12वीचा निकाल कुठे पाहायचा? बीबीसी मराठीचा बुधवारचा राउंड-अप

1. आज 12वीचा निकाल

आज बारावीचा निकाल Image copyright MANAN VATSYAYANA/AFP/Getty Images

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे.

यंदा राज्यातून 14 लाख 45 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या 4 लाख 89 हजार, विज्ञान शाखेच्या 5 लाख 80 हजार तर वाणिज्य शाखेच्या 3 लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

दुपारी 1 वाजता हे निकाल जाहीर झाले असून ते पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता

आणि हा निकाल कितपत महत्त्वाचा?

शाळेच्या परीक्षेपेक्षा जीवनाच्या परीक्षेत पास होणं महत्त्वाचं, असं सांगत आहेत प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे. वाचा इथे

2. मारिया चक्रीवादळाचे 64 नव्हे, 4,600 बळी गेले होते

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आधी मृतांचा अधिकृत आकडा 64 सांगण्यात आला होता.

मारिया चक्रीवादळानं प्योर्तो रिकोमधल्या 4,600 लोकांचा जीव घेतला होता, असं हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. अधिकृत आकड्यापेक्षा हा आकडा 70 पटींनी अधिक असल्याच लक्षात आलं आहे.

आधी मृतांचा अधिकृत आकडा 64 सांगण्यात आला होता. पण चक्रीवादळामुळे झालेला विध्वंस हा विखुरलेला असल्यामुळे त्याची अचूक गणना करणं गुंतागुंतीचं काम होतं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आधीच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आम्ही गृहीत धरली होती, असं प्योर्तो रिको सरकारनं म्हटलं आहे.

सप्टेंबरमध्ये आलेल्या या चक्रीवादळानंतर एक तृतीयांश मृत्यू हे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणि रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वैद्यकीय मदत पुरवण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे झाले होते, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

वाचा पूर्ण बातमी इथे

2. कोका कोलाने आणली दारू

Image copyright WWW.COCACOLA.CO.JP
प्रतिमा मथळा कोका कोलाची दारू

आपल्या 125 वर्षांच्या इतिहासात कोका कोलाने पहिल्यांदाच स्वतःची दारू बाजारपेठा आणलं आहे. सोमवारी कंपनीनं तीन फिझी लेमन ड्रिंक्स बाजारात उतरवलेत.

जपानमध्ये कोका कोला कंपनीनं लेमन फ्लेवरचं अल्कोपोप हे मद्य बाजारात आणलं आहे. कोका कोला हे पहिल्यांदाच करत असून जपानमधल्या नवीन बाजारपेठेवर ताबा मिळवण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.

तरुणांना विशेषतः महिलांना नजरेसमोर ठेऊन कंपनीनं हे अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट आणले आहेत.

जपानमध्ये याला अल्कोपॉप म्हणतात आणि तिथे याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतात येणार का? वाचा वाचा

3. पाकचा खजिना 10 आठवड्यांत होणार रिकामा?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाक रुपया

पाकिस्तानात लष्कर विरुद्ध सरकार हा सत्तासंघर्ष थांबताना नाही दिसत आहे. याचा परिणाम पाकिस्तानच्या रुपयाच्या दरावरही झाला आहे.

बीबीसी हिंदीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार सध्या एक डॉलरची किंमत तब्बल 120 पाकिस्तानी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. म्हणजे आर्थिक संकट असं की देशांत परकीय चलनाची गंगाजळी आटत चालली आहे.

तसंच, गरज भासल्यास पाकिस्तानमध्ये सध्या केवळ एवढंच परकीय चलन आहे ज्यातून 10 आठवड्यांसाठीची तरतूद केली जाऊ शकते. वाचा पूर्ण बातमी बीबीसी हिंदीवर.

4. संघाच्या कार्यक्रमासाठी प्रणब मुखर्जी जाणार

Image copyright AFP / Getty Images
प्रतिमा मथळा प्रणब मुखर्जी आणि मोहन भागवत

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमासाठी 7 जूनला नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. संघाचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर राजकीय कट्ट्यांवर नव्या चर्चेचं पेव फुटलं आहे.

नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्यास ते हजर राहणार असल्याचं कळतंय.

नेमकी काय होणार या कार्यक्रमात? वाचा संपूर्ण बातमी बीबीसी हिंदीवर.

5. तो स्पायडरमॅन "खरंच एक हिरो आहे"

Image copyright AFP
प्रतिमा मथळा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत मामुदू

एका बिल्डिंगच्या बाल्कनीतून लटकत असलेल्या एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी एक तरुण चक्क स्पायडरमॅन सारखा धावून आला. त्याच्या या पराक्रमाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

या कहाणीचा हिरो मामुदू गासामा एक मालीचा स्थलांतरित असल्याचं कळल्यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्याला भेटून त्याचे आभार मानले. तसंच त्याला फ्रान्सच्या अग्निशमन दलात सामावून घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, त्या चार वर्षांच्या मुलाच्या आईवडिलांनी मामुदू यांचे खूप आभार मानले आहेत. "तो खरंच एक हिरो आहे," असं ते म्हणाले. वाचा पूर्ण बातमी बीबीसी वर्ल्डवर.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)