हस्तमैथुन बायकाही करतात, हो मग?

लैंगिक इच्छा

बरं... बाईनं हस्तमैथुन केलं, मग एवढं काय आकाश कोसळलं?

स्वतःची लैंगिक इच्छा स्वतःच शमवायची उर्मी अतिशय नैसर्गिक आहे. माणसं, माकडं हस्तमैथुन करतात. कुत्रे आणि ब्लू व्हेलही स्वमैथुन करतात.

जर आपण पुरुषांच्या हस्तमैथुनबद्दल बोलत असतो, तर हा प्रश्न कदाचित पडलाच नसता. ती अगदीच सामान्य गोष्ट आहे इथपासून ते यामुळेच स्त्रियांवरचे लैंगिक अत्याचार कमी व्हायला मदत होते अशा काही निष्कर्षांची चर्चाही झाली असती.

मग आजच एवढा गदारोळ का?

ही चर्चा करण्याचं कारण म्हणचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात स्वरा भास्करचं पात्र व्हायब्रेटरच्या साहाय्याने हस्तमैथुन करताना दाखवलं आहे.

याच सीनमुळे ट्विटरवर वादळ उठलं आहे. साहजिक आहे, स्वरा भास्करने जो रोल केला आहे, त्या बाईचं लग्न झालं आहे. ती नवऱ्याला गृहीत न धरता आणि न विचारता आपल्या लैंगिक इच्छा स्वत:च पूर्ण करत आहे. सेक्स म्हणजे बाईचं समर्पण, तिने द्यायचं आणि पुरुषांने घ्यायचं, अशा कल्पनांना ती बळी पडत नाही. ती तिच्या नवऱ्याकडून खूश नाही आणि तिने तिचा मार्ग शोधला आहे.

पण यासाठी स्वरा भास्कर सोशल मीडियावर जाम ट्रोल होतेय.

Image copyright Facebook/Swara Bhaskar

फिरकी या अकाऊंटवरून एकाने ट्वीट केलं, "मी माझ्या आजीसोबत हा पिक्चर पाहायला गेलो. जेव्हा तो हस्तमैथुनाचा सीन आला तेव्हा आम्हाला खूपच लाज वाटली."

आरती अग्रवाल लिहितात की, "स्वरा भास्करने तिच्या चित्रपटात जे काही केलं, ते सॉफ्ट पॉर्नपेक्षा काही वेगळं नाही. आणि याला भारतात बॅन केलं नाही."

Image copyright Twitter

मी आजीला घेऊन या पिक्चर पाहायला गेलो होतो, अशा आशयाचं ट्वीट अनेकांनी केलं. अशा लोकांना टोमणा मारण्याचा मोह जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही आवरला नाही.

त्यांनी लिहिलं, "एवढे सगळे जणं आपआपल्या आज्यांना घेऊन पिक्चरला चाललेत हे फारच गोड आहे. माझीही आजी आत्ता असती तर किती मजा आली असती."

अर्थात स्वरा भास्करला पाठिंबा देणारेही कमी नाहीयेत. महिला सक्षमीकरणाचा खरा संदेश देण्यात हा चित्रपट कमी पडला, अशी टीका या चित्रपटावर झाली होती.

त्यावर सोनिया मरियम थॉमस यांनी ट्वीट केलं की, "ज्यांना कोणाला वाटतं असेल की 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा अजून वैचारिक, योग्य संदेश देणारा असावा, त्यांनी हे लक्षात ठेवावं की प्रत्येक स्त्री-केंद्री चित्रपटाने काही संदेश दिलाच पाहिजे असं नाही. बायका फक्त मजा करतात हे तुम्हाला का सहन होत नाही?"

पण होतंय काय, की सगळं लक्ष तो सिनेमा, आणि त्या सिनेमातल्या अभिनेत्री, त्यांनी केलेल्या भूमिका यावर केंद्रित होत आहे.

पण ज्या बायका आपल्या लैंगिक समाधानासाठी झगडतात, कदाचित संपूर्ण समाधानी नसतात, हस्तमैथुनाबद्दल बोलायला घाबरतात आणि केलंच कधी तर प्रचंड गिल्ट घेऊन जगतात त्यांचं काय?

Image copyright Getty Images

मुळात बायका हस्तमैथुन करतात का? अर्थातच हो! पण त्यांचा हा प्रवास पुरुषांइतका सोपा नसतो. कोणत्याही पुरुषाला विचारा तू शेवटचं हस्तमैथुन कधी केलं होतं, त्याचं उत्तर असेल, आज सकाळी, काल, परवा, एका आठवडयापूर्वी, जास्तीत जास्त महिन्यापूर्वी.

बाईला हाच प्रश्न विचार तर? तुम्हाला उत्तर मिळणारच नाही.

कारण आपल्या लैंगिक इच्छा आकांक्षांविषयी एखादी स्त्री आपल्या नवऱ्याशीही खुलेपणाने बोलू शकत नसेल तर या विषयावर चारचौघात काय बोलणार. पण आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की, हस्तमैथुन करणाऱ्या बायकांची संख्या कमी नाही.

"जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात," हैद्राबाद येथील सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शर्मिला मुजूमदार सांगतात.

अर्थात भारतात अशी आकडेवारी उपलब्ध होणं कठीण आहे कारण भारतीय स्त्रियांना आपण हस्तमैथुन करतो हे सांगण्यात संकोच किंवा अपराधी वाटतं.

महिलांनी हस्तमैथुन करण्याचे फायदेही त्या विषद करतात. "हस्तमैथुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैंगिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरोदरपणाचा धोका नसतो."

Image copyright Getty Images

आणखीही फायदे आहेत. स्लीप मेडिसीन या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार हस्तमैथुनामुळे restless leg syndrome (मज्जासंस्थेचा एक आजार ज्यामुळे सतत पाय हलवण्याची इच्छा होते आणि बैचेन व्हायला होतं) बरा होण्यासही मदत होते.

"सतत तणावाखाली वावरणाऱ्या भारतीय महिलांना हस्तमैथुनामुळे हलकं वाटू शकतं," त्या पुढे सांगतात.

स्त्रिया हस्तमैथुन का करतात?

शर्मिलांच्या मते हस्तमैथुन हा आनंददायी अनुभव आहे. "माझ्या शरीरावर आणि लैंगिक आनंदावर माझं नियंत्रण आहे आणि दुसरं कोणी माझ्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही ही भावना हस्तमैथुनामुळे मिळते. ही भावना हवीहवीशी वाटते," असं त्या सांगतात.

"आपल्याला काय हवंय, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चतम बिंदू काय केलं की गाठता येतो, अशा सगळ्या गोष्टी बाईला हळूहळू कळू लागतात. हा तिच्यासाठी मुक्त करणारा अनुभव असतो," त्या सांगतात.

स्त्रियांच्या हस्तमैथुनावरून एवढा गहजब का?

"स्त्रियांनाही लैंगिक इच्छा-आकांक्षा असतात हे आपल्या समाजात मान्यच नाही," लेखिका आणि एका पब्लिकेशन हाऊसमध्ये संपादक असलेल्या योजना यादव सांगतात.

"याच्या इतकं दुर्दैव नाही दुसरं काही. आपण 21व्या शतकात आहोत आणि याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे नाही आहे. बाई आपल्या इच्छा स्वतःच पूर्ण करू शकते हे पचनी पडत नाही," असं त्या सांगतात.

"बाईला सेक्सविषयी काही माहीत असावं, त्याविषयी तिने स्वतः काही प्रयोग करावे, नवऱ्याकडे किंवा प्रियकराकडे आपल्याला हव्या तशा सुखाची मागणी करावी हे चालतच नाही आपल्या लोकांना. आणि त्यातूनही एखादीने असा प्रयत्न केला तर ते तिच्या नैतिकतेशी जोडलं जातं," असं त्यांचं मत आहे.

Image copyright Getty Images

"हिला हे सगळं माहीत आहे म्हणजे ही काहीतरी भयंकर आहे असाच शिक्का मारतात लोक. तिने ते सगळं येता-जाता अनुभवलय, आणि she is a bad girl असं सर्रास ठरवून मोकळे होतात लोक," असं त्या सांगतात.

"मला विचाराल तर स्त्रियांमध्ये हस्तमैथुन अगदी कॉमन आहे. माझ्या मैत्रिणी असतील किंवा माझ्या नात्यातला बायका, सगळ्यांनी मला सांगितलं आहे की त्यांनी हस्तमैथुन कधी ना कधी ट्राय केलं आहे. पण त्याकडे बघायची समाजाची दृष्टी स्वच्छ नसल्याने त्यांना प्रचंड अपराधी वाटतं. मला समजत नाही यात अपराधी वाटण्यासारखं काय आहे? तुमचं डोकं दुखायला लागलं की तुम्ही डोकं चेपता ना? तितकंच हे नैसर्गिक आहे हे. तुम्हाला होणाऱ्या सेन्सेशन्स त्या त्या वेळी पूर्ण करणं या गैर काहीच नाही," असं त्या म्हणाल्या.

पण समाजाने मात्र या नैसर्गिक गोष्टीचा अधिकार स्त्रियांना नाकारला आहे. आपल्या भाषेत हस्तमैथुनाच्या क्रियेला स्त्रियांच्या अनुषगांने शब्दच नाहीत. जे आहेत ते पुरुषांनी क्रिया करण्यावर आहेत. "म्हणजे आपल्या एक कन्सेप्ट म्हणूनही स्त्रियांचं हस्तमैथुन मान्य नाही," असं त्या सांगतात.

शर्मिला असो वा योजना, दोघींनाही यावर एकच उपाय दिसतो. "स्त्रियांच्या मनातला अपराधीभाव आणि संकोच घालवण्यासाठी यावर खुलेपणाने चर्चा करणे. जेव्हा स्त्रिया यावर खुलेपणाने बोलून आपले अनुभव मांडायला लागतील, तेव्हाच समाजातून या गोष्टीला होणारा विरोध कमी कमी होत जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)