एसटी : सरकारशी चर्चेनंतर अखेर संप मागे

एसटीचा प्रवास महागला Image copyright Getty Images

पाहूयात आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. एसटीचा संप मिटला

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा अघोषित संप शनिवारी रात्री अधिकृतपणे मागे घेण्यात आला.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, वेतनवाढीबद्दल बैठक घेण्याची ग्वाही सरकारने दिल्यानं हा संप मागे घेण्यात आल्याचं संघटनांतर्फे सांगण्यात आलं.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ करार कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावा, तसेच 4,849 कोटींची ऐतिहासिक वेतनवाढ स्वीकारावी असं आवाहन केलं होत.

सह्याद्री अतिथीगृह इथं सरकार आणि कामगार संघटना यांच्यात बैठक झाली.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार लागू असलेला घरभाडेभत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा दर एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचं बैठकीत मान्य करण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

2. दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर

"दंगल माजविणे हाच सरकारचा अजेंडा आहे. कारण दंगलीनंतर व्यवस्था कोलमडल्याच्या नावाखाली आणीबाणी लावून निवडणुका घेता येणार नाहीत, असं वातावरण तयार केले जाईल," असा आरोप भारीप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्ससह विविध वृत्तपत्रांनी याबाबत वृत्त दिलं आहे. भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या सातव्या पंचवार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन करताना अॅड. आंबेडकर बोलत होते

"देशातील विविध समाजघटकांत अस्वस्थता पसरवण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. सरकारला दंगल करण्याची, जाळपोळ करण्याची संधीच मिळू देऊ नका. सत्ता हाती घेण्याचे ध्येय ठेवा," असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावर 1३ जूनला मुंबईत उत्तर देऊ, असं ते म्हणाले.

3. पोलिसांन हवेत RAW, IBचे निवृत्त अधिकारी

राज्य गुप्तवार्ता विभागाने रॉ (RAW) आणि इंटेलिजन्स ब्यूरो (IB)च्या निवृत्त अधिकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. अशा अधिकाऱ्यांना विभागात नोकरी देण्यात येणार असल्याच वृत्त लोकमतने दिलं आहे.

Image copyright Getty Images/AFP

अनुभवी अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्यानं IB आणि RAW सारख्या संस्थांमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांची एक वर्षाच्या करार पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांनी नुकताच घेतला आहे.

किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना आणि प्रतिनियुक्तीवर काम केलेल्यांनाही संधी मिळणार आहे.

गुप्तवार्ता विभागाच्या मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक विभागात एकूण १० पदं भरली जाणार आहेत.

4. राज्यात काँग्रेसचा महाआघाडीचा प्रयत्न

महाराष्ट्रात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

Image copyright Getty Images

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, बहुजन विकास आघाडी, CPM, RPI (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी, यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधी 70 टक्के मतं आणि कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर झालेली समीकरणं याचा विचार करता काँग्रेसने महाराष्ट्रातही या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

या बैठकीचा अहवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना देण्यात येणार आहे.

5. पोलीस उपअधीक्षकांनी मागितली आत्महत्येला परवानगी

राज्याच्या पोलीस खात्यात मनमानी पद्धतीनं बदल्या होत असल्याचा आरोप हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस उपअधिक्षक सुजाता पाटील यांनी केला आहे.

न्यूज18 लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, सुजाता पाटील यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. त्यांना मुंबई इथं बदली हवी आहे. माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करावा अन्यथा मला आत्महत्येस परवानगी द्यावी, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

कौटुंबीक कारणामुळं बदली मागितली मात्र डावलण्यात आल्याचा आरोप, सुजाता पाटील यांनी केला आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयातील अधिकारी योग्य वागणूक देत नाहीत. काही मर्जीतील अधिकाऱ्यांना हव्या त्या पोस्टिंग मिळतात, असा आरोपही त्यांनी केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)