धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे : असा रंगणार परळी विधानसभेचा सामना

पंकजा आणि धनंजय मुंडे Image copyright Facebook
प्रतिमा मथळा पंकजा आणि धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते. 2009 मध्ये या पटावर पंकजा मुंडेंची एंट्री झाली.

तेव्हापासूनच या दोघांमधलं राजकीय द्वंद्व चर्चेचा विषय ठरलं आहे. आणि आज या भावा-बहिणीच्या इतिहासात डोकावण्याचं निमित्त आहे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं.

बीड इथं राष्ट्रवादीच्या सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली. परळी मतदारसंघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

साहजिकच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात होणाऱ्या थेट लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणाकडे पाहायचं झाल्यास आतापर्यंत झालेल्या विविध निवडणुकांचा इतिहास पाहावा लागेल.


लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे या निवडून आल्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे बजरंग सोनवणे निवडणूक रिंगणात होते. बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांच्याजवळचे. त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते.

बीड-उस्मानाबाद-लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस परिषदेत निवडून गेले. या फेरीमध्ये पंकजांनी बाजी मारली. धनंजय हरले.

अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत उमेदवार सुरेश धस आणि जगदाळे उभे होते. असे असले तरी खरी निवडणूक पंकजा आणि धनंजय यांच्यातच लढली गेल्याचं मानलं जात होतं.

या निवडणुकीत भाजपचे रमेश कराड यांनी ऐन वेळेस राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यांनी राष्ट्रवादीने तिकीटही जाहीर केलं, पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कराड यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यातही पंकजा यांची राजकीय खेळी यशस्वी झाल्याची चर्चा राज्यभर झाली.

राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे नेते असलेल्या या बहीण-भावांमध्ये जवळपास गेल्या 9 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या दोघांमुळे अगदी कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी निवडणूकही राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

पंकजांच्या एंट्रीने चित्र बदललं

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.

2012 पर्यंत धनंजय आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील संबंध बऱ्यापैकी ताणले गेले.

जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.

Image copyright Pankaja Munde/Facebook

यापाठोपाठ धनंजय मुंडेंचे वडील (आणि गोपीनाथरावांचे भाऊ) पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर धनंजय मुंडे केवळ तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये होते.

2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले.

पंकजा विरुद्ध धनंजय संघर्षाला सुरुवात

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंना स्वतःच्या मतदारसंघात म्हणजेच बीडमध्ये लक्ष केंद्रित करून राहावं लागलं. ही लोकसभा निवडणूक जिंकून मुंडे दिल्लीत गेले आणि मोदी कॅबिनेटमध्ये ग्रामविकास मंत्री झाले. पण मंत्री झाल्याच्या आठव्याच दिवशी त्यांचा दिल्लीत अपघातात मृत्यू झाला.

मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. धनंजय तसे राजकारणात मुरले होते तर पंकजा आतापर्यंत वडिलांच्या पंखांखाली राजकारण करत होत्या. पण शोक करत बसायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. पाच महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या होत्या.

Image copyright Dhananjay Munde/ Facebook

गोपीनाथ मुंडेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तीच इच्छा पुढे पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी जाहीरही केली. एकीकडे राज्याच्या राजकारणावर लक्ष असलेल्या पंकजांना घरच्या मतदारसंघात चुलत भाऊ आव्हान देत होता.

परळी मतदारसंघावर कुणाची सत्ता हा तर संघर्षाचा केंद्रबिंदू होऊ लागला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली.

विधानसभा निवडणुकीनंतर वैद्यनाथ बॅंक आणि वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्येही भाऊ-बहीण समोरासमोर होते. पण या दोन्ही संस्था ताब्यात ठेवण्यात तेव्हा पंकजा मुंडे यांना यश आलं.

भगवानगडाचं राज्य कुणाचं?

मुंडे यांच्या वंजारी समाजात भगवानगड हे नुसतं आध्यात्मिक ठिकाण नाही तर त्यापेक्षाही महत्त्वाचं केंद्र आहे. या गडावर गोपीनाथ मुंडे दसऱ्याच्या दिवशी भाषण द्यायचे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातले वंजारी समाजाचे हजारो लोक हे भाषण ऐकायचे.

मुंडेंच्या निधनानंतर गडाच्या महंतांनी म्हटलं की यापुढे गडावर राजकीय भाषण होऊ देणार नाही. 2016 साली पंकजा मुंडेंना गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली. महंत हे धनंजय मुंडेंशी संगनमत करून वागत आहेत, असा आरोप पंकजांच्या समर्थकांनी केला.

गेल्या वर्षी पंकजा यांनी भगवान बाबा यांचं जन्मस्थळ सावरगाव इथं मोठा दसरा मेळावा घेतला.

तत्पूर्वी धनंजय गडावर गेले असता त्यांच्या गाडीवर दकडफेक झाली. त्यांना माघारी फिरावं लागलं. अजूनही गडाचा वाद संपलेला नाही.

नगरपालिका ते जिल्हा परिषदेपर्यंत टक्कर

डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं. या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होते.

तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.

घरच्याच मैदानावर बहीण भावांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेत पंकजा मुंडे यांना पराभव पत्कारावा लागला.

नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंडे कुटुंबीयांमध्ये वर्चस्वाची जोरदार लढाई सुरू झाली होती.

त्यानंतर 2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.

दरम्यान, यावेळस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. माजी मंत्री सुरेश धस यांची साथ त्यांना लाभली.

पंकजा यांचं राजकीय वर्तुळात चर्चाही झाली.

Image copyright Dhananjay Munde/Facebook

धनंजय आणि पंकजा यांच्या वादामुळे बीडमधल्या स्थानिक निवडणुकांकडे राज्याचं लक्ष जातं. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.

अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केले होते. त्यावेळी पंकजा यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.

Image copyright Pankaja Munde/Facebook

मात्र पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूक पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला.

विधिमंडळात 'चिक्की' संघर्ष

एकीकडे निवडणुकांमध्ये ही चुरस पाहायला मिळत असताना विधिमंडळातही बहीण-भाऊ परस्परांसमोर उभे ठाकले.

जुलै 2015 मध्ये धनंजय मुंडेंनी थेट पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचा आरोप केला. विधान परिषदेमध्ये बोलताना धनंजय मुंडेंनी आरोप केला की पंकजा मुंडे यांच्या महिला बालकल्याण विभागात चिक्की खरेदीमध्ये 206 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे.

हा आरोप पंकजा मुंडेंसाठी जिव्हारी लागणारा होता. या आरोपानंतर तर दोघे बहीणभाऊ एकमेकांसमोर थेटपणे उभे राहिले.

Image copyright Twitter/dhananjay_munde
प्रतिमा मथळा लोकमतच्या कार्यक्रमातही दोघे सोबत होते.

पंकुताई-धनुभाऊंची गळाभेट

एप्रिल 2018 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दोघे एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांविरोधात लढणाऱ्या या भावा-बहिणीने गळाभेट घेतली आणि अनेकांना धक्का बसला.

पत्रकारांशी खासगीत बोलताना ते अजूनही अनेकदा एकमेकांचा पंकुताई आणि धनुभाऊ असा उल्लेख करतात.

दोन वेगळ्या पक्षातून एकाच जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढणारे हे भाऊ-बहीण अलीकडे एकाच व्यासपीठावर दिसू लागले आहेत. पण आताच्या निवडणुकीवरून दिसतं की त्यांच्यातलं राजकीय वैर अजूनही कायम आहे.

छुपा राजकीय करार?

या दोघांमधल्या राजकीय आणि वैयक्तिक संबधांविषयी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Image copyright Getty Images

"मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे वैयक्तिक नातेसंबध राजकारणापासून वेगळे ठेवले आहेत. असं अजिबात वाटत नाही की यांच्यात काही वैयक्तिक वितुष्ट येईल किंवा असेल. त्या दोघांचं वर्तन अगदी व्यावसायिक पद्धतीला धरून आहे," असं दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक (मराठवाडा) धनंजय लांबे म्हणतात.

"त्यांनी कधी पातळी सोडली नाही. त्यांनी कधीही एकमेकांवर वैयक्तिक आरोप केले नाहीत. राजकीय पातळीवर जरी वेगळे असले तरी कौटुंबिक पातळीवर ते एक आहेत," असंही धनंजय लांबे सांगतात.

Image copyright Facebook/Dhnanjay Munde

ते पुढे म्हणाले, "राजकारणात एकमेकांची जवळची माणसं तोडायची असतात. इथं ते दिसत नाही. राजकीय पुढारी लोकांच्या पाठिंब्यावर उभा असतो. इथं दोघांनी कधीही एकमेकांची माणसं तोडल्याचं दिसत नाही. दोघांना एकमेकांना संपवायचं नाही. राजकारण हे प्रोफेशनली करायचं आहे, असं दिसतं."

पण मुंडे भावा-बहिणीत छुपा राजकीय करार असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

बीड जिल्ह्याचं स्थानिक राजकारण जवळून पाहिलेले जेष्ठ पत्रकार अशोक देशमुख म्हणतात, "ते दोघं त्यांच्या त्यांच्या पक्षाचं राजकारण करतात. तालुक्यातल्या छोट्या छोट्या निवडणुकांमध्येही पक्षाची भांडण सुरू असतात. पण आपण भाऊ-बहीण आहोत, ही परस्पर समजूत त्या दोघांमध्ये आहे. नात्यात ते हे भांडण येऊ देत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)