'राष्ट्रीयतेबाबत हिंदू नपुंसक' या संभाजी भिडेंच्या विधानाला किती महत्त्व द्यावं?

संभाजी भिडे Image copyright Raju Sanadi

'राष्ट्रीयतेच्या कसोटीवर हिंदू स्त्री-पुरुष नपुंसक आहेत' असं विधान करत संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जळगावमध्ये एका कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे वादग्रस्त नेते संभाजी भिडे यांनी हे विधान केलं.

"राष्ट्रीयतेच्या कसोटीवरती हिंदू स्त्री आणि पुरुष हे नपुंसक आणि वांझ आहेत. त्यांच्या पेशीत राष्ट्रीयत्वाच्या पेशी नसतात. मी विचित्र बोलतोय, असं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण या बाबतीत हिंदू स्त्री-पुरूष हे अनुत्तीर्ण आहेत," असं त्यांनी म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 80 वर्षांच्या संभाजी भिडेंविरोधात 2 जानेवारीला पिंपरीत गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटेंच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला होता. एकबोटेंना अटक झाली, पण भिडेंना अटक का झाली नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला असतानाच भिडेंचं हे वादग्रस्त विधान पुढे आलं आहे.

एका हिंदुत्ववादी संघटनेचा नेता जेव्हा हिंदूंसाठी एवढी कठोर भाषा वापरतो, तेव्हा तो हिंदूंना पेटवण्याचा प्रयत्न आहे का?

"सामाजिक सलोख राखायचा नाही, लोकांना एकमेकांच्याविरोधात चिथावायचं. शिवाजी महाराजांच नाव घेऊन त्यांची बदनामी करायची. असली कामं भिडेंनी केलीयेत," असं ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे म्हणतात. त्यांच्या मते भिडेंच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

पण भिडेंचं विधान आजच्या परिस्थितीत चुकीचं असलं तरी त्यांचं उद्दिष्ट तरुणांना प्रोत्साहित करण्याचं असतं, असं पत्रकार शुभांगी खापरे यांना वाटतं.

"संभाजी भिडे यांच्या नजरेतून बघितलं तर ते नेहमी मी राष्ट्रभक्तीतून विधानं करतो, असं म्हणतात. ते जहालवादी आहेत असं आपण म्हणू शकतो. राष्ट्रभक्ती हा त्यांचा मूळ पाया म्हणता येईल. राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून युवा पिढीला प्रोत्साहित करण्याचं त्यांचं ध्येय असावं, असं मला वाटतं.

"पण त्यांची जी विधानं असतात किंवा संदर्भ असतात ते आजच्या परिस्थितीत किती अनुकूल आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यातून एक विपरित परिणामही होऊ शकतो. भिडे यांची सगळी विधानं बरोबर आहेत का? तर नाही. त्या विधानांचा जातीय सलोख्यावर वेगळा परिणाम होतो," असं शुभांगी खापरे सांगतात.

Image copyright Raju Sanadi
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

कोण आहेत संभाजी भिडे?

मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीत राहतात. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे 1980च्या दशकात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त कार्यरत होते, असं सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी सांगतात.

संघाशी वाद झाल्यानंतर त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघ स्थापला होता. बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगतात, असंही जोशी सांगतात.

'हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,' असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. शिवप्रतिष्ठानने रायगडावर 32 मण इतक्या वजनाचं सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे.

मोदी-भिडे भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची भेट 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान रायगड इथं झाली होती. याच कार्यक्रमाचं छायाचित्र मोदी यांनी शिवाजी महारांजाच्या जयंतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांच्या व्हीडिओमध्ये वापरल होतं. जानेवारीत भीमा कोरेगाववरून महाराष्ट्रात तणाव वाढलेला असताना फेब्रुवारीत पंतप्रधानांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओमुळे मोठा वाद उफाळला होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, पंतप्रधानांनी हा व्हीडिओ ट्वीट करणं म्हणजे तपास यंत्रणांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचं त्यावेळेस बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं.

Image copyright Raju Sanadi

राष्ट्रवादीचे साताऱ्यातले खासदार उदयनराजे भोसले नेहमी भिडे यांच समर्थन करतात. पश्चिम महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी भिडेंना पाठिंबा दिला आहे.

"भिडे यांना सांगली भागात माणणारा मोठा वर्ग आहे. उजव्या विचारधाराचे राजकीय पक्षच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादीशीही त्यांच्या चांगला संपर्क आहे. तिकडचा व्होट बेसचा फायदा त्यात्यावेळेस विविध पक्ष घेतात," असं विश्लेषण पत्रकार शुभांगी खापरे करतात.

न झालेल्या अटकेवरून वाद

कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली, पण भिडेंना का नाही, असा प्रश्न भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी विचारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस चौकशीत भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळालेला नसल्याची माहिती विधानसभेत दिली होती.

तर भिडे आणि एकबोटे या दोघांवरील गुन्हा मागे घ्यावेत या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे राज्यात विविध ठिकाणी 28 मार्चला आंदोलन करण्यात आलं होतं. भिडेंवर लावण्यात आलेले आरोपच खोटे आहेत, असं शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांनी म्हटलं होतं.

संभाजी भिडेंना अटक होत नाही किंवा त्यांची चौकशी झाली नाही यात आश्चर्य वाटण्यासारख काहीच नाही, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं :

"भिडे हिंदुत्ववादी परिवारातले असल्याने भाजप सरकार त्यांना अटक करणार नाही. भिडेंचा राजकारण्यांवर प्रभाव आहेच आणि तो केवळ भाजपच्या नेत्यांवर नाही तर इतरही पक्षांच्या नेत्यांवर भिडेंचा प्रभाव आहे. त्यामुळे विरोधकांकडून हा मुद्दा प्रकर्षाने लावून धरलेला दिसत नाही."

भाजप भिडेंना वाचवत आहे या आरोपाचा भाजप प्रवक्ते माधव भांडरी यांनी इन्कार केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)