#5मोठ्याबातम्या : मोदी सरकारची 4 वर्षं, काँग्रेसचा 'विश्वासघात' दिन

नरेंद्र मोदी Image copyright Kevin Frayer/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या.

1. स्वतःला वाचवण्यासाठी विरोधक एकत्र - नरेंद्र मोदी

सर्व विरोधी पक्ष हे केवळ भ्रष्टाचाराविरोधी कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकत्र आले आहेत, देशाला वाचवण्यासाठी नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रातील सरकारला चार वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त ओडिशा इथं आयोजित ते सभेत बोलत होते. सरकार हे जनतेच्या वचनावर चालत अलून विरोधकांनी निर्माण केलेल्या संभ्रमावर नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या सत्तर वर्षांच्या तुलनेत मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कालावधीचा आढावा सादर केला. शिवसेना बरोबर राहावी अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी राहुल गांधी यांची त्यांचाच पक्ष दखल घेत नसल्याची टीका केली.

काँग्रेसने 'विश्वासघात, चलाख्या, सूडबुद्धी आणि खोटारडेपणा' या चार शब्दांत केंद्रातील भाजप सरकारच्या कारकिर्दीचे वर्णन केलं. काँग्रेसने कालचा दिवस 'विश्वासघात' दिवस म्हणून पाळला.

2. मुख्यमंत्री म्हणतात ती ऑडिओ क्लिप माझीच

"पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर उतरली आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनेनं माझी ऑडिओ क्लिप मोडून-तोडून सादर केली", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

पालघरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली होती. त्यात ते साम, दाम, दंड, भेद रणनितीचा वापर करण्याविषयी कार्यकर्त्यांना सांगत होते.

या क्लिपविषयी स्वतः मुख्यमंत्री यांनीच खुलासा केला आहे. ते वसईत बोलत होते.

"ही संपूर्ण ऑडिओ क्लिप 14 मिनिटांची आहे. मी स्वत: ती क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असं या क्लिपमधील शेवटचं वाक्य होतं. मात्र ते त्यांनी दाखवलं नाही. ते दाखवलं असतं, तर शिवसेना तोंडावर पडली असती," असं मुख्यमंत्री म्हणाले.

3. भाजपविरोधी आघाडीत सेना नाही- काँग्रेस

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी तयार होत असली तरी त्यात शिवसेनेच्या सहभागाची शक्यता काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी फेटाळून लावली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनु सिंघवी

लोकसत्ताने याबाबत वृत्त दिलं आहे. महाराष्ट्रातही शिवसेना भाजपविरोधात बोलत आहे. अशावेळी भाजविरोधात उभ्या राहणाऱ्या आघाडीत त्यांचा समावेश असेल का, असं सिंघवी यांना विचारल्यावर वैचारिक मतभेदाचा मुद्दा उपस्थित करून ते फेटाळून लावलं.

दुसरीकडे कोल्हापूर इथं बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेशी युती ही भाजपची अगतिकता असल्याचं मत व्यक्त केल्याचं वृत्त दिव्य मराठीनं दिलं आहे.

शिवसेना भाजप युती न झाल्यास राज्यात पुन्हा काँग्रेस विजयी होईल आणि काँग्रेसचा कारभार जनतेनं अनुभवला आहे. शिवसेनेला आम्चायशी युती करायची नसेल तर तो त्यांचा प्रश्न असल्याचंही ते म्हणाले.

4. तर भारत नाही म्हणनार नाही - राजनाथ सिंग

जर पाकिस्तान बोलण्यासाठी पुढाकार घेत असेल तर भारताची काहीच हरकत राहणार नसल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

भारत चर्चेसाठी प्रतिकूल नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पाकिस्ताननेही यात पुढाकार घ्यावा. अतिरेक्यांविरोधात दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आमच्या शेजाऱ्यांबरोबर चांगले संभद असावेत असं आम्हालाही वाटतं. ते जर बोलण्यास तयार असतील आम्ही का नाही? असंही राजनाथ सिंग यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.

5. चँपियन्स लीगमध्ये रिआल माद्रिदची सरशी, भारतात IPL फीवर टिपेला

चँपियन्स लीगच्या फायनलमध्ये रिआल माद्रिद आणि लिव्हरपूल यांच्या दरम्यानच्या सामन्याकडे जगभराताले फुटबॉलप्रेमी डोळे लावून बसले होते. अविस्मरणीय सामन्यात अखेर रिआल माद्रिदनं चँपियन्स लीग जिंकली. गॅरेथ बेलच्या अविस्मरणीय गोलने रिआल माद्रिदला हा विजय मिळवून दिला. यासंदर्भातल्या बातम्या बीबीसीच्या वेबसाईटवर वाचता येतील.

इकडे भारतात IPL फीवर टिपेला पोहोचला आहे. अंतिम फेरीत पोहोचलेले चेन्नई सुपरकिंग्ज आणि हैदराबाद सनरायझर्स या दोन्ही संघात आज सांयकाळी अंतिम सामना होत आहे.

Image copyright Getty Images

कोण अव्वल याचा फैसला करण्यासाठी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा निकाल लागेल. चेन्नई सुपर किंग्जला तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. तर २०१६मध्ये विजेता ठरलेला हैदराबादचा संघही या लीगमधील अखेरच्या काही सामन्यातील पराभवांची मालिका विस्मृतीत टाकून दुसऱ्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादची मदार ही अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशीद खानवर प्रामुख्याने असेल. चेन्नईचा भर हा आघाडीचे फलंदाज शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबटी रायुडू यांच्यावर असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)