावर असतो तो अगदी वेळेबरहुकूम असतो. विकेट पडल्यावर तत्क्षणी गाण्यावर त्यांचे पाय थिरकायला लागतात. यामध्ये थोडाही उशीर झाला तर गेली सगळी मजा. त्यामुळे खेळावर अचूक लक्ष ठेवून, स्टेडियममध्ये होणाऱ्या घोषणेकडे, आपल्या मॅनेजरच्या सूचनांकडे बारकाईने लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य हालचाली करणं, हा चीअरलीडर्सच्या कामाचा महत्त्वाचा भाग.

चीअरलीडर्स एकेकट्या नाचत किंवा कसरती करीत नाहीत. त्यांची एक टीम असते. आता टीम आली म्हटल्यावर सगळ्यांमध्ये को-ऑर्डिनेशन हवं. एकोपा आणि लय हवी तरच परफॉर्मन्स 'कडक' होऊ शकतो. चीअरलीडर्स ज्याच्यासाठी एवढा अट्टहास करीत आहेत त्या संघासाठीही टीम म्हणजेच एकत्रित येणे अतिशय आवश्यक असते. यामुळे चीअरलीडर्सनाही वैयक्तिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून स्टेडियमवर उतरावे लागते.

याशिवाय दिसण्यावर चीअरलीडर्सना खूप काम करावं लागतं. शरीर सुडौल ठेवण्याकरता चीअरलीडर्सना मेहनत घ्यावी लागते. याच्या बरोबरीने नृत्य, शारीरिक कसरतींसाठी अत्यंत फिट आणि लवचिक शरीराची गरज असते. विभिन्न वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अंगी असणं अत्यावश्यक.

आणि लास्ट बट नॉट द लिस्ट - कामात अधिकाअधिक अचूकता. चीअरलीडर्स प्रामुख्याने नाचतात, अ‍ॅरोबिक्स-जिम्नॅस्टिक्सच्या कसरती करतात, गातात आणि हे सगळे- हजारो प्रेक्षकांच्या समोर, अगदी 'लाईव्ह'. त्यामुळे या सगळ्या स्किल्समध्ये अधिकाअधिक अचूकता आणणं ओघाने येतं.

IPLमध्ये चीअरलीडर्स का?

ललित मोदींच्या डोक्यातून IPL जन्माला आलं. क्लब क्रिकेट कसं असेल यासाठी त्यांनी प्लॅनही आखला. संघांची मालकी बड्या उद्योगसमूहांनी घेतली. पण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रिकेटपल्याड काही गोष्टी करणं आवश्यक होतं. कारण भारतीय टेलिव्हिजनवर 365 दिवसांपैकी 320 दिवस कुठला ना कुठली क्रिकेटची मॅच लाइव्ह दिसत असते. याच्या बरोबरीने अनेक देशांतले लोकल मॅचेसही दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रचंड उष्ण वातावरण, प्रेक्षकांची गर्दी अशा वातावरणात चिअरलीडर्स काम करतात.

एवढं सगळं असताना IPLच्या सामन्यांकडे प्रेक्षकांना कसं खेचायचं, हा यक्षप्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरातूनच चीअरलीडर्स भारतात अवतरल्या. हा विचार तसा क्रांतिकारी होता. कारण मंदिरा बेदींसारख्या महिला अँकर्स मंडळींचा अपवाद वगळता क्रिकेटचा सामना हा पूर्ण सुटाबुटातल्या पुरुष जाणकार मंडळींशी निगडित होता. पण बदलाचे वारे वाहू लागले होते.

मॅचच्या दिवशी चीअरलीडर्सचे शेड्यूल एकदम टाइट असतं. सकाळी त्यांचा नृत्याचा सराव होतो. यानंतर ब्रेकफास्ट, व्यायाम, सराव, जेवण, विश्रांती. यानंतर संध्याकाळी मॅचसाठी स्टेडियमध्ये दीड-दोन तास आधीच त्या दाखल होतात. मॅच सुरू झाल्यापासून त्यांची ड्युटी सुरू. सिक्स, फोर आणि विकेट या तीन गोष्टी चीअर लीडर्सच्या दृष्टीने एकदम महत्त्वाच्या.

चीअरलीडर्सना एक छोटा मंच दिलेला असतो. वरील तीनपैकी काहीही घडले की त्यांना एखाद्या विशिष्ट व्यक्तीद्वारे अथवा इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे इशारा मिळतो आणि त्यांच्या आनंदाला उधाण येतं. डीजेने ठरवून दिलेल्या गाण्यावर त्या नृत्य करतात, विकेट गेली तर थोडा जास्त वेळ मिळतो, तेवढ्या वेळेत काही स्टंट्सही त्या करतात.

याबरोबरीने आपल्या लवचिक शरीराचा उपयोग करीत त्या चित्तथरारक कसरती करतात. आपल्या संघाला प्रेरणा मिळेल आणि प्रेक्षक जागीच खिळून राहतील, याची पुरेपूर दक्षता चीअरलीडर्स घेतात. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसा सामन्यांचा रोमांच वाढत जातो. अंतिम फेरीसाठी काही खास नृत्यप्रकार पेश केले जातात.

IPLचा हंगाम साधारण दीड महिने चालतो. प्रत्येक संघ सात सामने घरच्या मैदानावर तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळतो. विमानतळ-हॉटेल-स्टेडियम ही त्रिसुत्री त्यांना फॉलो करावी लागते.

IPL एप्रिल-मे महिन्यात, म्हणजे सूर्य आग ओकत असताना. कामाची मंडळी ड्रेसिंगरूम आणि कॉमेंट्री बॉक्स असते, जिथे एसी असतो.

चीअरलीडर्स मात्र ग्राऊंडवर असतात, प्रचंड उकाड्यात. त्यांचं वास्तव्य पंचतारांकित हॉटेलांमध्ये असलं तरी काम मैदानावर असतं. सतत करावा लागणारा प्रवास, प्रतिकूल वातावरणात काम आणि भरगच्च वेळापत्रक यादरम्यान तब्येत नीट राखणं, हे चीअरलीडर्ससमोरचं मोठं आव्हान आहे.

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR / Getty Images

फोटो कॅप्शन,

विकेट जाणार का आता? चीअरलीडर्सना सामन्यादरम्यान प्रत्येक बॉलवर लक्ष्य ठेवावं लागतं

विशेष म्हणजे IPLच्या निमित्ताने आलेल्या चीअरलीडर्स बऱ्याचदा युक्रेन, रशिया अशा ठिकाणांहून आलेल्या असतात, ज्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे त्यांना क्रिकेटचा गंधही नाही. त्यांना आपला धोनी आणि श्रीलंकेचा कपुगेडरा दोन्ही सारखेच. त्यामुळे त्यांना आधी क्रिकेटचे बेसिक्स शिकून घ्यावे लागले.

पण चीअर लीडर्स खऱ्या अर्थाने लाइमलाइटमध्ये आल्या त्या मॅचनंतरच्या पार्टीतील सहभागामुळे. मॅचचा शिणवटा घालवण्यासाठी फ्रँचाइजी प्रत्येक सामन्यानंतर दिमाखदार पार्टीचे आयोजन करीत.

देशांतर्गत असो किंवा देशातील स्थानिक क्रिकेट - सगळ्याला संस्कारांची बैठक होती, मात्र IPLने सगळंच एकदम स्पायसी, ग्लॅमराइज्ड होऊन गेलं. IPLच्या निमित्ताने लाँन्च झालेल्या फ्रँचाइज-बेस्ड क्रिकेटमध्ये मॅचनंतर खेळाडूंना पार्टीत सामील व्हावं लागायचं. आणि याच पार्ट्या पुढे वादग्रस्त ठरल्या.

पार्टीदरम्यान चीअरलीडर्स आणि खेळाडू यांच्यात जवळीक वाढत असल्याचं स्पष्ट होऊ लागलं.

चीअरलीडिंग वादाच्या भोवऱ्यात

नृत्य-जिम्नॅस्टिक्स याद्वारे प्रोत्साहनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या तारका आता भलत्याच कारणांसाठी चर्चेत येऊ लागल्या. वृत्तपत्रांच्या पेज-थ्री पुरवण्यांमध्ये याबाबत खमंग चर्चा रंगू लागल्या. मात्र टाळी एका हाताने वाजत नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या गॅब्रिएला पॉस्किल्युटोने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तिची व्यथा मांडली. पार्टीमध्ये आमचा अक्षरक्ष: वापर करण्यात येतो, काही खेळाडू नको तेवढी जवळीक साधतात, असे बरेच गौप्यस्फोट तिने केले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मराठमोळ्या वेशभूषेतील चीअरलीडर्स

विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंचं वर्तन चांगलं असतं, असे तिने लिहिलं. यामुळे संशयाची सुई कोणावर आहे, हे उघड झालं आणि खळबळ उडाली. ग्रॅब्रिएला आपली व्यथा दक्षिण आफ्रिकेतील एका चॅनलला सांगणार होती. चॅनलकरिता ही एकदम सणसणीत स्टोरी होती, मात्र त्याआधाची या ब्लॉगने काही विशिष्ट खेळाडूंची कृष्णकृत्यं समोर आली.

अर्थात गॅब्रिएलाने लिहिलंय ते सगळं खरं आणि खेळाडू चुकीचे, असा अर्थ निघत नाही. पण काही झालं तरी जे होत होतं ते 'स्पिरीट ऑफ द गेम'ला झुगारूनच.

गेल्या वर्षी IPLचा ज्वर फिकाच ठरला. यामुळे वादाचा मुद्दा ठरलेल्या या पार्ट्या बरखास्त करण्यात आल्या. चीअरलीडर्स, त्यांचे पोशाख याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं असतानाच पुणे वॉरिअर्स संघाच्या व्यवस्थापन सहाराने एक वेगळा प्रयोग केला.

त्यांनी देशी चीअरलीडर्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी भारतीय नृत्यांगना, अशी त्यांनी कॉन्सेप्ट बनवली. भरतनाटय़म्, महाराष्ट्रातील लावणी, मणिपुरी, कुचीपुडी, हरयाणवी, बंगाली आणि मोहिनीयट्टम हे सात प्रकार या नृत्यांगना सादर करतात.

"क्रिकेटचं परिमाण बदलत आहे. त्याला करणुकीची फोडणी मिळाली आहे. चीअरलीडर्स हा त्याचाच भाग. चीअरलीडर्समुळे स्टेडियममध्ये येऊन मॅच पाहणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. रणजी तसंच देशांतर्गत स्पर्धांना हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक असतात. IPLचं चित्र निश्चितच वेगळं असतं," असं ज्येष्ठ पत्रकार शरद कद्रेकर यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भारतीय पेहरावातील देशी चीअरलीडर्सचा प्रयोग पुणे वॉरियर्स संघाने केला होता.

"ललित मोदी यांच्या डोक्यातून साकारलेल्या IPL स्पर्धेत असलेल्या चीअरलीडर्स जगप्रसिद्ध NBA अर्थात बास्केटबॉल लीगमधली संकल्पना आहे. अमेरिकेची वागण्याबोलण्याची, कपड्यांची आणि आपली संस्कृती वेगळी आहे. IPLची मॅच चार तास चालते. यामध्ये चीअरलीडर्स 10 मिनिटंही दिसत नाहीत. चीअरलीडर्सपेक्षाही मैदानावरचे खेळाडूंची कामगिरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते," असं ज्येष्ठ पत्रकार व्ही.व्ही. करमरकर यांनी सांगितलं.

"पण चीअरलीडर्सचं काम मेहनतीचं आहे. त्या सुरेख नाचतात. त्याचा आदर करायला हवा. आंबटशौकिनांमुळे किंवा स्पर्धेदरम्यान त्यांना लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागत असेल तर ते निषेधार्थ आहे. चीअरलीडर्समुळे क्रिकेटचं नुकसान झालेलं नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं.

IPLचा अकरावा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आजही चीअरलीडर्स सर्व संघांचा अविभाज्य घटक आहे. IPL स्पर्धेने क्रिकेट बदललं असं जाणकार सातत्याने म्हणतात. त्यादृष्टीने चीअरलीडर्सचं चीअरिंगची संकल्पना फारशी बदलली नसली तरी त्याचं रंग-रूप मात्र प्रंचड बदललंय.

(बीबीसी हिंदीच्या सूर्यांशी पांडे यांनी दिलेल्या माहितीसह)

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ - IPLच्या चीअरलिडर्संचं आयुष्य कसं असतं? (व्हीडिओ स्टोरी - सूर्यांशी)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)