#5मोठ्याबातम्या : उद्धव यांनी ऐकवली मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप

फडणवीस Image copyright PUNIT PARANJPE/Getty Images

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे:

1. मुख्यमंत्री म्हणतात, साम, दाम, दंड, भेद वापरा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनिमित्त पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप ऐकवली.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हे संभाषण झाल्याचं सांगताना निवडणूक आयोगानं याची चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करण्याविषयी सांगतात.

"ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.

"कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे," असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचं यात ऐकू येतं.

या ऑडिओ क्लिपची तक्रार आपण निवडणूक आयोगाकडे करणार असून खरी क्लिपही उद्या जाहीर करणार असल्याचं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

2. हैदराबाद IPLच्या फायनलमध्ये

सनरायझर्स हैदराबाद संघाने IPL क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघावर १३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता रविवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जबरोबर त्यांचा अंतिम सामना होईल, असं महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright GETTY IMAGES/NOAH SEELAM

ईडन गार्डन्सवर शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश राखला होता. मात्र, राशिद खानने १० चेंडूंत ४ षटकार व २ चौकारांसह नाबाद ३४ धावांची भर घालून हैदराबादला ७ बाद १७४ धावांपर्यंत पोहोचविले.

3. ट्रंप आणि किमची भेट अजूनही शक्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये होणारी प्रस्ताविक भेट डोनाल्ड ट्रंप यांनी रद्द केली होती.

Image copyright Getty Images

या 12 जूनला होणाऱ्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. पण काल अचानक ट्रंप यांनी माघार घेतली. आता पुन्हा एकदा या दोन राष्ट्रप्रमुखांची चर्चा होऊ शकतात याचे संकेत मिळत आहेत असं बीबीसी हिंदीच्या वृत्तात म्हटलं आहे.

ट्रंप यांनी भेट होणार का, या माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं, " बघू या काय होतंय... उत्तर कोरियाला ही चर्चा व्हावी असं वाटतंय आणि आमचीही तीच इच्छा आहे. त्यामुळे 12 जूनलाच ही चर्चा होऊ शकते."

तत्पूर्वी किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप यांनी माघार घेतानाची आपली भूमिका स्पष्ट केली. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या पत्रात ट्रंप म्हणाले, "आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात तुमची लवकरात लवकर भेट घ्यायची होती. मात्र तुम्ही प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रचंड राग आणि द्वेष खुलेपणाने दिसत होता. आताच्या घडीला भविष्याचा विचार करून तुमची भेट घेणं रास्त ठरणार नाही."

या निवेदनानंतर आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत, अशी भूमिका उत्तर कोरियाने स्पष्ट केली.

4. चंदा कोचर यांना सेबीची नोटीस

व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या विस्तारीत कर्ज प्रकरणात सेबीने ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना नोटीस बजाविली आहे.

Image copyright Getty Images

लोकसत्ताने याबाबत वृत्त दिलं आहे. या नोटीसीद्वारे सेबीने कोचर यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहे.

व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला 2012मध्ये बँकेने 3,250 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवर कंपनीचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची 64 कोटी रुपयांची गुंतवणूकही आहे.

त्यामुळे पतीशी संबधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने यापूर्वीच प्राथमिक तपास सुरू केला आहे.

5. कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनवर कोर्टाची बंदी

दिल्ली हायकोर्टाने कोब्रापोस्टच्या कथित स्टिंग ऑपरेशनचा व्हीडिओ दाखवण्यास बंदी घातली आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कोब्रा पोस्टने विविध माध्यम समूहांचं स्टिंग ऑपरेशन करत हे समूह गैरप्रकरणात कसे गुंतले आहेत हे दर्शवण्याचा प्रयत्न केला.

Image copyright Zolnierek

पेड न्यूज, धार्मिक अजेंडा, ध्रुवीकरण याबाबत माध्यमांची भूमिका कोब्रा पोस्टने जाणून घेतली. कोब्रा पोस्टतर्फे या स्टिंग ऑपरेशनचे व्हीडिओ वेबसाइटवर टाकण्यात आले.

दैनिक भास्कर समूहाने या स्टिंग ऑपरेशनविरोधात कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या प्रकरणात पुढील आदेशापर्यंत व्हीडिओ प्रसिद्ध करण्यास संस्थेला प्रतिबंधीत केलं.

पहिल्या भागात कोब्रा पोस्टने 17 माध्य समूहांच स्टिंग ऑपरेशन केलं होते. दुसऱ्या भागात देशातील विविध मोठ्या माध्यम समूहांचा यात समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संभाव्य लशीचं उत्पादन सुरू, पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटशी करणार करार

रायगड किल्ल्याचं संवर्धन आणि शिवस्मारक कुठे अडकलं?

मुंबईतील बीकेसीच्या कोव्हिड-19 रुग्णालयात खरंच पाणी साचलं होतं का?

RPF जवान जेव्हा बाळासाठी दूध घेऊन चालत्या ट्रेनमागे धावतो

'माझ्या बहिणीचं कुटुंब डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत होतं अन् मी काहीच करू शकलो नाही'

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना जात का विचारली जात आहे?

UPSC वेळापत्रक जाहीर : पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबरला होणार

चक्रीवादळानं झोडपलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपयांची मदत, वीज पुरवठा अजूनही खंडीत

छायाकल्प चंद्रग्रहण पाहताना काय काळजी घ्याल?