IPL : धोनीची 'डॅडी आर्मी'च ठरली 'बाप'!

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स Image copyright BCCI
प्रतिमा मथळा तिशी ओलांडलेले सर्वाधिक खेळाडू असलेल्या चेन्नईने आयपीएल जेतेपदावर नाव कोरले.

क्रिकेच्या परिभाषेत सीनियर सिटिझन्सचा संघ अशी टीका झालेल्या चेन्नई सुपर किंग्सने IPL जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.

यंदाच्या IPL लिलावानंतर सगळ्या टीमचा चेहरामोहरा स्पष्ट झाला. दोन वर्षानंतर IPLमध्ये परतलेल्या महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर 'डॅडी आर्मी' अशी खोचक टीका झाली होती.

ट्वेन्टी-20 सारख्या वेगवान फॉरमॅटमध्ये या वडीलधाऱ्यांच्या संघाला जेतेपद जिंकणं जड जाईल अशी भाकितं क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केली. तिशी ओलांडलेल्या खेळाडूंचा सर्वाधिक भरणा असल्याने चेन्नईला ही बिरुदावली मिळाली. स्पर्धा सुरू झाल्यावर राजकीय आंदोलनाच्या कारणास्तव चेन्नईला घरच्या मैदानावर अर्थात चेन्नईत खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं.

पुण्याजवळच्या गहुंजे इथल्या स्टेडियमला उसनं घर मानणाऱ्या चेन्नईच्या डॅडी आर्मीने सगळी प्रतिकूल समीकरणं बाजूला सारत जेतेपदावर नाव कोरलं. चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदाच्या वाटचालीत या डॅडी आर्मीनेच निर्णायक भूमिका बजावली.

वाढत्या वयानुसार हालचाली मंदावतात, हा समज गैरसमज असल्याचं चेन्नई सुपर किंग्सने सिद्ध केलं. चेन्नई टीमने वयानुरूप येणाऱ्या मर्यादा जाणल्या आणि त्यानुसार रणनीती आखली. आयपीएल स्पर्धेतील बहुतांशी संघ जास्तीत जास्त युवा खेळाडूंना सामील करून घेत असताना चेन्नईने अनुभवाला प्रमाण मानलं.

धोनीचा डंका

वनडे आणि ट्वेन्टी-20 फॉरमॅटमधला बेस्ट फिनिशर्सपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. दडपणाच्या क्षणी 20 बॉल 50, 40 बॉल 70 अशा शेकड्याने खेळी साकारणाऱ्या धोनीमध्ये आता ती जिगर राहिली नाही अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती.

गेल्या वर्षी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं आव्हान लीग स्टेजला संपुष्टात आल्यानंतर तो धोनी हरवला असं त्याचे चाहतेही म्हणू लागले होते. मात्र पस्तिशीकडे झुकलेल्या धोनीने कर्णधार आणि बॅट्समन अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार परफॉर्म्स देत संघाला विजयश्री मिळवून दिली.

धावगती वाढत असतानाही थंडपणे बॉलर्सवर प्रहार करणारा पूर्वीचा धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळाला. चतुर कॅप्टन्सीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने यंत्रवत सातत्यासह आखलेल्या रणनीतींची चोख अंमलबजावणी केली.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स Image copyright Chennai Super Kings
प्रतिमा मथळा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि हरभजन सिंग

महेंद्र सिंग धोनीची लाडकी लेक झिवा आपल्या बाबांइतकीच सोशल मीडियावर चर्चेत होती.

लाडक्या लेकी सोशल मीडियावर व्हायरल

मॅचआधी, मॅचदरम्यान आणि मॅच संपल्यानंतर झिवाच्या बाललीला धोनीने अनेकदा शेअर केल्या. त्याला तुडुंब प्रतिसादही मिळाला. हरभजन सिंग आपल्या लेकीसोबत खेळतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. चेन्नईला प्लेऑफमध्ये अविश्वनीय विजय मिळवून देणारा फॅफ डू प्लेसिस आपल्या कुटुंबकबिल्यासह फिरताना दिसत होता.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स Image copyright Twitter
प्रतिमा मथळा फॅफ डू प्लेसिसनेच चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये विजय मिळवून दिला.

यंदाच्या आयपीएल लिलावावेळी चेन्नई सुपर किंग्सने 33 वर्षांच्या फॅफ डू प्लेसिसला राइट टू मॅच अर्थात प्लेयरला आपल्याच ताफ्यात राखण्याचा पर्याय स्वीकारला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेला फॅफ ट्वेन्टी-20चा स्पेशालिस्ट असल्याने फारशी टीका झाली नाही.

भज्जीने तारलं

भारतीय क्रिकेट निवड समितीच्या स्कीम ऑफ थिंग्जमधून बाहेर पडलेल्या 37वर्षीय हरभजनला चेन्नईला संघात घेतलं त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मुंबई इंडियन्ससाठी दहा वर्ष खेळलेला हरभजन निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. कारकीर्दीची संध्याकाळ अनुभवणाऱ्या हरभजनला घेऊन चेन्नईने काय साधलं अशी टीका सोशल मीडियावरून करण्यात आली.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स Image copyright Chennai Super Kings
प्रतिमा मथळा जेतेपदाच्या करंडकासह हरभजन सिंह आणि अंबाती रायुडू

हे कमी की काय म्हणून हरभजनला साथ देण्यासाठी चेन्नईने 38 वर्षांच्या इम्रान ताहीरला आपल्याकडे खेचलं. विकेट मिळाल्यानंतर अख्ख्या मैदानभर फेरी मारण्याचं अनोखं सेलिब्रेशन करणाऱ्या वयस्क ताहीरला का घेतलं म्हणून मंडळी टीका करू लागली.

ट्वेन्टी-20 प्रकारात ताहीर हमखास पार्टनरशिप तोडतो. मोक्याच्या क्षणी विकेट मिळवणारा ताहीर मॅचविनर आहे. मात्र त्याचं वय त्याच्या कामाआड येऊ शकतं का असे प्रश्न विचारण्यात आले.

रायुडूचा दणका

अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचा आधारस्तंभ असलेल्या 32वर्षीय अंबाती रायुडूला लिलावावेळी आपल्या कॅम्पमध्ये सामील करण्यासाठी चेन्नईने उत्सुकता दाखवली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समकालीन रायुडू ... वर्ल्डकपचा समकालीन आहे. प्रतिबंधित इंडियन क्रिकेट लीगचा भाग झाल्याचा फटका रायुडूला बसला. बीसीसीआयकडून माफी मिळालेला रायुडू त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कणा झाला. मात्र तिशी ओलांडलेला रायुडू चेन्नईच्या प्लॅन्समध्ये नक्की कसा आणि कुठे फिट होणार अशी स्थिती होती.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची खास नजर असलेल्या रायुडूने 1 शतक, 3 अर्धशतकांसह 43च्या अॅव्हरेजनं 602 धावा करत विश्वास सार्थ ठरवला.

धमाल ब्राव्होची

बॉलिंग-बॅटिंग आणि फिल्डिंग या तीन आघाड्यांच्या बरोबरीने धमाल मस्ती, गाणी, गोष्टी, चेष्टामस्करी यांच्यासाठी प्रसिद्ध 34वर्षीय ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सचा खास माणूस. पस्तिशीकडे झुकलेल्या ब्राव्होने सगळ्या आघाड्या चोखपणे सांभाळत वाढतं वय हा जराही अडसर नसल्याचं सिद्ध केलं.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स Image copyright facebook
प्रतिमा मथळा ड्वेन ब्राव्होने नेहमीप्रमाणे चेन्नईच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

करण 'लकी' शर्मा

रविवारी झालेल्या फायनलमध्ये चेन्नईने संघात एकमेव बदल केला. हरभजन सिंगऐवजी करण शर्माला खेळवलं. यंदाच्या हंगामात करण फार सामने खेळलाही नव्हता. मात्र फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा हुकमी एक्का अर्थात केन विल्यमसनला रोखण्यासाठी करणला संघात घेण्यात आलं.

यंदाच्या हंगामात खोऱ्याने धावा करणाऱ्या विल्यमसनला फायनलमध्येही सूर गवसला होता. मात्र करण शर्माने एका फसव्या वाइडवर विल्यमसनला चकवलं. स्थिरावलेला केन बाद झाला आणि सामन्याचं पारडं फिरलं.

केनचा काटा दूर करत करणने कर्णधार धोनीचा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने जेतेपद जिंकलं तेव्हा करण हैदराबाद संघाचा भाग होता.

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं तेव्हा करण मुंबई संघात होता. यंदा चेन्नईने जेतेपदावर कब्जा केला तेव्हा करण चेन्नई संघात होता. सलग तीन वर्ष विजेत्या संघाचा भाग असण्याचा विक्रमही करणने नावावर केला. विजेत्या संघासाठी करण लकी असल्याचंही यानिमित्ताने सिद्ध झालं.

वॉटसनची पॉवर

पिळदार शरीरयष्टीच्या शेन वॉटसनला आधुनिक भीम म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रचंड ताकदीच्या बळावर गोलंदाजाच्या ठिकऱ्या उडवणारा वॉटसन वर्षानुवर्षे हे काम नेटाने करतो आहे.

अकरा वर्षांपूर्वी तरण्याबांड वॉटसनने राजस्थान रॉयल्सला पहिल्यावहिल्या आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला तेव्हाही वॉटसन महत्त्वाचा घटक होता. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला तेव्हाही वॉटसन अविभाज्य घटक होता.

आयपीएल, चेन्नई सुपर किंग्स Image copyright Chennai Super Kings
प्रतिमा मथळा फायनलमध्ये शतक झळकावत शेन वॉटसनने चेन्नई सुपर किंग्सचं जेतेपद सुकर केलं.

कारकीर्दीत असंख्य दुखापतींनी जर्जर होऊनही वॉटसन आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध करत असतो. गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने वॉटसनला संघात समाविष्ट केलं. मात्र पूर्ण फिट नसलेल्या वॉटसनसाठी मागचा हंगाम दु:स्वप्न ठरला.

वलयांकित वॉटसनला बंगळुरूने यंदा संघात घेतलं नाही. पस्तिशीही ओलांडलेल्या वॉटसनचा काळ सरला अशी चर्चा होती. यंदाच्या लिलावात चेन्नईने अगदी नाममात्र किंमतीत वॉटसनला खरेदी केलं तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं होतं.

प्रत्येक दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या वॉटसनने फायनलमध्ये शतक झळकावत बॉस कोण हे सिद्ध केलं. दुखापतींमुळे वॉटसन फारशी बॉलिंग करू शकला नाही मात्र त्याच्या बॅटिंगने हैदराबादला तडाखा दिला आणि चेन्नईने जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार भरत सुंदरेसन म्हणाले, "वय वाढतं तसं तुम्ही अवघड परिस्थितीला अधिक कणखरपणे सामोरे जाऊ शकता. ट्वेन्टी-20 हा वेगवान फॉरमॅट असला तरी अनुभव महत्त्वाचा ठरतो. चेन्नईने विचारपूर्वक अनुभवी खेळाडूंची निवड केली. त्यांनी मॅचविनर खेळाडूंची निवड केली. लिलावानुसार खेळाडू तीन वर्षांसाठी संघाकडे असणार आहेत."

"चेन्नईचे तिशी ओलांडलेले वीर आणखी दोन वर्ष सक्षमतेने खेळू शकतील का प्रश्न आहे. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक जुगार खेळला. चेन्नईच्या संघावर दोन वर्षांची बंदीची कारवाई झाली होती. चाहत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी जेतेपद पटकावणं महत्त्वाचं होतं. पस्तिशी गाठणारे खेळाडू असल्याने त्यांना मर्यादांची जाणीव होती. त्यांनी वयस्क खेळाडूंना योग्य वेळी विश्रांती देत समतोल साधला", असंही ते म्हणाले.

अयाझ मेनन हे आणखी एक ज्येष्ठ पत्रकार सांगतात, "वयाचा विचार करत बसण्यापेक्षा चेन्नई व्यवस्थापनाने मॅचविनर खेळाडूंची निवड केली. हा जाणीवपूर्वक खेळलेला जुगार होता."

वयानुरूप दडपणाच्या स्थितीला सामोरं जाण्याची समज वाढते. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये मानसिक कणखरतेची परीक्षा होते. चेन्नईने आपली ताकद अचूक ओळखली. त्याचवेळी मर्यादांची त्यांना कल्पना होती. या दोन्हींचा चपखल मेळ साधत त्यांनी जेतेपद पटकावलं, असं मेनन सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)