#5मोठ्याबातम्या : जनावरं चोरीप्रकरणी जमावाकडून दोघांची ठेचून हत्या

म्हैस

फोटो स्रोत, Getty Images

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. जनावरं चोरीप्रकरणी जमावाकडून दोघांची ठेचून हत्या

झारखंडच्या एका गावातून जनावरं चोरून पळ काढणाऱ्या पाच जणांपैकी दोन जणांचा जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गोडा जिल्ह्यातल्या देवबंद आणि सुंदर पहारी या भागाच्या सीमेवरील बनकट्टी गावात ही घटना घडली.

DIG अखिलेश कुमार झा यांनी या प्रकरणात चार लोकांना अटक केल्याची माहिती दिली.

गोड्डाचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन सिंग म्हणाले की, पाच जणांच्या टोळीनं 12 म्हशी चोरून तिथून पळ काढला. पण नजीकच्या बनकट्टा गावातल्या लोकांना संशय आला. मोठा जमाव जमला. त्यांनी टोळीला मारहाण करण्यास सुरूवात केली.

पाच पैकी तीन जणांनी तिथून पळ काढला. तर दोन जण जमावाच्या तावडीत सापडले. मुतुर्झा अन्सारी आणि चरकू अन्सारी या दोघांची ठेचून हत्या करण्यात आली.

जमावाच्या मारहणीत मृत्यू झालेल्या दोघांवर यापूर्वीही म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा पोलिसांनी सांगितलं.

2. आणीबाणीतील मिसाबंदीना 10 हजार पेन्शन

आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या (मिसाबंदी) व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

याबाबत धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

बैठकीतल्या निर्णयानुसार आणीबाणीत एक महिन्यापेक्षा जास्त कारवास भोगलेल्यांना दहा हजार रुपये पेन्शन, तर त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन दिलं जाईल.

तसंच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात पत्नीस अडीच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय झाला आहे.

3. मोदींच्या व्हीडिओवर राहुल हसले

काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंजच्या व्हीडिओबद्दल विचारण्यात आलं असता ते 'ये कितना अजीब है' म्हणत खळाळून हसल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

इफ्तार पार्टीमध्ये मोदी यांच्या व्हीडिओचा उल्लेख झाल्यावर राहुल त्यावर उत्तर देत हसले. त्यानंतर तिथं हास्यकल्लोळ उडाला. त्यांच्या या वक्तव्यानंतर दिनेश त्रिवेदी आणि सीताराम येचुरी विनोदात सहभागी झाले.

तर दिव्य भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादेत माँ ट्रस्टतर्फे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होत्या.

या इफ्तार पार्टीत 300हून जास्त रोजेदार उपस्थित होते. जशोदाबेन यांनी स्वतः आपल्या हातानं काहींचे रोजे सोडवले.

4. फटांगडे मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक

भीमा कोरेगाव हिंसाचारादरम्यान झालेल्या राहुल फटांगडेच्या मृत्यूप्रकरणी एका संशयिताला पुण्यातील चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त सकाळनं दिलं आहे.

राहुल फटांगडे मृत्यू प्रकरणात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चार संशयितांची छायाचित्रं जारी केली होती. या प्रकरणी श्रीगोंदा इथून याआधीच तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी ताब्यात घेतलेला संशियत हा दौंडच्या भीमनगर इथला रहिवासी आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या टेंभुर्णीतून त्याला अटक करून CIDच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

5. शाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू कांबळे यांचं दीर्घ आजारानं नाशिक इथं निधन झालं. ते 39 वर्षांचे होते.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, शंतनू हे मुळचे सांगलीतल्या तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळ्यात ते राहत होते. आजारपणानंतर ते नाशिकला स्थायिक झाले होते.

2005मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. रायपूरमध्ये आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यांना 100 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र तपासाअंती कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)