सोशल - '...तर निवडणुका बॅलेट पेपरनेच घ्या'

बॅलेट पेपर Image copyright Getty Images

पालघर आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सोमवारी पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये EVM बिघाडाच्या काही घटना समोर आल्या.

पालघरमध्ये तब्बल 276 मतदान यंत्रं बंद पडली तर भंडारा-गोंदियामध्ये 75 बूथवरील मतदान यंत्रं काम करत नसल्याच्या 141 तक्रारी आल्या. कडक ऊन आणि धुळीमुळे काही यंत्रं बिघडली असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

यावरून, विरोधकांनी हे भाजपचं षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं म्हटलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली.

त्यानंतर निवडणूक आयोगानं आता भंडारा-गोंदिया मतदारसंघातल्या 49 केंद्रांवर फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, याबाबत वाचकांचं काय मत आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

त्यावर अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. या प्रतिक्रियांचा हा गोषवारा...

"जर अतिउष्णतेनं मतदान यंत्रं बिघडत असतील तर ते भारतासारख्या देशात वापरण्याच्या लायक नाहीत. निवडणूक आयोगाने अगोदरच याबाबत सूचना करायला हव्या होत्या," असं मत जयमाला धानकिकर यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"या विरोधात जेव्हा विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टात गेले होते त्यावेळी आयोगानं मतदान यंत्रं कशी चांगली आणि सुरक्षित आहेत हेच पटवून दिलं होतं. मग आता झालेल्या प्रकाराला कोण जबाबदार? निवडणुकीचा खर्च झाला त्याची भरपाई कोण करणार. त्याचा जनतेला भुर्दंड कशामुळे?" असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेत.

Image copyright Facebook

अजय हिर्के म्हणतात, "उन्हामुळे जर मतदान यंत्रं बंद पडत असतील, तर राजस्थानमधल्या निवडणुका रद्द करा. EVM जर इतक्या निकृष्ट दर्जाचे असतील तर EVM बंद करून सरळ बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्या."

अमित कुमार यांनी EVMवर कायमची बंदी आणण्याची मागणी केली आहे. "पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो, याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी तसंच, बॅलट पेपर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो," असं त्यांनी पुढे नमूद केलं आहे.

Image copyright Facebook

"उष्णतेमुळे EVM बंद पडत असतील तर निवडणूक आयोगानं याचा विचार पहिलेच करायला हवा होता. हा काही पोरखेळ नाही, याची सर्व जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आता परत निवडणूक घ्यायला पाहिजे आणि ती ही बॅलेट पेपरवर," अशी प्रतिक्रिया अश्वजित निकम यांनी दिली आहे.

सुशांत खिलारे यांनी "उष्णता कुठून होती, दिल्लीतून का?" असा खोचक सवाल विचारला आहे.

Image copyright Facebook

ज्यांना मतदान करता आलं नाही त्याला कोण जबाबदार? निवडणूक आयोगावर कारवाई का नको? असा प्रश्न योगेश गांगुर्डे यांनी विचारला आहे.

Image copyright Facebook

"उन्हामुळे कुणाचा लॅपटॉप, मोबाईल बंद पडल्याचं कधी ऐकलंय का? मग EVM कसं खराब होऊ शकतं?" असं कौस्तुभ पवार विचारतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)