चांदूर रेल्वे पोलीस हत्या : 'दारूच्या भट्टीवर दोनच पोलीस साध्या कपड्यात कशासाठी गेले?'

Image copyright Getty Images

अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या मांजरखेडा कसबा येथील दारू अडयावर छापा टाकायला गेलेल्या दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात पोलीस शिपाई सतीश मडावी यांचा मृत्यू झाला. सध्या हे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. गावातल्या परिस्थितीचा हा ग्राउंड रिपोर्ट.


आम्ही मांजरखेडा कसबाच्या त्या भागात पोहोचलो तेव्हा ते गाव दहशतीखाली दिसत होतं. घटनास्थळाचा पत्ता सांगणारं तिथं कुणीच नव्हतं. शेवटी गावातल्याच एका नागरिकानं रस्त्यानं जातांना जिथं पोलिसांची गर्दी दिसेल तेच घटनास्थळ असल्याचं सांगितलं.

वस्तीपासून एक किलोमीटर लांब आल्यानंतर शेतात पोलिसांची गाडी आम्हाला दिसली. गाडी पार्क करून आम्ही घटनास्थळाकडे निघालो. पोलीस व्हॅनजवळील एका पोलिसांना आमची ओळख सांगितली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

क्षुल्लक कारणावरून थेट खून झाल्याच्या संतापाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आम्ही त्यांना घटनास्थळ विचारून त्या दिशेने निघालो.

अमरावती जवळच्या चांदूर रेल्वे मार्गावर असलेल्या मांजरखेडा कसबा गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. गावापासून पाचशे मीटर अंतरावर बंजारा समाजाची 200 लोकसंख्येची वस्ती आहे.

यातल्याच काही लोकांचा परंपरागत मोहच्या फुलाच्या दारूचा व्यवसाय आहे. याच वस्तीतल्या काही दारू विक्रेत्यांनी एका पोलिसाचा खून केला आहे आणि एक पोलीस या हल्ल्यात जखमी झाला आहे.

कोणीही बोलायला तयार नाही

शेताच्या धुऱ्यावरून घटनास्थळी पोहोचल्यानंतर शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यात कुऱ्हाडीनं फोडलेला मोठा ड्रम होता. ड्रम खाली कोळशाचा खच होता. समोरच मोहाचा सडवा आणि विटांच्या मधोमध राख दिसून आली.

ड्रमवरचं घमेलही बाजूलाच पडलेलं होतं. दारू काढण्यासाठी जाळायला काड्यांसह पालापाचोळा होता.

नेमकी घटना काय घडली होती हे जाणून घेण्यासाठी आम्ही बंजारा वस्तीवर पोहचलो. पोलिसांच्या भीतीमुळे अर्धी घरं बंद होती. ज्यांची दारं उघडी होती त्यापैकी कुणीही बोलायला तयार नव्हतं.

Image copyright BBC/Nitesh Raut

खून झाल्यानंतर गावातल्या चौकात एकच चर्चा रंगत होती. गावचे सरपंच दिलीप गुल्हाने चौकातल्या चर्चेत सहभागी होते.

त्यांच्या मते बंजारा वस्तीमधले काही लोक मोहफुलाच्या दारूचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय वस्तीपासून काहीच अंतरावर चालतो. गावातले काही नागरिकही तिकडे दारू पिण्यासाठी जातात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली होती. त्यातूनच हे हत्याकांड घडलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन्ही पोलिसांना मारहाण झाल्यानंतर सर्वप्रथम घटनास्थळी पोहचणाऱ्यांपैकी दिलीप गुल्हाने हे एक होते.

"सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव जाधव यांना वेळीच आम्ही रुग्णालयात नेलं त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र सतीश मडावी यांचा आधीच मृत्यू झाला होता," असं त्यांनी सांगितलं.

वाढती गुंडागर्दी

या संदर्भात पुढे बोलताना दिलीप गुल्हाने यांनी बंजारा वस्तीमधल्या काही युवकांची गुंडागर्दी वाढली असल्याचं सांगितलं.

"अवैध दारू विकणं, करंट लावून शिकार करणं हा त्यांचा नेहमीचा धंदाच होऊन बसला होता. त्यांच्या त्रासांमुळे गावातल्या महिला मंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून छापासत्राला सुरवात झाली. पण हवा तितका फरक पडला नव्हता," असं ते म्हणाले.

Image copyright BBC/Nitesh Raut
प्रतिमा मथळा दिलीप गुल्हाने

छापा मारण्यापूर्वी सहायय्क पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस शिपाई मडावी हे पोलीस पाटील माधव कावलकर यांना भेटून गेले होते. धाडसत्र झाल्यावर उसळीचा नाश्ता करूया अशा त्यांच्यात गप्पा सुद्धा झाल्या होत्या, त्यानंतर काहीच वेळात कावलकर यांना जाधव यांचा फोन आला. कुणीतरी आमच्यावर हल्ला केला असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काही गावकऱ्यांना सोबत घेऊन कवलकर शेताच्या दिशेनं निघाले.

महाराष्ट्रात दारू तयार करण्याच्या छोट्याश्या कारणावरून पोलिसांना कुऱ्हाडीनं मारून टाकण्याची ही पाहिलीच घटना असावी. राज्य महामार्ग परिसर ,सावंगा विठोबा, मांजरखेडा कसबा या भागात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या चालत असल्याचं चांदूर रेल्वेचे वीरेंद्र जगताप यांनी सांगितलं.

महत्त्वाचं म्हणजे या परिसरात पोलिसांचा वचक नाही. मुळात कोणत्याही दारुभट्टीवर छापा टाकायला जाण्यापूर्वी सोबत अतिरिक्त कुमक घेऊन जाणं गरजेचं असतं. दुसरं छापा मारायला जातांना किमान गणवेशात जाणं गरजेचं असतं. पण या प्रकरणात दोन्ही पोलीस साध्या वेशात का गेले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Image copyright BBC/Nitesh Raut
प्रतिमा मथळा या ड्रममधूनच मोहाची दारू काढली जाते

या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी उमेश मडावी (वय 30), अजय उर्फ राजा राठोड (वय 20) या दोघांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यातून बचावलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव अजूनही ICU मध्ये आहेत.

कुऱ्हाडीचे आणि भाल्याचे वार

"दारू अड्ड्यावर छापे मारणं हे पोलिसांचं काम आहे. पारधी बेड्यावर, बंजारा बेड्यावर छापा मारताना पोलीस आणि बेड्यांवरील नागरिकांमध्ये वाद होतो. कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाऊन दगड फेकीवर सुद्धा येते," असं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं.

खुनाबाबत बोलाताना ते म्हणाले, "अशा प्रकारे पोलिसांचा खून होण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला. सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना तो परिसर परिचित होता. कदाचित प्रकरण इतक्या हाताबाहेर जाईल याची त्यांना अपेक्षा नसेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खून करणारे सराईत गुन्हेगार नाहीतच त्यांच्यावर जुगार आणि किरकोळ गुन्हे दाखल आहेत. परंतु आम्ही सर्व बाजू तपासूनच चौकशी करतो आहे."

Image copyright BBC/Nitesh Raut

घटनेची माहिती देताना ते म्हणाले, "मारहाणीत कुऱ्हाडीनं वार झाल्याचं दिसून येतंय. पण डोळ्यात भाला आणि दगडानं ठेचून मारलं असल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालात आलेलं नाही. मारण्यासाठी कुऱ्हाड आणि काठयाचा वापर केला असल्याचं दिसून येतंय. या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत".

सध्या गावामध्ये अटकसत्र सुरू आहे. संशयित आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या गावातल्या फेऱ्या वाढल्यात. त्यामुळे गावामध्ये भयाण शांतता पसरली आहे.

दारूचे धंदेवाले आणि पोलिसांचं साटंलोटं हे नवीन नाही. एखाद्या दारू अड्ड्यावर दोनच पोलीस आणि तेही वर्दी शिवाय कशासाठी जातात? पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अवैध धंदे चालूच शकत नाही. त्यातूनच हे हत्याकांड झालं असावं, असं मतदार या स्थानिक दैनिकाचे संपादक दिलीप एडतकर यांच म्हणण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)