काश्मीर : शुजात बुखारी यांची अडचण नेमकी होती कोणाला?

शुजात बुखारी Image copyright FACEBOOK/SHUJAAT.BUKHARI

काश्मीर एक असा वाद आहे की ज्यामध्ये नेहमी भल्या माणसांचाच बळी गेला आहे.

डॉ. एस. शुजात बुखारी एक स्वाभिमानी काश्मिरी होते. आपली भाषा आणि संस्कृती यांचा त्यांना अभिमान होतो. काश्मीरमधील हिंसाचार आणि निदर्शनं यामध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे, याचं ते समर्थन करायचे. त्यांच्या या खुल्या विचारांनीच त्यांचा बळी घेतला.

काश्मीरमध्ये स्थानिक माध्यमं बळकट आहेत. खरं तर हाच एक आशेचा किरण आहे. जुन्या श्रीनगरच्या न्यूजस्टँडवर तुम्हाला स्थानिक भाषेतील आणि इंग्रजीमधील किमान 10 वृत्तपत्र पाहायला मिळतील.

शुजात बुखारी यांचं वृत्तपत्र रायझिंग काश्मीर हा उर्जा आणि संपादकीयमधील शक्ती यासाठी ओळखला जात होता.

शुजात यांनी तरुण आणि प्रतिभासंपन्न टीम उभी केली होती. आपल्या टीममध्ये महिलाही आहेत, यांचा त्यांना अभिमान होता.

त्यांनी एक सशक्त, जिज्ञासू आणि निःपक्ष प्रेसचा दृष्टिकोन समोर ठेवला. ते फक्त सरकारलाच नाही तर विभाजनवाद्यांना ही जबाबदार धरत.

काश्मीरची सखोल माहिती

यापूर्वी शुजात बुखारी भारतातील प्रमुख वृत्तपत्र 'द हिंदू'चे प्रतिनिधी होते. भारतात भूमिका निर्माण करण्यात महत्त्वाचं काम करणाऱ्या वृत्तपत्रांपर्यंत काश्मिरची भूमिका पोहोचवण्याचं काम ते चोखपणे करत होते.

शुजात शांत, हसतमुख आणि उदारमतवादी होते. त्यांच्यात मित्र बनवण्याचं मोठं कसब होतं. शिवाय त्यांच्याकडे माहितीचा खजिना होता.

Image copyright FACEBOOK/SHUJAAT.BUKHARI
प्रतिमा मथळा शुजात बुखारी

जर तुम्हाला काश्मीरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर शुजात एक अशी व्यक्ती होती जे तुम्हाला काश्मीरबद्दल रचलेल्या गोष्टी न सांगता सत्याच्या खोलापर्यंत नेत.

त्यांचा संपर्क मोठा होता आणि बाहेरच्या जगात काश्मीरबद्दल काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असत.

त्यांच्या कार्यालयात बोलवलं होतं

एक वर्षांपूर्वी मी श्रीनगरमध्ये होतो तेव्हा त्यांनी त्यांचा एक मोबाईल मला दिला होता. याचा ते वापर करत नव्हते. काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय नंबर काम करत नव्हता. काश्मीर एक अशी जागा आहे जिथं विनासंपर्क राहणं नक्कीच तुम्हाला योग्य वाटणार नाही.

मला त्यांचं कार्यालय पाहायचं होतं. त्यांनी माझ्या भेटीचं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चेच नियोजन केलं होतं.

'रायझिंग काश्मीर'च्या कार्यालयात जात असताना पाऊस आल्यानं मला थोडा उशीर झाला. तेव्हा शुजातचा फोन आला. त्यांनी विचारलं, "अँडी तू कुठं आहेस, आम्ही तुझी कधीपासून वाट पाहतोय. आमच्याकडे तुझ्यासाठी काश्मिरी चहा आणि काश्मिरी पेस्ट्रीज आहेत."

Image copyright FACEBOOK/SHUJAAT.BUKHARI

काश्मिरी पाहुणाचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे शुजात होते. शुजात आणि त्यांच्या टीमसोबत मी 1 तास चर्चा केली. जगातील पत्रकारिता, डिजिटलचा उदय, बातमी लिहिण्याची शैली, आक्रमक लिहितानाही संतुलन कसं ठेवावं, यावर आम्ही चर्चा केली. 70 वर्षांपासून सुरू असलेल्या काश्मीरच्या संघर्षाकडे जगभरातील माध्यमांचं कसं दुर्लक्ष झालं आहे यावरही आम्ही बोललो.

काश्मीरला त्यांची गरज होती

शुजात यांच्याशी माझी ओळख लंडनमध्ये एका बैठकीत झाली होती. संघर्षविराम आणि सीमांबद्दल अनौपचारिक चर्चांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ही बैठक होती. शुजात यांचं भाषण ऐकण्यासारखं होतं.

लिस्बन इथं जगभरातील संपादकांच्या परिषदेत मी त्यांचे ट्वीट फॉलो केले होते. मला असं वाटतं होतं की काश्मीर जगापासून तुटू नये, उलट नव्या विचारांसाठी खुलं असावं.

Image copyright FAIZAN ALTAF

शुजात फार धाडसी होते. काश्मीरच्या पत्रकारांना तसं असावं लागतं.

काश्मीरमध्ये त्यांच्या जीवाला धोका होता, म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. नुकतेच ते एक गंभीर आजारातून बरेही झाले होते.

शुजात बुद्धिमान, धैर्यवान आणि आत्मविश्वासाने भरलेले होते. काश्मीरमध्ये गंभीर होत चाललेल्या राजकीय पेचातून वाट काढण्यासाठी अशा व्यक्तींची गरज होती.

रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांची हत्या करण्यात आली. काश्मीरमधील संघर्ष कमी व्हावा आणि चर्चेतून मार्ग निघावा, यासाठी काही हाचचाल दिसत असताना त्यांची हत्या झाली.

इफ्तारच्या आधी ते त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडून गाडीत बसणार होते तोवर दोन मोटरसायकल चालकांनी त्यांना गोळी मारली. त्यांच्यासह त्यांचे 2 सुरक्षारक्षकही मारले गेले.

हा एक नियोजनबद्ध हल्ला होता. काश्मीरमध्ये पूर्वीही पत्रकारांवर असे हल्ले झाले आहेत. पण परिस्थिती मात्र बदलेली नाही.

त्यांचा परिवार, सहकर्मचारी, त्यांचे मित्र आणि काश्मीरबद्दल मला फार दुःख वाटते.

हे वाचलं का?

(लेखक अँड्र्यू व्हाईटहेड यांनी भारतात बीबीसीचे प्रतिनिधी म्हणून बरीच वर्षं काम केलं आहे. काश्मीरवर पत्रकारितेचा त्यांना 25 वर्षांचा अनुभव आहे. रायजिंग काश्मीर वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी त्यांचे मित्र होते.)