पोटनिवडणुकांचा अर्थ आणि इतर बातम्या : बीबीसी मराठीचा शुक्रवारचा राउंड अप

मोदी शहा

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभेच्या काही जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पालघरमध्ये विजय झाला, तर भंडारा-गोंदिया आणि कैरानात हार पत्करावी लागली. याशिवायच्या मोठ्या बातम्यांचा शुक्रवारचा राउंड अप -

1. पालघरमध्ये भाजपचा विजय, भंडारा, कैरानात हार

सोमवारी झालेल्या चार लोकसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. महाराष्ट्रात पालघरमध्ये भाजपचा विजय झाला तर भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे.

या निवडणूक निकालावर कुणाची काय प्रतिक्रिया आणि दिवसभरात निकाल उघड होताना कुठल्या क्षणी काय घडलं याच्या सविस्तर रिपोर्टसाठी बीबीसी मराठीची ही बातमी वाचा आणि कैरानातल्या भाजपच्या पराभवाचं विश्लेषण इथे वाचा.

2. उद्धव म्हणतात 'स्वबळावर' तर फडणवीस म्हणतात 'सेनेसह लढू'

फोटो स्रोत, @shivsena, @CMOmaharashtra

पोटनिवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद शिवसेनाभवनात झाली. त्यात, भाजपला आता मित्रांची गरज नाही. शिवरायांचा अपमान योगींनी केला. त्याबद्दल भाजपनं खुलासा केलेला नाही, असं ठाकरे म्हणाले. हा मी पराभव मानत नाही, असंही ठाकरे म्हणाले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही एक पत्रकार परिषद घेतली. पालघरमध्ये निवडणुकीच्या काळात निर्माण झालेला कडवटपणा आमच्याकडून संपला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. EVM मधला बिघाड हा भाजपवरील आरोप नाही निवडणूक आयोगावरचा आरोप आहे. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यायचं आहे, असंही ते म्हणाले. सविस्तर बातमी इथे वाचा.

3. लहान मुलांचा मेंदू खातात म्हणून आंध्रात परप्रांतीयांवर हल्ले

फोटो स्रोत, BBC/ Deepti Batthini

आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये आणि तेलंगणामधल्या चोटुप्पल, रचकोंडा आणि एजपल्ली या ठिकाणी मागच्या आठवड्यात पाचपेक्षा अधिक लोकांवर हल्ले झाले आहेत. विशाखापट्टणममध्ये झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्स अॅपवर फिरणाऱ्या या व्हीडिओमध्ये बिहार आणि राजस्थानमधून येणाऱ्या टोळ्या लहान मुलांचं अपहरण करून त्यांचा मेंदू खात असल्याचं सांगितलं जात आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

4. युगांडात व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वापरणाऱ्यांवर 'गॉसिप टॅक्स'

युगांडाच्या पार्लमेंटने एक अजब कायदा मान्य केला आहे. यानुसार सोशल मीडिया वापरणाऱ्यांवर या देशात आता टॅक्स आकारला जाणार आहे.

दिवसाला 200 शिलिंग म्हणजे साधारण 0.05 डॉलर इतका टॅक्स आकारला जाणार आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, व्हायबर, ट्विटर अशा कुठल्याही सोशल मीडियाच्या वापरावर हा कर आहे. या नव्या करामुळे अफवा आणि गॉसिपला आळा बसेल असं सरकारचं मत आहे. नव्या करात आणि कायद्यात काय तरतुदी आहेत यासाठी बीबीसी इंग्लिशनं दिलेली ही बातमी वाचा.

5. जगातल्या 'सगळ्यांत म्हाताऱ्या' माणसाला बिडी सोडणं जातंय जड

फोटो कॅप्शन,

फ्रेडी ब्लॉम

फ्रेडी ब्लॉम हे दक्षिण आफ्रिकेतले आजोबा लवकरच वयाची 114 वर्षं पूर्ण करणार आहेत. ते जगातील सर्वांत वयोवृद्ध म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. पण या वयातही हे ब्लॉम आजोबा एक प्रयत्न करत आहेत, तो म्हणजे स्मोकिंग सोडण्याचा.

"मी खूप वर्षांपूर्वीच दारू पिणं सोडलं पण स्मोकिंग अजून सुटत नाहीये. मी रोज दोन-तीन पिल्स ओढतोच", असं फ्डेडी ब्लॉम सांगतात. या आजोबांची गोष्ट बीबीसी मराठीच्या या बातमीत वाचा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)