चंदा कोचर: ICICI-व्हीडिओकॉन वाद नेमका आहे तरी काय?

चंदा कोचर Image copyright MONEY SHARMA/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा चंदा कोचर

ICICI या भारतातल्या दुसऱ्या सर्वांत मोठ्या खासगी बँकेचं यश चंदा कोचर यांच्यामुळेच, असं गेल्या दशकभरापासूनचं समीकरण. ICICI बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO असलेल्या चंदा कोचर यांची भारतातल्या उद्योग क्षेत्रातली सर्वांत शक्तिशाली महिला म्हणूनही ओळख आहे.

पण नुकतेच त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन आणि हितसंबंधांसाठी व्यवहार केल्याचे काही आरोप ठेवण्यात आले आहेत. पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) कोचर यांच्यासह व्हीडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमका हा वाद?

एप्रिल 2012 - ICICI बँकेनं व्हीडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. कर्जाखाली अडकलेल्या व्हीडिओकॉन समूहाला 20 बँका आणि काही आर्थिक संस्थांनी 40 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते.


ऑक्टोबर 22 , 2016 - ICICI बँक आणि व्हीडिओकॉन ग्रुपमधील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. मूळत: 15 मार्च 2016रोजी लिहिलेल्या या पत्रात ICICI बँक ज्या मार्गांनी व्यवहार करत आहे, त्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.

व्हीडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचं जे कर्ज देण्यात आलं, त्यात हिंसंबंधांचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलं होतं. यामागे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हीडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.


Image copyright DIRK WAEM/AFP/GETTY IMAGES

मार्च 28, 2018 - ICICI बँकेच्या मंडळानं एक पत्रक जाहीर करून चंदा कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं होतं. तसंच या व्यवहारात कुठल्याही प्रकारची चूक आणि हितसंबंधांचा गैरवापर झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

ICICI बँक आणि बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी अशी अफवा पसरवण्यात अली, असं पत्रकात म्हटलं होतं.


मार्च 29, 2018 - इंडियन एक्स्प्रेस च्या एका बातमीमध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्यात झालेल्या आर्थिक देवाणघेवाण आणि व्यावसायिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यानुसार...

  • 2008च्या डिसेंबर महिन्यात दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांनी एकत्र येत न्यू-पॉवर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी तयार केली. या कंपनीत कोचर आणि धूत यांचा 50-50% हिस्सा होता.
  • जानेवारी 2009 महिन्यात धूत यांनी कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि आपले 25, 000 शेयर फक्त 25 लाख रुपयांना दीपक कोचर यांच्या कंपनीला ट्रान्सफर केले.
  • यानंतर मार्च 2010मध्ये न्यू-पॉवर कंपनीला सुप्रीम एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनीकडून 64 कोटींचं कर्ज मिळालं. सुप्रीम एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी धूत यांच्या मालकीची आहे.
  • 2010च्या मार्च महिन्याच्या शेवटी धूत यांची सुप्रीम एनर्जी कंपनी न्यू-पॉवर कंपनीत 94.9 टक्के भागीदार बनली.
  • नोव्हेंबर 2010मध्ये धूत यांनी सुप्रीम एनर्जी कंपनीतली आपली संपूर्ण भागीदारी महेश चंद्र पुगलिया यांच्याकडे ट्रान्सफर केली.
  • 2012मध्ये पुगलिया यांनी त्यांची संपूर्ण भागीदारी पिनॅकल एनर्जी या ट्रस्टला ट्रान्सफर केली. ट्रान्सफर केलेली रक्कम फक्त नऊ लाख रुपये होती. दीपक कोचर या ट्रस्टचे अध्यक्ष होते.
  • याचा परिणाम असा झाला की, कधीकाळी न्यू पॉवर कंपनीला 64 कोटी रुपयांचं कर्ज देणारी सुप्रीम एनर्जी ही कंपनी तीन वर्षांच्या आत पिनॅकल एनर्जीमध्ये सामील झाली.
  • हा व्यवहार झाल्याच्या सहा महिन्यांपूर्वी व्हीडिओकॉन समूहाला ICICI बँकेकडून 3,250 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालं होतं.
  • यापैकी जवळपास 86 टक्के रक्कम म्हणजे 2,810 कोटी रुपये बाकी आहे आणि व्हीडिओकॉन समूहाचं खातं non-performing asset (NPA) म्हणून ICICI बँकेनं 2017मध्ये जाहीर केलं होतं.
Image copyright INDRANIL MUKHERJEE/AFP/GETTY IMAGES

मार्च 31, 2018

दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांची प्राथमिक चौकशी CBI करणार असल्याचं माध्यमांतून समोर आलं होतं. चंदा कोचर यांच्या नावाचा प्राथमिक चौकशीत समावेश करण्यात आलेला नाही.


एप्रिल 4, 2018

आयकर विभागाकडून संबंधित प्रकरणाबद्दल दीपक कोचर यांच्या न्यू-पॉवर कंपनीला नोटीस बजावण्यात आली.


मे 24, 2018

SEBIने ICICI बँक आणि बँकेच्या MD आणि CEO चंदा कोचर यांना कारणे-दाखवा नोटीस पाठवली.


मे 30, 2018

चंदा कोचर यांच्याविरोधातल्या आरोपांवरची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असं ICICI बँकेनं म्हटलं आहे. चौकशी सुरू असताना बँकेनं अनिश्चित काळासाठी त्यांना रजेवर पाठवलं आहे, अशा काही बातम्या सुरुवातीला आल्या. पण नंतर बँकेकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की, चंदा कोचर या वार्षिक सुट्टीवर आहेत.


24 जानेवारी, 2018

सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईतील दोन तर औरंगाबादच्या एका कार्यालयावर छापे टाकले. त्यानंतर CBIने चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)