लहान मुलांचा मेंदू खाणाऱ्या टोळीची अफवा, आंध्रात परप्रांतीयांवर हल्ले

  • दिप्ती बत्तिनी
  • बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
आंध्र प्रदेश

फोटो स्रोत, BBC/ Deepti Batthini

परप्रांतीयांवर याआधी महाराष्ट्रात हल्ले झाले आहेत. त्यावेळी रोजगार हे मुख्य कारण होतं. पण, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मात्र परप्रांतीयांवर एका भयंकर अफवेमुळे हल्ले होत आहेत.

आंध्र प्रदेशात आणि तामिळनाडूत काही व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हीडिओ व्हायरल झालेत. या मेसेजमुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधल्या निरपराध लोकांवर हल्ले होत आहेत.

आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये आणि तेलंगणामधल्या चोटुप्पल, रचकोंडा आणि एजपल्ली या ठिकाणी मागच्या आठवड्यात पाचपेक्षा अधिक लोकांवर हल्ले झाले आहेत. विशाखापट्टणममध्ये झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्स अॅपवर फिरणाऱ्या या व्हीडिओमध्ये बिहार आणि राजस्थानमधून येणाऱ्या टोळ्या लहान मुलांचं अपहरण करून त्यांचा मेंदू खात असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यातला एक मेसेज काहीसा असा आहे, "पोलिसांनी पाच लोकांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडे चाकू आणि ब्लेड्स आढळून आल्या आहेत. ते त्यांच्या संस्कृतीप्रमाणे काळी त्वचा असलेल्या लोकांचा मेंदू खातात. असे काही लोक तुम्हाला दिसले तर त्यांना पोलिसांच्या हवाली करा आणि मुलांना घराबाहेर पडू देऊ नका."

काही मेसेजमध्ये लोकांनी काय काळजी घ्यायची याची यादी आहे आणि ते पोलिसांच्या नावावर खपवत आहेत. पोलिसांनी मात्र अशा सूचना दिल्याचा इन्कार केला आहे.

लोकांवर हल्ला

"आम्हाला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे कळत नाहीये. उत्तर प्रदेशातल्या काही टोळ्यांबदद्ल व्हॉट्स अॅपवर मेसेज फिरत आहेत आणि त्यामुळे आम्ही गोंधळून गेलोय. कोणताही नवीन व्यक्ती आला की आम्हाला भीती वाटते," असं तेलंगणातील एका खेड्यात राहणाऱ्या 50 वर्षीय अंदलाम्मा सांगत होत्या.

तेलंगणातील चोटुप्पल भागातल्या मल्कापुरम खेड्यात लोकांनी एका माणसावर संशयातून हल्ला केला.

"तो माणूस सकाळी माझ्या दुकानात आला. त्याला काय हवंय हे विचारल्यावर त्यानं उत्तर दिलं नाही. त्याची देहबोली संशयास्पद होती म्हणून आम्ही त्याची बॅग तपासली. त्यात एक ब्लेड आणि खोबऱ्याच्या तेलाची बाटली सापडली. जेव्हा खेड्यातल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तो माणूस देऊ शकला नाही तेव्हा त्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केलं," या भागातल्या एका दुकानाचे मालक सांगत होते.

पोलिसांच्या मते भाषेच्या अडथळ्यामुळे हा व्यक्ती गावातल्या लोकांच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकला नाही. त्या व्यक्तीला चोटुप्पलच्या अम्मा नन्ना या अनाथश्रमात पाठवलं असं पोलीस अधिकारी वेकंटय्या यांनी सांगितलं.

या व्हॉट्स अॅप मेसेजेसमुळे रात्र रात्र झोप येत नसल्याचं आणखी एका रहिवाशानं सांगितलं.

फेक व्हीडिओ

विशाखापट्टणममधला पीडित व्यक्ती भिकारी असल्याचं लक्षात आलं. तसंच तो मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचंही लक्षात आलं. तो आंध्र प्रदेशात जसं तामिळ किंवा तेलुगू बोलतात तसं तो बोलू शकत नव्हता. या घटनेनंतर पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या मते व्हॉटस अॅपद्वारे फिरत असलेली माहिती खोटी आहे, तसंच लहान मुलांच्या अपहरणाच्या कोणत्याही तक्रारी मिळाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

तेलंगणाचे पोलीस महासंचालक मेहेंदर रेड्डी यांनी फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ट्वीट्सच्या माध्यमातून केलं आहे. हे व्हॉट्स अॅप मेसेज विश्वासार्ह नाहीत आणि काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक मलकोंडय्या यांनी देखील लोकांना याच प्रकारचं आव्हान केलं आहे.

तेलंगणातल्या रंगा रेड्डी जिल्ह्यातल्या एगपल्ली गावात राष्ट्रीय महामार्गाजवळून जात असताना दोन लोकांवर हल्ला करण्यात आला.

"जेव्हा आम्हाला हा हल्ला झाल्याचं कळलं तेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो. तिथं दोन लोक गंभीर जखमी झाल्याचं आम्हाला दिसलं. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हल्लोखोरांशी बोलल्यावर त्यांना हे व्यक्ती अपहरण करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय आला. खरे आणि खोटे मेसेज न ओळखता आल्यामुळे आम्ही गोंधळून गेलो," असं नागभूषण या गावकऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"स्मार्टफोनच्या अति वापरामुळे अशा मेसेजेसला चालना मिळाली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो," मंचला पोलीस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर रामभाऊ यांनी बीबीसीला सांगितलं. लोक वस्तुस्थिती नीट तपासून पाहत नाहीत असं ते म्हणाले.

रचकोंडा भागात सगळ्यांत जास्त घटना घडल्या आहेत. मात्र या व्हॉट्स मेसेजचा स्रोत अजून कळलेला नाही.

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत बीबीसीशी बोलताना म्हणाले की या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणं तसं कठीण आहे. सायबर गुन्हे शाखेचे लोक गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियाचा प्रभाव

"सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे आहेत. व्हॉट्स अॅपनं जाहीर केलं नाही तर व्हॉट्स अपच्या मेसेजेसचा स्रोत शोधणं अतिशय कठीण काम आहे. पण जेव्हा फेक न्यूज पसरते तेव्हा व्हॉटस् अॅपच्या व्यवस्थापनाकडून असा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. फेक न्यूजमुळे गोंधळ उडण्याची भारतातली ही पहिलीच वेळ नाही. प्रशासन आणि सोशल मीडिया कंपन्यांनी मिळून अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे," असं फॅक्टली या डेटा जर्नलिझम पोर्टलचे संस्थापक राकेश रेड्डी डुबडू म्हणतात.

"एका विशिष्ट गटातर्फे अशा प्रकारचे मेसेज पसरवले जातात. काही राजकीय पक्षांतर्फे त्यांचं उद्दिष्टं साध्य करण्यासाठी अशाच प्रकारची पद्धत वापरली जाते," ते म्हणाले.

फोटो स्रोत, FACEBOOK

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

2013 साली असाच एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये दंगल झाली होती. हा व्हीडिओ जुना आणि पाकिस्तानातला होता. पण तो व्हीडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी कायदा हातात घेतला.

पण दक्षिण भारतात अशा प्रकारामुळे तणाव निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

"पुरेशा माहिती अभावी ग्रामीण भागातले लोक अशा मेसेजवर जास्त विश्वास ठेवतात. स्मार्टफोन आणि स्वस्तात इंटरनेट मिळाल्यामुळे लोक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. एखादा मेसेज फॉर्वर्ड करणं यात काही गुन्हा नाही. पण एखादा मेसेज वणव्यासारखा पेटतो आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. जेव्हा अशा प्रकारची माहिती मिळते तेव्हा लोकांनी नीट विचार करावा आणि गरज पडल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी," असं तेलंगणाचे सीआयडी सायबर क्राईम पोलीस अधीक्षक राम मोहन म्हणाले.

तेलंगणातल्या गदवाल जिल्ह्यातल्या जोगुलांबामध्ये पोलीस अधीक्षक रेमा राजेश्वरी यांनी लोकांमध्ये जागृती पसरवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोशल मीडियावरील फेक मेसेजेसच्या विरोधात हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पोलिसांनी सुद्धा फेक मेसेज संदर्भात मोठी मोहीम सुरू केली आहे. जेव्हा एखादा संशयास्पद मेसेज येतो तेव्हा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये 100 नंबर डायल करून तक्रार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)