ट्रंप आणि राज ठाकरे यांच्यात काय आहे साम्य?

  • निळू दामले
  • ज्येष्ठ पत्रकार
राज ठाकरे आणि डोनाल्ड ट्रंप

डोनाल्ड ट्रंप आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांचा आज वाढदिवस आहे. म्हटलं तर दोघांमध्ये काहीही साधर्म्य नाही. एक अमेरिकेचे अध्यक्ष आणि जगातले शक्तिशाली नेते. दुसरे पुढारी, भारतातल्या तीन निवडणुकांत सपशेल पराभव झालेले. पण या दोघांमध्ये अनेक साम्यस्थळंही आहेत. स्थलांतरितांविरोधात दोघांनीही रान उठवलं. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात तर ट्रंप यांनी मेक्सिकन लोकांविरोधात. याशिवायही त्यांच्यात काय का सारखं आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले.

अलीकडं देशोदेशी नागरिक टीव्हीच्या पडद्यावरील प्रतिमा पाहून आपली मतं ठरवतात. माणसाची तत्वज्ञ, कलाकार, नेता इत्यादी म्हणून असणारी लायकी नागरिक टीव्हीवर तो माणूस कसा दिसतो, किती वेळा दिसतो यावरून ठरवतात.

डोनाल्ड ट्रंप ते राज ठाकरे अशी माणसं लोकांना आकर्षित करतात. कारण ती टीव्हीवर सतत चमकत असतात.

डोनाल्ड ट्रंप यांची केशभुषा, मख्ख चेहरा, सतत टाळ्या वाजवणं, उजव्या हातानं ज्ञान मुद्रा करणं प्रेक्षकांच्या मेंदूत ठसलं आहे. विषय कोणताही असो. ते चिडलेले असोत की आनंदी. ते राजकीय सभेत असोत की आपल्या कुटुंबीयासमवेत. त्यांचं एकाच प्रकारचं दिसणं लक्षात येतं, इतर उपस्थितांमध्ये ते उठून दिसतात.

तसंच राज ठाकरे यांचं. राज ठाकरे जाहीर सभेत दिसतात, पत्रकार परिषदेत दिसतात, कधी कधी मंचावर मुख्य पात्र म्हणून मुलाखत देताना दिसतात. प्रेक्षकांची नजर आपल्यापासून इकडं तिकडं जाणार नाही याची काळजी ते घेत असतात.

त्यांचे स्वच्छ कपडे. मधून मधून टॉवेलनं नाक पुसणं. ते आणि प्रेक्षक यांच्यामध्ये, ते आणि प्रश्न विचारणारे यांच्यामधलं अनेक फुटांचं अंतर. मंच, लेक्टर्न, पाठीमागं घाशीराम कोतवालातल्या ब्राह्मणांसारखी रांगेत बसलेली माणसं. मध्येच कोणी तरी येऊन एखादी चिठ्ठी त्यांच्या समोर ठेवणं. अत्यंत आखीव आणि रेखीव अशी हातांची हालचाल. नकला. वेळोवेळी लोकांना हसण्यासाठी आणि टाळ्या वाजवण्यासाठी दिलेला पॉझ.

दोघांचंही बोलणं जनता गंभीरपणानं घेत नाही.

ट्रंप म्हणाले की ओबामा यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही. आपल्याकडं पुरावे आहेत असं ते अनेक वेळा म्हणाले. पत्रकारांनी पुरावे मागितले, ट्रंप यांनी ते दिले नाहीत.

जनतेनं कधीच पुरावे मागितले नाहीत. ओबामांचा जन्म अमेरिकेत झालेला असो किंवा नसो, नागरिकांना ट्रंप यांचं ठासून खोटं बोलणं आवडलं.

एकदा ते म्हणाले की 11 सप्टेंबरला ट्वीन टॉवर्स कोसळल्यानंतर न्यू जर्सीमध्ये लोकांनी जल्लोष साजरा केला.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पत्रकारांनी न्यू जर्सीतले पेपर शोधले, टीव्हीच्या बातम्या तपासल्या, पोलीस स्टेशनातल्या नोंदी पाहिल्या. कुठंही तशा घटनेची नोंद सापडली नाही.

हे सारं टीव्हीतल्या चर्चा करणाऱ्या पत्रकारांनी मांडलं. टीव्हीतली कंटाळवाणी काथ्याकुटी माहिती लोकांनी दुर्लक्षिली, पण ट्रंप यांनी ठासून केलेला आरोप लोकांनी लक्षात ठेवला.

राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं की मोदी आणि भाजपचे लोक लवकरच भीषण दंगली घडवून आणणार आहेत, आपल्याकडे निश्चित माहिती आणि पुरावे आहेत.

पोलीस, पत्रकार इत्यादी मंडळी विचारात पडली. त्यांनी काही पुरावे-बिरावे सापडतात काय ते पाहिलं. समोरचे प्रेक्षक आणि त्यांचा लाईव्ह कार्यक्रम पाहणारे दर्शक यांना पुरावे वगैरे तपासायची गरज भासली नाही. त्यांना मज्जा आली. बस्स! करमणूक झाली. काय बेश्ट बोलतात राज ठाकरे!

ट्रंप म्हणाले की ते मेक्सिकोच्या हद्दीवर मोठ्ठी भिंत उभारणार आहेत, मेक्सिकन लोकांना अडवणार आहेत. मेक्सिकन लोक बलात्कारी आणि व्यसनी असतात असंही ट्रंप म्हणाले.

काही लोकांनी भुवया उंचावल्या. कित्येक मैल लांबीची आणि वीस तीस फूट उंचीची पोलादी भिंत उभारायची म्हणजे अब्जावधी डॉलर खर्च होणार.

जाणकारांनी लॅपटॉप उघडून खर्च किती येईल वगैरेची आकडेमोड केली. आणि बलात्कार, व्यसनाधीनांच्या वर्णाची, देशांची चौकशी केली. ते बुचकळ्यात पडले.

ट्रंप खुश्शाल होते. भाषणातली त्यांची मुद्रा इतकी ठाम होती की जणू त्यांच्यासमोरच भिंत उभीही राहू लागली होती आणि भिंतीपलीकडे मेक्सिकन लोकांचे ताटकळून पुतळेच झाले होते.

फोटो स्रोत, PAUL J. RICHARDS/AFP/GETTY IMAGES

राज ठाकरे यांनी निवडणुका तोंडावर आल्यावर जाहीर सभा घेतल्या. त्या सभांचं लाईव्ह दर्शन मराठी वाहिन्यांनी घडवलं. बहुतेक सर्व वाहिन्यांनी संपूर्ण भाषण दाखवलं.

त्यात राज ठाकरे यांची ब्लू प्रिंट लोकांनी पडद्यावर पाहिली. सगळं कसं देखणं. त्या सभेची पोस्टर्स आणि बॅनर राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या देखण्या छबींसह मुंबईभर झळकले.

राज ठाकरेंचा पक्ष नुकताच स्थापन झालेला. सभा आणि प्रसिद्धीचा थाट असा होता की महाराष्ट्रातली तमाम जनता त्यांना विधानसभेत बहुमतच देणार आहे. सभेतल्या प्रेक्षकांची आणि खुद्द राज ठाकरे यांची तशी खात्रीच झाल्यासारखं टीव्हीवरून वाटलं.

खूप गाजावाजा झाला, ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये बहुमत मिळालं नाही. तरीही नाशिकमधली त्यांची सभा मस्त पार पडली.

उद्यानं, संग्रहालयं, स्मारकं, रंगरंगोटी, गोदावरीचा कायापालट अशा योजना त्यांनी देखण्या दृश्यांसह मांडल्या. त्यांच्या काकांच्या थाटात 'माझ्या हातात राज्य द्या, पाहा मी सारं कसं बदलून टाकतो' असं ते म्हणाले.

टाटा, महिंद्रा L&T, GVK या कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीचा उपयोग करून काही कामं त्यांनी केली, त्याची जाहिरात केली. बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा इत्यादी माणसांना आपण सागितलं आणि त्यांनी केलं हे अशा थाटात सांगितलं की आपली काय ताकद आहे ते लोकांनी ओळखावं.

लोक कशाला कशाची चौकशी करतायत. त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांना मजा आली. नाशिकची थोडी रंगरंगोटी झाली, पण नाशिक होतं तसंच राहिलं.

ट्रंप किंवा ठाकरे यांना काहीही करण्यापेक्षा गप्पा करून चमकत राहाण्यातच जास्त रस आहे, असं आता राजकीय विश्लेषक म्हणू लागलेत.

ट्रंप यांना राष्ट्राध्यक्ष होऊन दीडेक वर्षं झालं. त्यांच्याकडे कोणी गंभीर माणूस टिकत नाही. ते अध्यक्ष होण्याआधी अमेरिकेनं जे जे केलंय ते ते मोडून टाकायचा चंगच त्यांनी बांधलाय.

पर्यावरणाच्या क्योटो करारातून बाहेर पडले. इराणबरोबरचा अणुकरार त्यांनी सोडून दिला. युरोपीय देश आणि कॅनडा यांच्यातून येणाऱ्या मालावर त्यांनी जकात लावला. NATO करार मोडण्याच्या बेतात ते आहेत. FBI ही व्यवस्था भ्रष्ट झाली असून ती मोडायचा त्यांचा विचार आहे. हे सारं ते का करत आहेत या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही.

फोटो स्रोत, Getty Images

ट्रंप यांना खरं म्हणजे सत्ताही नको होती. सत्ता, सार्वजनिक संस्था सांभाळणं हा त्यांचा पिंडच नाही. रिअॅलिटी शोमधल्या पात्राप्रमाणे आपली प्रतिमा लोकांसमोर सतत उजळत रहावी एवढंच त्याना हवं होतं, अध्यक्ष झाले हे एक लचांडच त्यांच्या अंगावर आलंय.

राज ठाकरे यांना सत्ता हवीय. सत्ता काय करू शकते ते त्यांना कळतं. राजकारण त्यानी जवळून पाहिलंय. ट्रॅक्टर चालवणारा जीन्समधला शेतकरी ही त्यांच्या डोक्यातली शेतकऱ्याची आणि शेतीची प्रतिमा आहे. बस येवढंच.

अशा माणसांची सवय जगाला नाहीये. ट्रंप सत्ताधारी झालेत, आता त्यांच्याशी कसं जुळवून घ्यायचं ते जगाला शिकावं लागेल. कारण अशी माणसं सत्तेत येऊ शकतात हे वास्तव आहे. राज ठाकरे सत्तेत जाऊ शकत नाहीत असं दिसतंय.

(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)