'रमजान ईदच्या दिवशीही मला टोपी घालून फिरायची भीती वाटते'

रिजवान Image copyright BBC/Nilesh Dhotre

गेल्या वर्षी रमजानच्या दरम्यान जुनैद खान या तरुणाची दिल्लीच्या लोकल ट्रेनमध्ये जमावानं हत्या केली होती. एक वर्षानंतर जुनैदच्या घरी ईदच्या दिवशी काय वातावरण आहे?

मोठ्या शहरांना लागून असलेल्या गावांची जी स्थिती असते तशीच स्थिती खांडवली गावाची आहे. दिल्लीपासून साधारण ४५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. हो! हे तेच गाव आहे ज्या गावातल्या जुनैद खान नावाच्या १६ वर्षांच्या तरुणाची जमावानं गेल्या वर्षी जूनमध्ये हत्या केली होती.

दिल्ली-मथुरा लोकल ट्रेनमध्ये जागेवरून भांडण सुरू झालं आणि त्याचं पर्यवसान मारमारीत झालं. गाडीतल्या जमावानं जुनैद आणि त्याच्या दोन भावांना साकीर आणि हासीम यांना गोमांस खाणारे आणि देशद्रोही म्हणत मारहाण केली. ज्यात गंभीर जखमी झालेल्या जुनैदचा मृत्यू झाला होता.

यंदा ईदच्या दिवशी त्याच्या कुटुंबाची काय स्थिती आहे, ते कशा प्रकारे ईद साजरी करत आहे ते पाहण्यासाठी आम्ही खांडवली गाव गाठलं.

अस्वच्छता आणि चिंचोळे रस्ते

दिल्लीच्या जवळ असल्यानं या गावातल्या जमिनींना सोन्याचा भाव आलेला होता. अनेकांनी जमिनी विकून मोठी घरं तर बांधली आहेत, पण सुधारणांच्या नावानं गावात काहीच नाही.

मोठी बंगलेवजा पक्की घरं आहेत, पण गटारांची व्यवस्था नाही. पेव्हर ब्लॉकचे रस्ते आहेत, पण या रस्त्यांवर सांडपाणीच जास्त आहे. ईदचा सण असूनही गावात स्वच्छता नव्हती.

हे गाव तसं संपूर्ण मुस्लीम लोकवस्तीचं आहे, तरी गावात काही दलितांची घरं सुद्धा आहेत.

वाट काढत मी जुनैदच्या घरी पोहोचलो. गावाच्या मधोमध त्यांचं घर आहे. तिथं पोहोचताच महाराष्ट्रातल्या वाशिम, परभणी, जालना यांपैकी कुठल्यातरी एका शहरातल्या मुस्लीम वस्तीत आल्याचा भास झाला.

घरात शिरताच जुनैदच्या वडिलांनी स्वागत केलं. पण त्याच्या घरात कुठलंही ईदचं वातावरण नव्हतं.

म्हणून टोपी घालणं बंद केलं

जुनैदची आई सायरा यांना ईदबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी रडायला सुरुवात केली. ईद आहे पण आपण आज काहीच बनवलं नसल्याचं त्या सांगू लागल्या.

प्रतिमा मथळा जुनैदची आई सायरा

मग नातेवाईकांकडे जाणार आहात का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'नाही' असं उत्तर देत गेल्या वर्षभरात गावाच्या बाहेर पाऊल ठेवलं नसल्याचं सांगितलं.

चर्चा करताना कळलं की, कुटुंबातल्या इतर लोकांनीही फारसं बाहेर फिरणं बंद केलंय.

"मी बाहेर फिरणं बंद केलंय. गेल्या एक वर्षात कुठेच बाहेर गेलो नाही, मुस्लीम टोपी किंवा कुर्ता-पायजमा घालणं बंद केलं आहे," जुनैदचा मोठा भाऊ साकीर खान सांगू लागला. घटना घडली तेव्हा साकीरलासुद्धा मारहाण झाली होती.

तो पुढे सांगतो, "आजकाल तर मी मशिदीत जातानासुद्धा टोपी घालत नाही, रुमाल बांधून नमाज पडतो. मशिदीतून बाहेर येताच रुमाल डोक्यावरून काढून टाकतो लगेच."

कुटुंबातले पुरुष आता जास्त करून शर्ट-पँटच घालतात. शुक्रवारी फक्त टोपी आणि कुर्ता पायजमा घालतात. बाहेर कुठेही फिरताना आपण मुस्लीम असल्याचं दिसून येईल असं काही घालण्याचं टाळतात.

प्रतिमा मथळा जुनैदचा मोठा भाऊ साकीर खान

बाहेर जाणं का बंद केलं आहे असं विचारलं तर, "भीती वाटते. मारेकरी जामिनावर सुटले आहेत, बाहेर गेल्यावर काहीपण होईल असं सतत वाटतं," असं त्यांनी सांगितलं.

ईदचा सण होता पण त्यांच्या घरातल्या कुणीच नवे कपडे घातले नव्हते, खरेदीही केले नाहीत, असं त्यानं सांगितलं. गेल्या वर्षी ईदची शॉपिंग करून परतत असतानाच जुनैद आणि त्यांच्या भावावर हा हल्ला झाला होता.

'सर्वच हिंदू वाईट नाहीत'

गेल्या वर्षीची घटना अजून डोक्यातून जात नसल्याचं जुनैदच्या घरात दिसत होतंच. पण मनात नेमक्या काय भावना आहेत, असं विचारल्यावर भाऊ साकीर म्हणाला, "सर्वच हिंदू काही वाईट नसतात." बाजूच्याच गावातले त्यांचे हिंदू मित्र त्यांच्या घरी सकाळी ईदसाठी येऊन गेल्याचं त्यानं सांगितलं.

वर्षभरात काय काय बदलं असं विचारल्यावर १०वी पर्यंत शिक्षण झालेल्या साकीरच्या चेहऱ्यावर आणखी टेन्शन आलं, तो आणखी गंभीर झाला.

घरातले कर्ते पुरुष बाहेर जात नसल्यानं कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावल्याचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. सर्वांत मोठ्या भावाचा घराजवळच ढाबा आहे. त्याच्यावरच सध्या संपूर्ण कुटुंबाची भिस्त आहे.

साकीर पूर्णवेळ घरीच असतो. मौलवी बनण्यासाठी सुरतमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या हासीम यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून आता गावातल्याच एका मशिदीममध्ये नमाज पढवण्याचं काम सुरू केलं आहे. त्यातून त्यांना महिन्याला ८००० रुपये मिळतात.

"मशिदीतून परत येण्यासाठी पाच मिनिटं जरी उशीर झाला तरी आई लगेच फोन करते. आईवडील अजिबात बाहेर जाऊ देत नाहीत" हासीम सांगू लागले. हल्ला झाला तेव्हा तेसुद्धा जुनैद बरोबरच होते.

कोर्टाच्या आदेशानंतर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक पोलीस कॉन्स्टेबल नेमण्यात आला आहे. कुठेही बाहेर जायचं असल्यास पोलिसाला बरोबर घेऊन जावं लागतं.

गावातल्या तरुणांमध्ये भीती

कुटुबांची भेट झाल्यानंतर मी हासीमबरोबर गावात फेरफटका मारण्यासाठी निघालो.

या गावात एका गोष्टीचा मी सतत अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती कुठेही दिसत नव्हती. ती म्हणजे सामिष जेवणाचा सुगंध. ईदच्या दिवशी कुठल्याही मुस्लीम वस्तीत बिर्याणी आणि सामिष जेवणाचा येणारा सुगंध किंवा कुठल्याशा घराबाहेर चूल पेटवून शिजायला घातलेलं मटण आणि इतर पदार्थ. असं कुठलंही चित्र या गावात नव्हतं.

ईदचा सण असूनही गावात तशी शांतताच होती. नाही म्हणायला काही लहानसहान मुलं मात्र नवीन कपडे घालून फिरत होती.

गावातल्या एका मशिदीबाहेर तरुणांचा एक ग्रुप दिसला. त्यांना घडलेल्या घटनेनंतर काय बदल झाला असं विचारलं तर त्यांनीसुद्धा आम्ही आजकाल टोपी घालणं बंद केल्याचं सांगितलं.

बस स्टॉपवर पोहोचल्यावर रिजवान नावाचा सुशिक्षित तरुण भेटला. त्यानं वाढत्या 'फेकन्यूज' बद्दल चिंता व्यक्त केली.

"कॉलेजमधली मुलं फेकन्यूजचा आधार घेऊन वाईटसाईट बोलतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. मला माहिती असतं की हे खोटं आहे, पण त्यांना कोण समजावणार," रिजवान सांगत होता.

रिजवानचं बी.कॉम.पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे. त्याला आता एमबीए करायचं आहे. शिक्षणातूनच सुधारणा होईल असं त्याला वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)