ग्राउंड रिपोर्ट : हिरो बनलेले सब-इन्स्पेक्टर गगनदीप सिंग 'गायब' का आहेत?

गगनदीप सिंग Image copyright FACEBOOK/GAGANDEEP SINGH
प्रतिमा मथळा गगनदीप सिंग

नैनितालमधल्या रामनगरच्या तुजिया मंदिराबाहेर आक्रमक हिंदू तरुणांच्या जमावापासून एका मुस्लीम युवकाला वाचवणारे पोलीस उपनिरीक्षक गगनदीप सिंह यांना आपण रातोरात चर्चेत येऊ असं वाटलं नव्हतं.

तेही नोकरीला लागून केवळ सहा महिनेच झालेले असताना. त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. परंतु हिंदू, मुस्लीम, कथित लव्ह जिहाद आणि त्यांचं शीख असणं हे सगळं एकत्र आलं आणि 27 वर्षीय तरुण उपनिरीक्षकाच्या जीवनात वादळ आलं.

हे वादळ सोशल मीडियामध्ये जोरदार घोंगावलं आणि हा पोलीस अधिकारी हिरो झाला. आता मात्र त्यांना माध्यमांसमोर येणं अडचणीचं वाटत आहे.

जेव्हा बीबीसीनं त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि प्रत्यक्ष भेटून नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याबद्दल वरिष्ठांशी बोलावं लागेल असं ते म्हणाले.

गगनदीप यांची भेट झालीच नाही

नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जन्मेजय खंडुरी यांनी गगनदीप सिंग यांची भेट घडवून आणण्याचं आश्वासन बीबीसीला दिलं होतं. परंतु दिवसभर वाट पाहिल्यावरही ती भेट होऊ शकली नाही.

खंडुरी यांच्याशी बोलणं झाल्यावर आम्ही दिल्लीहून नैनीतालला पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर खंडुरी यांनी आम्हाला पोलीस अधीक्षक सती यांची भेट घेण्यास सांगितलं. तिथं गगनदीप यांच्याशी बोलणं होईल, असंही म्हणाले.

Image copyright FACEBOOK/OVAIS SULTAN KHAN

सती यांनीही भेट होईल असं म्हटलं. परंतु काही तासांनी त्यांनी फोनवर सांगितलं की, "गगनदीप सिंगचा ठावठिकाणा लागत नाहीये. तो त्याच्या खोलीत नाही आणि पोलीस स्टेशनमध्येही नाही. आम्ही त्याचा शोध घेत आहोत."

अवघ्या एका दिवसापूर्वी ज्या पोलिसाचं सगळा देश कौतुक करत होता, त्याचा त्या क्षणी काहीच पत्ता लागत नव्हता. पोलिसांशी बोलत असताना, या सगळ्यात काहीतरी गडबड आहे याचा अंदाज येत होता.

माध्यमांकडून अचानक आलेल्या या झोतामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अडचणीत येण्याची भीती वाटणं, हे समजण्यासारखं होतं.

रजेवर पाठवलं...

एसपी जन्मजय खंडुरी यांनी त्यांच्या कार्यालयात आम्हाला सांगितलं की, "मी गगनदीपशी बोललो आहे आणि आता तो माध्यमांशी बोलू शकत नाही, त्यांचं काउंसिलिंग करण्याची गरज आहे."

गगनदीप यांचं सोशल मीडियावर जेवढं कौतुक होत होतं, तेवढाच त्यांना अपशब्दांचाही सामना करावा लागत आहे. हे सगळं सहन करण्याची त्यांची मानसिक तयारी नाही. अर्थात, त्यांच्या पोलिसी प्रशिक्षणामुळे ते जमावाचा सामना करू शकले. पण सोशल मीडियावर ट्रोल होण्याचा मात्र त्यांना अनुभव नाही.

त्यांचं जाहीर कौतुक करणाऱ्यांमध्ये फरहान अख्तर, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा आदींचा समावेश होता. परंतु, तो आनंद साजरा करण्याची संधीच गगनदीप यांना मिळाली नाही. त्यांचा अभिमान वाटणाऱ्या त्यांच्याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, त्यांना काही दिवस रजेवर पाठवण्यात आलं आहे.

Image copyright FACEBOOK/GAGANDEEPSINGH

रामनगरमधली चर्चा

पोलीस अधिकाऱ्यांच्या देहबोलीवरून 27 वर्षीय गगनदिप यांच्या प्रकरणातून त्यांचा उडालेला गोंधळ तर स्पष्टच दिसत होता. पण, ते गायब होण्याचं खरं कारण रामनगरमध्ये सुरू असलेल्या चर्चेत मिळू शकतं.

गगनदीप सिंग यांनी ज्याला वाचवलं तो युवक मुस्लीम होता. त्याला हिंदू मुली सोबत काही तरुणांनी 'धरलं' होतं. राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी हा कथित 'लव्ह जिहाद'चाच प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

रुद्रपूर येथील भाजपचे आमदार राजकुमार ठुकराल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, कायदा सुव्यवस्थेतली ही हलगर्जी असल्याचं म्हटलं. तसंच, 'लव्ह जिहाद'चं कोणतंही प्रकरण सहन करणार नाही, असंही सांगितलं. त्यांच्या या विधानाचा प्रभाव स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर स्पष्टपणे दिसत होता.

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

रामनगरच्या तुजीया मंदिराच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक सरपंच राकेश नैनवाल यांनी बीबीसीला सांगितलं की, "ही घटना एवढी मोठी नव्हती. त्याचं अवाजवी कौतुक झालं. आमच्या कार्यकर्त्यांनी दोन थपडाच तर मारल्या होत्या. तुम्ही व्हीडिओ बघा. कोणाकडे शस्त्रही नव्हतं."

प्रतिमा मथळा राकेश नैनवाल

"ते लोक मंदिराच्या परिसरात काय करत होते, कसे वागत होते, पोलिसांनी लक्ष का दिलं नाही."

वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असं रामनगरमधल्या काही लोकांचं म्हणणं होतं.

कैसर राणा या स्थानिकानं सांगितलं की, "गेल्या काही काळापासून रामनगरमधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लव्ह जिहादच्या नावावर मुसलमानांना लक्ष्य केलं जात आहे. तरुण मुलंमुली एकमेकांना भेटत असतील तर त्यात वावगं काय आहे, त्यावर लगेच लव्ह जिहादचा शिक्का का मारला जातो."

Image copyright FACEBOOK/GAGANDEEPSINGH

रामनगरमधील आणखी एक रहिवासी आणि रंगकर्मी अजित साहनी म्हणतात, "धर्माच्या कुबड्या वापरून केलं जात असलेलं हे राजकारण आहे. गगनदीप सिंग यांनी त्या युवकाला ज्या पद्धतीनं वाचवलं, तसं चित्रं भारतभर दिसावं असं वाटतं."

अशा परिस्थितीत, भाजपच्या स्थानिक राजकारण्यांच्या आक्रमकतेमुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे, हे सहज लक्षात येतं. अर्थात, अधीक्षक खंडुरी म्हणतात, "आमच्यावर कोणताही दबाव नाही."

सध्याच्या परिस्थितीत गगनदीपशी न बोलणंच बरोबर असल्याचं ते पुन्हा पुन्हा सांगतात.

Image copyright WHATSAPP/GAGANDEEP SINGH
प्रतिमा मथळा गगनदीप सिंग यांचं व्हॉट्स अपवरील स्टेटस

गगनदीप सिंग यांनी नेमकं काय केलं तेइथे वाचा.ब्लॉग: शाब्बास, गगनदीप सिंग!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)