ललिताचा झाला ललित : ‘लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर घेतला मोकळा श्वास’

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
कॉन्स्टेबल ललिता साळवे शस्त्रक्रियेपूर्वी आणि ललित साळवे याचं शस्त्रक्रियेनंतर गावात स्वागत झालं तेव्हा

फोटो स्रोत, Lalit Salve

फोटो कॅप्शन,

कॉन्स्टेबल ललिता साळवे शस्त्रक्रियेपूर्वी आणि ललित साळवे याचं शस्त्रक्रियेनंतर गावात स्वागत झालं तेव्हा

"जगावं की मरावं असा विचार मनात यायचा. खूप भयानक काळ होता तो. घुसमट खूप झाली. प्रचंड, भयानक संघर्षातून मी बाहेर आलोय. माझा लढा सफल झाला असं वाटलं."

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यामुळं झालेली घुसमट ललित अशी शब्दांत मांडतो. 25 मे रोजी तो मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रियेला सामोरं गेला होता.

"गुदमरलेला श्वास मी स्वतः अनुभवला आहे. ऑपरेशननंतर मी शुद्धीवर आलो आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतला," असं ललित सांगतो, ज्याची आधी ललिता साळवे ही ओळख होती.

'ललिता'पासून 'ललित'पर्यंतचा त्याचा हा प्रवास महाराष्ट्र पोलीस खात्यासाठीही ऐतिहासिक ठरला आहे. कारण लिंगबदल शस्त्रक्रियेनंतरही पोलिस खात्यातली त्याची नोकरी कायम ठेवण्यात आली आहे.

त्यामुळेच जेव्हा ललित बुधवारी बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातल्या राजेगावात आपल्या घरी परतला, तेव्हा त्याचं मोठ्या प्रेमानं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

"हे सगळं बघून मला फार आनंद झाला. लोकांचं प्रेम पाहून डोळ्यांत पाणी आलं," असं गावच्या लोकांसोबत भेटीगाठी सुरू असतानाच वेळ काढून ललित सांगतो.

महाराष्ट्रातल्या, शहरापासून दूरच्या भागातील एका गावातील लोकांनी दाखवलेला हा विचारांचा खुलेपणा थक्क करणारा आहे. आणि त्यासाठी ललितनं केलेला संघर्षही विचार करायला लावणारा आहे.

ललिता ते ललित

तो वाढला एक मुलगी म्हणूनच, ललिता म्हणूनच. लहानपणापासून ललिताला आपल्या शरीरात काहीतरी गडबड आहे, असं वाटायचं. पण नेमकी काय समस्या आहे हे स्पष्ट व्हायला बरीच वर्ष गेली.

फोटो स्रोत, Lalit Salve

फोटो कॅप्शन,

लहानपणीची ललिता

ललिताचं बालपण अतिशय कष्टात गेलं. तिचे आईवडील शेतमजुरी करायचे. मामाकडे राहून ललितानं शिक्षण पूर्ण केलं आणि विसाव्या वर्षी कॉन्स्टेबल म्हणून ती पोलीस खात्यात रुजू झाली.

आयुष्यात एका नव्या सुरुवातीकडे उमेदीनं ती पाहात होती, पण तीन-चार वर्षांत चित्र बदललं.

जननेंद्रियाजवळ काही गाठीसारखं जाणवल्यानं ललिता डॉक्टरांकडे गेली होती आणि ती स्त्री नसून पुरुष असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. तिच्या शरीरात पुरुष हार्मोन्स असल्याचं स्पष्टही झालं.

डॉक्टरांचं निदान आणि शस्त्रक्रियेविषयी ऐकून ललिताही संभ्रमात पडली होती.

फोटो स्रोत, Lalit Salve

फोटो कॅप्शन,

"मी माझं सगळं आयुष्य मुलगी म्हणूनच जगले होते."

बीबीसीला याआधी दिलेल्या मुलाखतीत ललितानं आपली व्यथा मांडली होती. "मी माझं सगळं आयुष्य मुलगी म्हणूनच जगले होते. जग मला मुलगी म्हणून ओळखत होतं आणि अचानक मला मुलगा बनण्याचा सल्ला देण्यात आला. मला काही समजतच नव्हतं."

पण तिची तगमग पाहून घरचे कुटुंबीय तिच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले.

व्यवस्थेशी लढा

काही तपासण्या करण्यासाठी ललिताला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. पण तिला त्या वेळेस सुट्टी मिळू शकली नाही.

फोटो स्रोत, Lalit Salve

फोटो कॅप्शन,

बुधवारी ललित बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातल्या राजेगावात आपल्या घरी परतला

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी कुणी सुट्टी मागितली तर काय करायचं हे तिच्या वरिष्ठांना ठरवता येत नव्हतं. पोलीस खात्यासमोर याआधी कधीच असा प्रश्न उभा राहिला नव्हता. तसंच ललिताची भर्ती महिला पोलिसांत झाली होती, शस्त्रक्रियेनंतर तिला कुठल्या विभागात ठेवायचं, हाही एक प्रश्न समोर होता.

ऑपरेशनसाठी नोकरी सोडणं ललिताला शक्य नव्हतं. तिनं मुंबई हाय कोर्टात धाव घेतली. पण हा प्रशासकीय सेवेसंदर्भातला प्रश्न असल्यानं मुंबई हायकोर्टानं ती जबाबदारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे सोपवली.

दरम्यान, ललिताच्या संघर्षाविषयी बातम्या मीडियात प्रसारीत झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आणि गृहखात्याला संवेदनशीलतेनं विचार करण्यास सांगितलं. तसंच नियमांत अपवाद करून ललिताला सेवेत कायम ठेवण्याचा सल्लाही दिला.

फोटो स्रोत, Lalit Salve

मग गृहखात्यानं ललिताला सुट्टी मंजूर केली. परवानगी मिळाल्यावर ललिता 25 मे रोजी शस्त्रक्रियेला सामोरी गेली आणि ललित ही नवी ओळख धारण करूनच हॉस्पिटलमधून बाहेर पडली.

अजून उपचार बाकी

ललितवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही लिंगबदल शस्त्रक्रिया नाही तर genital reconstruction surgery आहे, असं ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. रजत कपूर स्पष्ट करतात. तसंच ललितला Gender Dysphoria (म्हणजे आपल्या लैंगिकतेविषयी अस्वस्थता) झालेला नाही, असंही ते सांगतात.

"Gender Dysphoria मध्ये एखाद्या पुरुषाला स्त्री व्हावंसं किंवा स्त्रीला पुरुष व्हावंसं वाटत असतं. पण ललितच्या बाबतीत समस्या वेगळी होती. त्याच्या गुप्तांगांच्या बाह्यभागाचा पूर्णपणे विकास झालेला नसल्यानं ते स्त्रीच्या इंद्रियासारखं वाटत होतं. त्यामुळंच ती मुलगी असल्याचा समज झाला आणि मुलगी म्हणूनच तिला वाढवण्यात आलं."

फोटो स्रोत, Lalit Salve

फोटो कॅप्शन,

घरी परतल्यानंतर कुटुंबियांसह ललित

ललितला पुढच्या दीड वर्षात आणखी काही शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागणार आहे, अशी माहिती डॉक्टर कपूर देतात.

"दुसऱ्या टप्प्यानंतर बाह्य गुप्तांगाच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होईल. मग दाढी आणि मिशा उगवण्यासाठी त्याला उपचार घ्यावे लागतील."

आतापर्यंत ललितनं दाखवलेल्या मानसिक धैर्याचंही डॉ. कपूर कौतुक करतात.

नवी वाट

शस्त्रक्रियेनंतर ललित आता नव्या आत्मविश्वासानं करियरलाही सामोरं जाण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या आजवरच्या वाटचालीत साथ देणाऱ्यांचे त्यानं आभार मानले आहेत.

"मला असेही लोक भेटले ज्यांनी मला त्रास दिला. पण असेच लोक जास्त भेटले ज्यांनी भरपूर पाठिंबा दिला. माझ्या भावना, माझं दुःख अनेकांनी जाणलं आणि माझ्या पाठीशी उभे राहिले," लिलत सांगतो.

"मी सर्वांचा आभारी आहे. माझा दबलेला आवाज मीडियानं उठवला आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला. मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली, पोलीस महासंचालकांपासून पोलिस खात्यातल्या सर्वांनीच माझा सहानुभूतीनं विचार केला. त्या सर्वांचा मी आभारी आहे."

आपल्याला जे सहन करावं लागलं, तसं दुसऱ्यांच्या बाबतीत होऊ नये, असं ललितला मनापासून वाटतं. तो सर्वांना आवाहनं करतो, "माझ्यासारख्या ललिता ज्या असतील त्यांना त्रास देऊ नका. त्यांना मदत करा. त्यांच्या भावना समजून घ्या."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)