आंबेडकर जयंती: 'यावरून वाद झाला आणि आम्हाला एकप्रकारे वाळीत टाकलं गेलं'

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

"भेदभाव शहरातही आहे आणि मी त्याचा सामना केला आहे." शिल्पा कांबळे अगदी स्पष्टपणे हे सांगतात तेव्हा त्यांचे बोलके डोळे वास्तव किती गंभीर आहे याचीही जाणीव करून देतात.

शोषितांची बाजू आपल्या लिखाणातून प्रभावीपणे मांडणाऱ्या नव्या पिढीच्या लेखिकांमध्ये शिल्पा कांबळे यांचं नाव आघाडीवर आहे. 'निळ्या डोळ्यांची मुलगी' ही कादंबरी, 'बिर्याणी' हे नाटक आणि अन्य लेखनातून दलित साहित्याविषयीचे पूर्वग्रह मोडकळीस आणणाऱ्या लेखिका म्हणून शिल्पा यांची ओळख आहे. पण ही ओळख निर्माण करण्यापर्यंत वाटेवरचा काटेरी प्रवास त्यांनाही चुकलेला नाही.

त्याच प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही भांडूपमधल्या एका सरकारी वसाहतीत त्यांच्या घरी पोहोचलो. तिथं सामानाची आवराआवर सुरू होती. घर बदलण्याच्या धावपळीतून वेळ काढून शिल्पा मुलाखतीसाठी बसल्या.

खडतर सुरुवात

आपल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी शिल्पा सांगतात, "मी विक्रोळीमध्ये राहायचे लहानपणी. ते दिवस गरिबीचे होते. तिथे फ्री पाव मिळायचे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही खूप वेळ लाईन लावून बसायचो. मला शिक्षणाची मात्र पहिल्यापासून खूप आवड होती."

लहानपणी ना गरीबीची जाणीव होती, ना फारसा कधी भेदभाव सहन करावा लागला. पण कॉलेजमध्ये सगळं जणू त्यांच्या अंगावरच आलं.

"मला 85 टक्के मार्क होते आणि ओपनमधले प्रवेश 87 मार्कांवर संपले. तेव्हा कोट्यामधून अॅडमिशन, आरक्षण, जात म्हणजे काय ते कळालं. मित्र मंडळींतून हे कळायला लागलं की ओपनवाले आणि रिझर्व्ह कॅटेगरीतले असे गट आहेत. त्याचा मग त्रास झाला," त्या सांगतात.

सुशिक्षित समाज आता जातीभेद पाळत नाही, असं म्हणतात. पण शिल्पा यांना सहन करावं लागलेलं वास्तव काही वेगळं आहे.

"मी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला गेलेले. तिथे एक माझ्या ओळखीची मुलगी आली. खूप हसली ती मला कुत्सितपणे की, तुझ्यासारख्या मुली स्पर्धेला यायला लागल्या म्हणजे काय? तिनं माझा अपमान केला. मग मी खूप अभ्यास केला आणि एका वादविवाद स्पर्धेत तिला हरवलं. पण हा एक किस्सा माझ्या मनावर खूप परिणाम करून गेला."

पण अशा प्रसंगांनी शिल्पा यांना आणखी कणखरही बनवलं आणि शिक्षणानंतर त्यांनी आयकर अधिकारी म्हणून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला.

कसा केला जातीभेदाचा सामना?

"ऑफिसमध्ये तर आरक्षणाचा मुद्दा आला तर लोक आपल्याला उद्देशून बोलतातच. मला ऑफिसमध्ये अद्याप असा एकही व्यक्ती भेटलेला नाही जो ओपन कॅटेगरीचा आहे आणि त्यानं आरक्षण ही संकल्पना मान्य केली आहे," त्या सांगतात.

प्रश्न केवळ आरक्षण आणि बढतीचा नाही, तर मिळणाऱ्या वागणुकीचाही असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं.

"ऑफिसमध्येच कोणीतरी न्यूड पेंटिंग केलं होतं माझं पुरुषांच्या टॉयलेटमध्ये. इतर मुली काम करत होत्या माझ्याबरोबर पण त्यांचं न करता माझंच का केलं, हे मला कळत नाही. मीच का?"

शिल्पा यांनी स्वतःच आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही दिलं आहे. "मला असं वाटतं की अप्रत्यक्षपणे मनात बाईविषयी तिरस्कार असतो. दुसऱ्या जातीच्या बाईविषयी आणखी जास्त तिरस्कार असतो. त्यात लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या आणि बोलणाऱ्या बाईचा जास्त तिरस्कार केला जातो."

एकदा आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमावरून त्यांच्या कॉलनीतच वाद झाले होते.

"खूप विरोध झाला आणि आम्हाला एक प्रकारे वाळीत टाकण्यात आलं होतं. माझ्या मुलाशी इतर मुलं खेळायची नाहीत, आमच्याशी जे लोक बोलायचे त्यांनी बोलणं बंद केलं." पण अशा घटनांतून उलट आणखी पुढे जाण्याची चेतना मिळाल्याचं शिल्पा आवर्जून सांगतात. त्यांच्या जाणीवा रुंदावत गेल्या तसं त्यांच्यातला लेखकही घडत गेला.

'निळ्या डोळ्यांची मुलगी'

शिक्षणासोबतच शिल्पा यांना वाचनाची गोडी लागली. नावाजलेल्या मराठी पुस्तकांपासून गॅब्रिएल गार्सिया मार्केजसारख्या आंतरराष्ट्रीय लेखकांपर्यंत अनेकांचं साहित्य त्यांनी वाचून काढलं.

पण शिल्पा यांना मराठी साहित्यात आपलं प्रतिबिंब दिसत नव्हतं.

"गौरी (देशपांडे) असेल, सानिया असेल, मेघना (पेठे) असेल, त्या सगळ्या वाचल्यावरती मला असं वाटलं की माझ्या समाजातून मला जे सांगायचंय, आमच्या स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत, त्याच्यावरचे जे उपाय आहेत ते या पुस्तकांमध्ये नाहीयेत."

"त्यांचा जो फेमिनिझम होता, तसं समाजजीवन आम्ही बघत नव्हतो. आमच्याकडे मारणारे नवरे होते, दारू पिणारे नवरे होते, समंजस पुरुष जसा त्यांच्या साहित्यामध्ये असतो, तसा आमच्याकडे दिसत नव्हता."

साहित्याच्या त्या मुख्य प्रवाहातलं लिखाण आणि दलितांचं जीवन यांत मोठी तफावत होती.

"मग आपण आपलं लिहायला पाहिजे, अशी एक जबाबदारी माझ्यावर आहे असं मला वाटायला लागलं." हा विचारच शिल्पा यांच्यातल्या लेखकाला प्रेरणा देऊन गेला.

'मला स्वप्न द्यायचं आहे'

लिहिती झाल्यावर शिल्पा यांनी कादंबरीचा पर्याय निवडला. "फिक्शनमध्ये, कल्पनारम्य लिखाणात तुम्ही स्वप्न पाहू शकता आणि एक समांतर, सुंदर जग निर्माण करू शकता. आणि मला स्वप्न द्यायचं आहे. जगण्यासाठी शोषितांना जे लागतं. जर स्वप्न नाही दिलं तर ते जगू शकणार नाहीत."

"मला पॉवरलेस लोकांची कहाणी पॉवरफुल पद्धतीनं सांगायची आहे." शिल्पा यांचं हे सूत्र त्यांच्या दोन्ही कलाकृतींमधून झळकतं.

'निळ्या डोळ्यांची मुलगी' या कादंबरीत शिल्पा यांनी उल्का आणि मीरा या दोन मुलींची गोष्ट सांगितली आहे. एकीला आंबेडकरवाद आणि त्यातून आत्मसन्मान मिळतो, तर दुसरी त्या विचाराला आपलं करत नाही, आणि तिचं पुढं काय होतं, ते या कादंबरीतून शिल्पा यांनी मांडलं आहे.

तर गोमांसावरील बंदीनंतर आलेलं 'बिर्याणी' हे नाटक एक मुस्लीम आणि एक दलित अशा दोन स्त्रियांची कहाणी सांगतं.

दलित समाजाच्या, विशेषतः स्त्रियांच्या भावविश्वावर लिहिण्यासारखं खूप काही आहे, असं शिल्पा यांना वाटतं. मराठी साहित्याची मेनस्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाह आणि दलित साहित्य अशी विभागणी त्यांना मान्य नाही.

"मला वाटतं चांगला वाचक असतो, तो पुस्तकांत भेद करत नाही. आपण का वाचतो? आपल्यापेक्षा वेगळं जीवन वाचण्यामध्ये उत्सुकता वाटत असते. सवर्ण समाज दलित साहित्य वाचत नाही असं नाहीये, उलट त्यांनी पाठिंबा दिला आहे. मध्यमवर्गातले पांढरपेशे वाचक आहेत दलित साहित्याचे," त्या सांगतात.

"मला वाटतं साहित्यात या प्रश्नाचं उत्तर नाहीये, समाजात या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय लोकांच्या DNAमध्ये जात आहे. ही जर जात निघून गेली, तर नक्कीच साहित्यात जातीचे पडसाद नाही येणार, ना वाचक म्हणून, ना लेखक म्हणून."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)