#5मोठ्याबातम्या : पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत EVM बिघाड की षड्यंत्र?

उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. पोटनिवडणुकीत EVM बिघाड की षड्यंत्र?

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठ्यासंख्येने EVM बिघाडाच्या घटना समोर आल्याने विरोधी पक्षांनी हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार, पालघर आणि भंडारा-गोंदिया निवडणुकांमध्ये EVM बंद पडणं, त्यात गडबड असणं आणि विरोधी उमेदवारासमोरील बटण दाबलं जात नसल्याच्या तक्रारी आल्या.

पालघरमध्ये तब्बल 276 मतदानयंत्रं बंद पडली तर भंडारा-गोंदियामध्ये 75 बूथवरील मतदानयंत्र काम करीत नसल्याच्या 141 तक्रारी आल्या. काही यंत्रांमध्ये कडक ऊन आणि धुळीमुळे बिघाड झाल्याचं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.

मात्र काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने मात्र फेरमतदानाची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

2. मान्सून आला रे

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मान्सून आला की नाही?

केरळच्या दक्षिणेस आणि भारताच्या सीमेवर मान्सून पोहोचला आहे. पोषक वातावरणामुळे तो बुधवारपर्यंत केरळमधून देशातील प्रवास सुरू करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, मोसमी पावसाच्या प्रगतीबाबत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील मेकुनू चक्रीवादळ पूर्णपणे निवळलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, ते सोमवारीही कायम होतं.

केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 7 ते 10 जूनदरम्यान मान्सून दाखल होईल.

तत्पूर्वी, कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 29 आणि 30 मेला तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेनं नैऋत्य मान्सून सोमवारी केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केल्याची माहिती महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

3. तुकाराम मुंढेंविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी

नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. सकाळने याबाबत वृत्त दिलं आहे.

Image copyright Facebook

सिडकोतील अतिक्रमण हे तक्रारींच्या केंद्रस्थानी असलं तरी मुंढे यांच्या हुकूमशाही पद्धतीविषयी नाराजी दर्शवण्यात आली.

पालघर पोटनिवडणुकीदरम्यान नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत या तक्रारी केल्या.

दुसरीकडे आयुक्तांविरोधात महापालिका कर्मचारीही एकवटले आहेत. शनिवारपासून नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील गायब असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

मुंढे यांच्याविरोधात बंड पुकारण्याची तयारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

4. आता पतंजलीने आणलं स्वदेशी सिमकार्ड

बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं BSNLबरोबर करार करत बाजारात एक 'स्वदेशी समृद्धी' सिमकार्ड आणला आहे.

Image copyright Twitter/Swami Ramdev

न्यूज18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, या स्वदेशी समृद्धी सिमकार्डमध्ये 144 रुपयांच्या रिचार्जवर देशभर अनलिमिटेड कॉल्सबरोबरच 2GB डेटा देण्यात येणार आहे. युजर्सना अडीच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि 5 लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलं आहे.

सोबतच हे सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या इतर उत्पादनांवर 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. या सिमकार्ड चा वापर सुरुवातीच्या टप्प्यात पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारीच करतील, असं कंपनीने स्पष्ट केलंय.

5. भारत-श्रीलंका कसोटीत 'पीच फिक्सिंग'?

अल-जझिरा न्यूज चॅनलने केलेल्या क्रिकेटपटूंच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील खेळपट्टीच्याबाबतीत फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे.

Image copyright Michael Steele/Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी श्रीलंकेतील गॉल इथं झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीत मॅचफिक्सिंग करणाऱ्यांनी काही बदल केल्याचा दावा या स्टिंगमध्ये करण्यात आला आहे.

मुंबईतील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस यानं गॉल इथल्या खेळपट्टीत बदल करण्यासाठी तिथल्या माळ्यांना लाच दिल्याची कबुली या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली आहे.

गॉल स्टेडियममधील माळी थरंगा इंदिका यानंही फिरकी किंवा वेगवान गोलंदाजी अथवा फलंदाजीसाठी खेळपट्टी हवी असेल तर तशी मी बनवून देत असल्याचं स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं.

भारताने या कसोटीत 304 धावांनी विजय मिळविला होता. ICCच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचं म्हटलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)