#5मोठ्याबातम्या : श्रीलंका दौऱ्यासाठी Under-19 संघात अर्जुन तेंडुलकर

अर्जुन तेंडुलकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अर्जुन तेंडुलकर

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाइट्सवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे.

1. श्रीलंका दौऱ्यासाठी अर्जुन तेंडुलकरची निवड

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरकरचा मुलगा ऑलराउंडर क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या Under-19 संघात निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, हा भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर रवाना होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन चार-दिवसीय सामने आणि पाच वनडे सामने खेळणार आहे.

18 वर्षांचा डावखुरा जलदगती गोलंदाज असलेल्या अर्जुनचा समावेश चार दिवसीय सामन्यांसाठी केला गेला आहे. पण वनडे संघात त्याला स्थान मिळू शकलं नाही.

2. 'गौरी लंकेश हिंदूविरोधी, म्हणून हत्या केली'

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कथित हत्यार व्यापारी के. टी. नवीन कुमार याने सांगितलं की त्याच्याकडून हत्यारं विकत घेणाऱ्यांनी त्याला "गौरी लंकेश हिंदूविरोधी आहेत, म्हणून त्यांची हत्याच व्हायला हवी, असं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन,

गौरी लंकेश

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, गौरा लंकेश यांच्या हत्येनंतर प्रोफेसर के. एस. भगवान यांच्या हत्येचीही योजना आखण्यात आल्याचं नवीन कुमार यांनी सांगितलं आहे.

2015मध्ये एम.एम कलबुर्गी यांची धारवाड येथे हत्या झाल्यानंतर भगवान यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं होतं.

नवीन कुमार यांचं 12 पानी स्टेटमेंट हे गोरी लंकेश यांच्या हत्येच्या नऊ महिन्यांनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटचा एक भाग आहे. या चार्जशीटमध्ये 131 मुद्दे पुरावा म्हणून समोर आले आहेत, तसंच लंकेश यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी तयार केलेला मॅपही समोर आला आहे.

3. 'एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरला'

31 डिसेंबर 2017ला पुण्यात झालेल्या 'एल्गार परिषदे'च्या आयोजनासाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पुणे पोलिसांनी केला आहे.

पाचही आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्यानेच त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही पुणे पोलिसांनी केल्याची महाराष्ट्र टाईम्सची बातमी सांगते.

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

"पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात होता. या परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला होता. तसंच नक्षली कनेक्शनच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींकडे सापडलेल्या साहित्यावरून त्यांचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचं स्पष्ट होत आहे. या आरोपींचा भीमा-कोरेगाव दंगलीशी संबंध आहे की नाही, याचा तपास करण्यात येत आहे," असं पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

4. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, पालिका अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

8, 9 आणि 10 जूनला मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानंतर मुंबई महापालिकेनं आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेनं सर्व अधिकाऱ्यांची शनिवार आणि रविवारची सुट्टी रद्द केली आहे.

तसंच सर्व अधिकाऱ्यांना सजग आणि सतर्क राहण्याचे महापालिका प्रशासनानं आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबई शहरात काल पहाटेपासूनच पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या.

5. पुण्यात हिंदू-मुस्लीम एकतेचं अनोखं दर्शन

रमझान सुरू असल्यानं ठिकठिकाणी दर्गा आणि मशिदींमध्ये इफ्तार आणि नमाजचं आयोजन केलं जात आहे. मात्र येरवडा येथील सदलबाबा दर्ग्यात नमाज आणि संत तुकाराम महाराजांचं भजन एकत्र करत हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण घालून देण्यात आलं आहे.

लोकसत्ताच्या बातमीनुसार, रमझानच्या 21व्या दिवशी म्हणजे 6 जूनला भजन आयोजित करण्यात आलं होतं. त्याच दिवशी उरुसही साजरा करण्यात आला. तेव्हा हा अनोखा प्रसंग लोकांनी घडवून आणला.

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, हिंदु्स्तान टाइम्सच्या बातमीनुसार कर्नाटकातले भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी नरसवेकांना फक्त हिंदूंसाठी काम करा, कारण त्यांनी आपल्याला मतं दिली आहेत, असा सल्ला दिला आहे.

"मी सर्व नगरसेवकांना बोलावलं होतं. त्यांना मी सांगितलं की, त्यांनी फक्त हिंदूसांठी काम केलं पाहिजे ज्यांनी बिजापूरमध्ये मला मतदान केलं, मुस्लिमांसाठी नाही. मी मुस्लिमांना नकारच दिला आहे. मी माझ्या लोकांनाही टोप्या आणि बुरखा घातलेले ऑफिसमध्ये आलेले अथवा माझ्या बाजूला उभे राहिलेलंही चालणार नाही, अशी सूचना केली आहे," असा यतनाल यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)