#5मोठ्याबातम्या : पंतप्रधान मोदी नाशिकच्या माणसाशी मराठीत बोलले, पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुद्रा योजनेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. Image copyright TOBIAS SCHWARZ / Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुद्रा योजनेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या.

1. पंतप्रधान मराठीतून बोलले पण...

केंद्रात मोदी सरकारला चार वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुद्रा योजनेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, संबधितांची यादी आधीच केंद्राकडे पाठवण्यात आली होती. वेगवेगळ्या भागातील लाभार्थींशी संवाद साधल्यावर पंतप्रधान महाराष्ट्राकडे वळाले.

तेव्हा नाशिकच्या एका माणसाशी त्यांनी मराठीतून संभाषण सुरू केलं - "हरी ठाकूर कोण आहेत? कुठले राहणारे आहेत?" असा प्रश्न पंतप्रधानांनी मराठीतून विचारला.

तेव्हा मूळचे बिहारचे आणि नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असलेले ठाकूर यांची पंचाईत झाली. त्यांनी आपल्याला मराठी समजत नसून कृपया हिंदीतून संवाद साधावा, अशी विनंती पंतप्रधानांना केली.

30 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असतानाही मराठी येत नसल्याने मोदी रागावले. "इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्य करूनही मराठी का येत नाही?" असा प्रश्न करून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पुढील संभाषण हिंदीतून झालं.

2. भंडारा-गोंदियामध्ये 49 केंद्रांवर आज फेरमतदान

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 49 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान घेतलं जाणार आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार मतदान यंत्रांमध्ये कुठेच बिघाड झालेला नाही, कुठेही फेरमतदान होणार नाही, असं सांगणाऱ्या निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी आपली भूमिका बदलली.

बुधवारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील 49 केंद्रावर फेरमतदान घेतलं जाणार आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा मतदान

दरम्यान, उष्णतेमुळे मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं सांगणारे गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. काळे हे या पोटनिवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसरही होते.

ते कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

3. राष्ट्रपतींनी पहिला दयेचा अर्ज फेटाळला

फाशीची शिक्षा माफ करण्याचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहिल्यांदाच फेटाळला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रामपूर श्यामचंद गावातील प्रकरण आहे. आरोपी जगत रायने 1 जानेवारी 2006ला विजेंद्र महातो यांची पत्नी आणि पाच मुलांची हत्या केली. रात्रीच्या वेळेस हे कुटुंब झोपलेले असताना जगतने त्यांचं घर पेटवून दिलं होतं.

Image copyright PRAKASH SINGH/Getty Images
प्रतिमा मथळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर 2013मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्या दयेचा अर्ज राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळून लावलं आहे.

राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील हे पहिलंच प्रकरण होतं.

4. बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं पुढील दोन दिवस बँकांच्या शाखांमधील व्यवहार ठप्प राहणार आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बँक कामकाज

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रलंबित तसंच अत्यल्प वेतनवाढीच्या प्रस्तावाविरोधात देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांची अवस्था सध्या गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर बँकांना बँक कर्मचाऱ्यांना अधिक वाढीव वेतन देणं शक्य नाही, असं सांगत इंडियन बँक्स असोसिएशनने केवळ दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

लवकरात लवकर सुधारित वेतन प्रस्ताव न दिल्यास मे महिन्याच्या अखेरीस दोन दिवस संप पुकारण्याचा इशाराही बँक कर्मचाऱ्यांनी दिला होता. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस हा संप राहील.

5. भूमिहीनांना शेतजमीन घेण्यासाठी आता शंभर टक्के मदत

अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत आता जमीन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.

प्रतिमा मथळा यवतमाळमध्ये अजूनही सुरक्षा साधनांशिवाय फवारणी सुरू आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शेतजमीन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी 20 लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रुपये देण्याचा आणि या रकमेवर तब्बल 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

आधीच्या योजनेत लाभार्थ्याला सामाजिक न्याय विभागाकडून 50 टक्के अनुदान तर 50 टक्के कर्ज देण्याची योजना होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)