चेन्नई सुपर किंग्सने तिसऱ्यांदा पटकावलं IPLचं जेतेपद : बीबीसी मराठी सोमवारचा राउंड अप

1. धोणीच्या चेन्नईने पुन्हा पटकावलं IPLचंजेतेपद

विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स
फोटो कॅप्शन,

विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स

IPL 2018चा चषक अखेर चेन्नई सुपर किंग्सने पटकावला. रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने हैदराबाद सनरायझर्स 179 धावांचं आव्हान सहज पेललं. म्हणजे अगदी दोन षटकं आणि आठ विकेट राखत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघानं हा सामना जिंकला. सोबतच त्या चमचमत्या चषकावर आपलं नाव तिसऱ्यांदा कोरलं.

चौफेर फटकेबाजी करणाऱ्या शतकवीर शेन वॉटसनला सामनावीर तर वेस्ट इंडीजचा फिरकीपटू सुनील नरिनला मालिकावीर घोषित करण्यात आलं.

बीबीसी मराठीच्या वाचकांनी या सामन्याविषयी काय भाकित केलं होतं? वाचा इथे

2. लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची एक सेंट्रल यादी तयार होतेय

देशामध्ये वाढत जाणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे चिंतेत पडलेलं केंद्र सरकार आता असे लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची एक सेंट्रल यादी तयार करणार आहे.

असं करणारा भारत जगातला नववा देश आहे. यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, ग्रेट ब्रिटन, त्रिनिदाद टोबॅगो यांसारख्या देशांकडे लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची नोंद करण्याचा स्वतंत्र विभाग आहे.

भारतानं ही नोंद ठेवण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे (NCRB) सोपवली आहे. ते 'नॅशनल सेक्स ऑफेंडर रजिस्ट्री'मध्ये ही सगळी नोंद ठेवतील.

काय असतील या यादीतील तरतुदी? वाचा इथे

3. हा मराठी पंतप्रधान आयर्लंडमध्ये इतिहास घडवतोय

फोटो कॅप्शन,

लिओ वराडकर

गर्भपातासंबंधी आयर्लंडमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वमत चाचणीत जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे. या सार्वमतामुळे आता महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या 12 आठवड्यांत गर्भपात करता येईल. 12 आठवड्यांपुढे जर महिलेची तब्येत गंभीर होणार असेल तरच गर्भपाताची परवानगी मिळेल. तसंच गर्भामध्ये व्यंग आढळल्यासही गर्भपात करता येईल.

हा कौल आयर्लंडचे मराठमोळे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्यासाठी मोठा विजय मानला जात आहे. तुम्हाला माहितीये की वराडकर मूळचे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गमधल्या मालवणचे. आणि कसं हा मराठी माणूस तिथे इतिहास घडवतोय? वाचा संपूर्ण बातमी

4. कोण म्हणतं महाराष्ट्रात पाणी टंचाई नाही?

फोटो कॅप्शन,

पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे

मे महिना सुरू आहे, सूर्य आग ओकतोय आणि त्यात भर पडली आहे ती भीषण पाणीटंचाईची. त्यातही गुडघेदुखीने त्रस्त मायाताई इनकाने यांना पाणी भरायला 500 फूट लांबवर असलेल्या हँडपंपावर जावं लागतं. किमान दोन घागरी पिण्याचं पाणी मिळण्यासाठी त्यांना तासनतास वाट बघावी लागते. जेव्हा पाणी मिळतं तेव्हा ते 20 पायऱ्या चढून आणावं लागतं.

ही परिस्थिती आहे यवतमाळच्या एका सोसायटीतली. आणि केवळ यवतमाळच नव्हे तर जालना, मनमाड, सोलापूर आणि परभणीमध्ये काही अशीच दृश्यं दिसून आली आहेत, जिथे लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.

जाणून घ्या पाण्याच्या भीषण परिस्थितीविषयी बीबीसी मराठीच्या या मालिकेतून - कोण म्हणतं महाराष्ट्रात पाणी टंचाई नाही?

5. तो पाकिस्तानातून चुकून भारतात आला अन्...

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : चुकीची ट्रेन पकडून 'तो' भारतात आला अन्...

कमी गुण मिळाल्यामुळे 10 वर्षांच्या सिराजचा त्यांच्या पालकांसोबत वाद झाला. रागाच्या भरात सिराजने पाकिस्तानातल्या शरकूल गावातल्या घरातून त्यांनी पळ काढला आणि कराचीला जाण्याचा निर्धार केला. पण लाहोर रेल्वे स्टेशनवर सिराज चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आणि कराचीला जाण्याऐवजी भारतात पोहोचले. ही 24 वर्षांपूर्वीची गोष्ट.

भारतात चुकून आलेला सिराज परत जाऊ शकला की नाही? वाचा सिराजची पूर्ण कहाणी इथे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)