महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ईव्हीएमवरच होणार, ईव्हीएमविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही

मतदान

फोटो स्रोत, Getty Images

2019 लोकसभा निवडणुकांनंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही EVM तसंच VVPAT वर घेण्यात येईल. विरोधक प्रश्न उपस्थित करत असले तरी सरकार आणि निवडणूक आयोगाने वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येईल याचा ठाम पुनरुच्चार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मतपत्रिका या इतिहासजमा होतील.

पण ईव्हीएमवर मतदान करणं सुरक्षित आहे का? तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं ते त्यालाच मिळालं आहे का असे प्रश्न वारंवार विचारले जातात.

मतदार एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतो. मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं आहे; ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी VVPAT वापरलं जातं.

'Voter Verifiable Paper Audit Trail' म्हणजे VVPAT. EVM मशीनद्वारे मतदान होतं. मात्र या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी केली जाऊ शकते.

दुसऱ्या शब्दांत मतदारानं उमेदवाराला दिलेलं मत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आलेली ही दुसरी पर्यायी यंत्रणा आहे.

EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांकडून केल्या जातात. EVMद्वारे मतांची अफरातफर होते असा आरोप वारंवार केला जातो. अशा परिस्थितीत मत अबाधित राखण्यासाठी VVPAT उपयोगात आणलं जातं.

मतदारानं मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट तत्क्षणी त्याची माहिती मतदाराला देतं. आपलं मत ठरवलेल्या उमेदवारालाच मिळालं आहे ना यावर VVPAT शिक्कामोर्तब करतं.

व्हीव्हीपॅट मशीन कसं चालतं?

मतदार EVM मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली VVPAT स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते.

मतदान करताना काही तांत्रिक अडचण उद्भवली असेल तर त्याचीही माहिती दिली जाते. जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना? याची खातरजमा करण्याची संधी मतदाराला मिळते.

VVPAT मशीन काचेच्या पेटीत असतं. जेणेकरून मतदान केलेला मतदारच स्लिपवरचा तपशील पाहू शकतो. VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना VVPAT मशीन उघडता येत नाही. त्याला हात लावता येत नाही.

VVPAT मधला पेपर रोल प्रत्येक मतदानावेळी 1500 स्लिप प्रिंट करू शकतो. EVM मशीनमध्ये गडबड असल्याचे आरोप निवडणूक आयोगाने नाकारले आहेत. मात्र EVM वरील आरोपांना काटशह देण्यासाठी काही निवडणुकांमध्ये VVPATचा प्रयोग राबवण्यात आला आहे.

न्यायालयाची भूमिका

सर्वोच्च न्यायालयानं याबाबत सावध भूमिका घेतली आहे. मतदारांचा मतदान यंत्रणेवरचा विश्वास वाढावा यासाठी न्यायालयानं 2013 मध्ये निवडणूक आयोगाला VVPAT लागू करण्याचा आदेश दिला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

व्हीव्हीपॅट मशीनच्या सुरक्षेसाठी तैनात सैनिक

मतदान प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये काही मतदान केंद्रांवर VVPATचा वापर झाला.

व्हीव्हीपॅटचा इतिहास

VVPATची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त खर्च येतो. या व्यवस्थेसाठी स्वतंत्र हार्डवेअर वापरावं लागतं. 1899 मध्ये अमेरिकेत जोसेफ ग्रे यांनी यांत्रिक पद्धतीनं मतदान होताना कागदावर त्याची माहिती प्रसिद्ध होईल अशा स्वरुपाच्या व्यवस्थेचं प्रारूप तयार केलं होतं.

जवळपास शतकभरानंतर रेबेका मर्क्युरी यांनी VVPATला मूर्त स्वरुपात आणलं.

व्हीव्हीपॅटची आकडेवारी

सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग 16 लाख VVPAT मशीन वापरणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीनची पाहणी करताना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

BEL/ECIL यांनी VVPATची निर्मिती केली आहे. निवडणूक आयोगानं 2013 मध्ये या मशीन्सच्या वापराला मान्यता दिली. केंद्र सरकारनं यासाठी 3, 174 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

VVPAT वादग्रस्त आहेत का?

EVM शी छेडछाड करून भाजप निवडणुका जिंकतं, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीही वेळोवेळी केले आहेत. वेळोवेळी मतदानाच्या दरम्यान तक्रारी येत असल्याने या शंकेला हवा देण्याचं काम नेहमी राजकीय पक्ष करत आले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर "मतदान जर 21 ऑक्टोबरला होतंय, तर मतमोजणी 22 ला घ्या ना, 23 ला घ्या नाहीतर. 24 ऑक्टोबरला कशाला?" असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

"आता मतदान जर EVMनेच घेता म्हटलं तर मतमोजणीला एवढा वेळ नको ना लागायला. आजकाल तर एक बटण दाबलं की सरळ मोजणीला सुरुवात होते नि लवकरच कळतं. अगदी मतदान संपल्या संपल्या त्याच संध्याकाळी मतमोजणी केली जाऊ शकते. आम्ही जरी मानलं की त्याच दिवशी नाही करायची, तर दुसऱ्या दिवशी करा. मध्ये दोन दिवस असतील तर मग लोक आम्हाला विचारतात, शंका उपस्थित करतात की यांना पुन्हा EVMचा घोटाळा तर नाही ना करायचा," असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

"शंका आहे म्हणूनच पक्षाने याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे," असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

'पराभव दिसू लागला की तक्रार होते'

EVM संदर्भात काहीही तक्रार किंवा गडबड असेल तर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं असं भाजपनं याआधीही सांगितलं आहे, असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

"भाजपनं पराभूत असतानाही EVMबाबत आक्षेप घेतला नाही. विरोधकांसाठी जिंकत असताना EVM बरोबर असतं. पराभूत होण्याची भीती असताना विरोधी पक्ष EVMमध्ये गडबड असल्याची तक्रार करतात. यापूर्वी अनेकदा असं घडलं आहे," असं ते पुढे म्हणाले.

'कागद दिसला नाही तरी फरक पडत नाही'

'राजकीय पक्षाला मशीनविषयी शंका वाटते त्यावेळी निवडणूक अधिकारी संबंधित राजकीय पक्षांना यंत्र तपासण्याची मुभा देतात. EVM मशीन हॅक करून दाखवण्यासाठी राजकीय पक्षांना आमंत्रित केलं जातं. मात्र कोणत्याही पक्षाला हॅकिंग यशस्वीरीत्या करता आलेलं नाही," अशी प्रतिक्रिया माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

त्या पुढे सांगतात, मतदान सुरू होण्यापूर्वी राजकीय पक्षांना मतदान केंद्रांवर असलेली मशीन्स तपासायला मिळतात. दोष आढळून आला तर त्वरित कारवाई केली जाते. मतदान सुरू असताना दोष आढळला तर नवीन मशीन बसवण्यात येतं. राजकीय पक्षांचे समाधान झाल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया सुरू होते.

फोटो स्रोत, Getty Images

EVM मशीन हाताळण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा एखादा स्क्रू निखळला तरी मशीन बंद पडतं. त्याची दुरुस्ती फक्त कंपनीतच होते. स्थानिक इंजिनियर सुद्धा दुरुस्ती करू शकत नाहीत, मशीनच्या सुरक्षेबाबत नीला सत्यनारायण सांगतात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत VVPATसंदर्भात तक्रारी आल्या त्याबाबत बोलताना त्या सांगतात, "केलेल्या मतदानासंदर्भात कागद दिसला नाही तरी फरक पडत नाही. एकूण मतदारांची संख्या आणि मशीनमध्ये मिळालेली मतसंख्या एक असेल तर VVPATला अवाजवी महत्त्व देण्याचं कारण नाही. VVPAT अजूनही प्रायोगिक अवस्थेत आहे. काळानुरूप VVPATमध्येही सुधारणा होईल. परंतु तो जिंकण्या हरण्याचा मुद्दा असणार नाही."

संकलन - पराग फाटक

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)