'हा कसला जिहाद?' मृत जवान औरंगजेब यांच्या वडिलांचा सवाल

औरंगजेब Image copyright BBC/MAJID JAHANGIR

तुम्हालासुद्धा माझ्या मुलाबद्दल सहानुभूती वाटते का? औरंगजेब यांची 50 वर्षांची आई विचारत होती.

"तशी सहानुभूती वाटणं शक्यच नाही, कारण मला जी सहानुभूती आणि धक्का बसला आहे तितका कुणालाच बसला नाही. आईसारखं जगात कोणी नसतं. त्याच्यासारखी शूरवीर मुलं असेच जन्माला येत नाही, पण तो माझं जग सुनंसुनं करून गेला," औरंगजेब यांच्या आई राज बेगम बोलत होत्या.

काश्मीरमधल्या मेंडर, सीरा सैलानी गावात जेव्हा मी रात्री उशिरा औरंगजेबच्या घरी पोहोचलो तेव्हा संपूर्ण घर शोकसागरात बुडालं होतं. महिला आणि पुरूष वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून औरंगजेबच्या आठवणी काढत होते.

औरंगजेबचं गाव सीमेपासून अगदी जवळ आहे. श्रीनगर आणि मेंडर या शहरांमध्ये 200 किमीचं अंतर आहे.

त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता. राज बेगम आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण काश्मीरवर असलेला राग व्यक्त करतात.

त्या म्हणतात, "माझा संपूर्ण काश्मीरवर राग आहे कारण त्यांनी या लुटारुंना इथं ठेवलं आहे."

Image copyright BBC/Majid Jahangir
प्रतिमा मथळा औरंगजेब यांच्या घरातील शोकमग्न महिला.

"बिजली गिरे उस कश्मीर पर, गोली लगे उस कश्मीर को, मेरा बच्चा मारा गया," राज बेगम उद्विग्न होऊन सांगत होत्या.

आपल्याच काश्मिरींनी मारलं

राज बेगम रडत म्हणाल्या, "कोणताही मुस्लीम मुस्लिमांना मारून स्वतंत्र होत नाही. माझा औरंगजेब निरपराध आणि निरागस होता. माझ्या मुलाला गाडीत घेऊन गेले आणि मारून टाकलं."

मुलाला गमावल्यावर राज बेगम यांच्या दोन इच्छा आहेत. त्या म्हणतात, "एकदा त्या ड्रायव्हरचा चेहरा बघायचा आहे ज्याने माझ्या मुलाला जंगलात नेऊन सोडलं आणि मारून टाकलं. दुसरं म्हणजे त्या जागेवर जायचं आहे जिथं माझ्या मुलाला मारून टाकलं."

"दु:ख या गोष्टीचं आहे की काश्मिरी लोकांनीच माझ्या मुलाला मारून टाकलं. माझं विश्व अगदी उद्धवस्त करून टाकलं."

Image copyright BBC/Majid Jahangir
प्रतिमा मथळा औरंगजेबची बहीण ताबीना

"तो माणूस एकदा जर मला भेटला तर मी त्याला सांगणार आहे की त्याला काही हवंच होतं तर मला मागायचं. माझ्या मुलाकडे तेव्हा काहीही शस्त्रं नव्हतं. अशा नि:शस्त्र व्यक्तीला मारणं म्हणजे स्वातंत्र्य नाही."

राज बेगम त्या दिवसाची आठवण काढत सांगतात, औरंगजेब यांनी घरी येणार असल्याचं त्यांना कळवलं होतं.

"माझा मुलगा येणार म्हणून मी खूश होते, संध्याकाळी चारपर्यंत त्याचा फोन आला नाही म्हणून फोन केला तर फोन बंद होता."

मागच्या गुरुवारी औरंगजेब यांचं दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामाच्या कलमपोरातून अपहरण झालं होतं. अपहरण झाल्यावर काही तासांतच त्यांचा मृतदेह 10 किलोमीटरच्या अंतरावर सापडला होता.

हा जिहाद असेल तर आम्ही तयार आहोत

दुसऱ्या दिवशी काही जहालवादी औरंगजेब यांचा छळ करत असल्याचा व्हीडिओ समोर आला.

औरंगजेब काही वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांचा आणखी एक भाऊ सैन्यातच आहे.

औरंगजेब यांची बहीण ताबीना सांगतात, "ज्या दिवशी घरात दादाचा मृतदेह आणला त्या दिवशी डोक्यात विचार आला की मी जर त्याच्या जागी मेले असते तर बरं झालं असतं."

यापुढे त्या फारसं बोलू शकल्या नाहीत आणि त्यांना अश्रू अनावर झाले. थोड्यावेळानं त्यांनी स्वत:ला सावरलं.

त्या म्हणतात, "जे हाल माझ्या भावाचे झाले त्यांचेसुद्धा तसेच हाल होवोत."

Image copyright BBC/Majid Jahangir
प्रतिमा मथळा औरंगजेब यांचे वडील मोहम्मद शरीफ.

औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ 55 वर्षांचे आहेत. ते म्हणतात की मारेकरी खरा मुसलमान असता आणि त्यानं जिहाद केला असता तर त्याच्याबरोबर जिहाद करण्यासाठी ते तयार आहेत. पण एक मुस्लीम दुसऱ्या मुस्लिमाला मारत नाही. लपून हल्ला करणं हे भित्रेपणाचं लक्षण आहे.

ते पुढे म्हणतात, "कुराणात लिहिलं आहे, मुस्लिमांनी मुस्लिमांना मारणं हा कोणता जिहाद आहे? एक मुलाला मारणं कोणता जिहाद आहे? ते असं का करत आहेत?"

मोहम्मद हानीफ सांगतात की "माझं काय होतंय हे मला आणि माझ्या अल्लाहला माहिती आहे. न्याय मिळाला नाही तर मी गळफास घेईन."

"मला न्याय हवा आहे" अशी मागणी ते पुढे करतात.

ते म्हणतात, "मला वाटतं की महबुबा मुफ्ती आणि शेख साहेब यांनी मला लवकरात लवकर न्याय द्यावा. मी मोदींना 72 तासांची मुदत दिली आहे. 72 तासाच्या आत जर निर्णय झाला नाही तर मी त्यांच्या घरी जाऊन गळफास लावून घेईन आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला लटकवून देईन."

"मला सांगा माझ्या मुलानं काय चूक केली आहे. जर त्यानं काही चूक केली असेल तर मला फोन करून बोलवायचं होतं, मग समोरासमोर बोललो असतो," ते पुढे म्हणाले.

ते पुढे सांगतात, "मी मीडियाच्या समोर येऊन सांगितलं की त्याला मारू नका त्यानं रोजे ठेवले आहेत. पण त्या लोकांनी काहीही ऐकलं नाही."

Image copyright BBC/Majid Jahangir
प्रतिमा मथळा औरंगजेब यांचे मामा मोहम्मद शरीफ.

औरंगजेब यांच्याशी शेवटचं बोलणं झालं त्या प्रसंगाची ते आठवण काढत ते म्हणतात, "ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी त्यांना फोन आला आणि तो सांगू लागला की मी इथून निघालो आहे."

"थोड्याच वेळात तो गाडी थांबवा, गाडी थांबवा म्हणून ओरडायला लागला. 12 मिनिटं असाच आवाज येत होता. पण गाडी थांबली नाही."

गरिबीमुळे सैन्यात दाखल

ते पुढे सांगतात, "जेव्हा एक सैनिक सुट्टीवर येतो तेव्हा खूप आनंद होतो. तुम्हाला माहिती आहे की सैन्याची नोकरी ही कैदैसारखी असते. कोणीही आनंदानं मरत नाही."

"आम्ही गरीब लोक आहेत. औरंगजेब याच गरिबीशी लढत होता. पहिले पोट पूजा आणि मग देशाची पूजा. जर पोटात काही नसेल तर देशाची सेवा कोण करेल?" ते प्रश्न विचारतात.

"महबूबा मुफ्ती, शेख साहेब आणि पंतप्रधान जे करतात ते फक्त स्वत:साठी करतात, गरिबांसाठी काहीच करत नाहीत."

"एक महिना शस्त्रसंधी होती, असं का?" असा सवाल औरंगजेब यांचे मामा मोहम्मद शरीफ करतात.

ईदसाठी संपूर्ण कुटुंब औरंगजेब यांची वाट पहात होतं. पण ईदचा दिवस असा जाईल असा विचार कोणीही केला नव्हता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)