ट्रंप आणि किमची भेट अजूनही शक्य : शनिवारचा बीबीसी मराठी राउंड अप

बीबीसी मराठीच्या महत्त्वाच्या बातम्या इथे वाचा.

किम ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

1. ट्रंप आणि किमची भेट अजूनही शक्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये होणारी प्रस्ताविक भेट डोनाल्ड ट्रंप यांनी रद्द केली होती. या 12 जूनला होणाऱ्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. पण काल अचानक ट्रंप यांनी माघार घेतली. आता पुन्हा एकदा या दोन राष्ट्रप्रमुखांची चर्चा होऊ शकतात याचे संकेत मिळत आहेत.

ट्रंप यांनी भेट होणार का, या माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं, " बघू या काय होतंय... उत्तर कोरियाला ही चर्चा व्हावी असं वाटतंय आणि आमचीही तीच इच्छा आहे. त्यामुळे 12 जूनलाच ही चर्चा होऊ शकते."

तत्पूर्वी किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप यांनी माघार घेतानाची आपली भूमिका स्पष्ट केली. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या पत्रात ट्रंप म्हणाले, "आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात तुमची लवकरात लवकर भेट घ्यायची होती. मात्र तुम्ही प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रचंड राग आणि द्वेष खुलेपणाने दिसत होता. आताच्या घडीला भविष्याचा विचार करून तुमची भेट घेणं रास्त ठरणार नाही."

या निवेदनानंतर आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत, अशी भूमिका उत्तर कोरियाने स्पष्ट केली.

ही चर्चा का फिस्कटली याचं विश्लेषण वाचण्यासाठी क्लिक करा.

2. कर्नाटकात कुमारस्वामींची फ्लोअर टेस्ट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातलं एक दृश्य

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काल विधानसभेत त्यांच्या सरकारचं बहुतम सिद्ध केलं. कर्नाटकचा भाजपविरोधाचा पॅटर्न आता देशभरात चालणार का आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होणार याचीच चर्चा जास्त होती.

कुमारस्वामींच्य शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील भाजपविरोधी नेते एकत्र आले होते. आता कर्नाटक विधानसभेत ही मोदीविरोधी आघाडी बहुमत सिद्ध करेल. राष्ट्रीय पातळीवरच्या महाआघाडीची ही नांदी म्हणावी का? यावर राजकीय विश्लेषक जयशंकर गुप्त यांनी केलेलं विश्लेषण इथे वाचा.

3. युरोपला जाण्यासाठी सर्वस्व पणाला का लावताहेत नायजेरियन?

फोटो स्रोत, COLIN FREEMAN

फोटो कॅप्शन,

इव्हान्स विलियम

युरोपात पोहोचण्यात अयशस्वी झालेल्या 3,000 हून अधिक नायजेरियन स्थलांतरितांना 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन'च्या मार्फतीने मायदेशी पाठवलं जात आहे.

यांच्यापैकी कित्येकांनी होतं नव्हतं ते सर्वकाही विकून युरोपपर्यंतच्या प्रवासखर्चासाठी पैसे जमवले होते. पण आता त्यांना हे कळत नाहीये की मायदेशी परतल्यावर आपल्या कुटुंबीयांना कसं तोंड द्यायचं. त्यापैकी एक इनव्हान्स विलियमची कहाणी वाचण्यासाठी करा.

4. #Metoo हार्वे वाइनस्टाइन यांना जामीन, तर मॉर्गन फ्रीमनवर आरोप

लैंगिक छळ प्रकरणी हार्वे वाइनस्टाइन यांच्यावर काल न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला. यासंदर्भात बीबीसीनं बातमी दिली आहे. त्यांना 10 लाख डॉलरच्या जामीनावर मुक्त करण्यात आलंय. तर दुसरीकडे हॉलिवूड अभिनेते मॉर्गन फ्रीमन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचे आरोप झाले आहेत. फ्रीमन यांनी आपला लैंगिक छळ केला, असा आरोप आठ महिलांनी केल्यानंतर फ्रीमन यांनी माफी मागितली आहे.

मॉर्गन फ्रीमन यांनी बॅटमन ट्रायोलोजी, शॉशँक रिडम्पशन, ब्रूस ऑल्माइटी आणि मिलियन डॉलर बेबी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. "फ्रीमन यांनी माझा स्कर्ट उचलण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं तू अंतर्वस्त्र घातली आहेत का?" असं प्रॉडक्शन असिस्टंटने म्हटलं आहे. ही सविस्तर बातमी वाचा.

5. मुलाला घराबाहेर काढण्याची कोर्टाची परवानगी

न्यूयॉर्कच्या एका जोडप्याने दाखल केलेल्या एका विचित्र खटल्याची बातमी बीबीसीनं दिली आहे. 'आमचा मुलगा 30 वर्षांचा झालाय. तो काही काम करत नाही, घर चालवायला हातभारही लावत नाही, म्हणून आम्ही त्याला घरातून काढायची कायदेशीर परवानगी मागतो', असा खटला न्यूयॉर्कच्या एका जोडप्याने कोर्टात भरला. आणि तो खटला ते जिंकलेही.

मायकल रोटोंडो यांना घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी न्यूयॉर्कच्या एका कोर्टात धाव घेतली.

"मी घरातून तीन महिन्यात बाहेर पडणारच होतो. आणखी थोडा काळ ते वाट पाहू शकले नसते का? मी आणखी सहा महिने घरात राहिलो तर काय होईल?" असा प्रतिवाद मायकल यांनी कोर्टात केला. त्यांचे आई-वडिल वकिलाच्या शेजारी बसून ही सुनावणी ऐकत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)