जम्मू काश्मीरमध्ये राजकीय संकट - पाहा दिवसभरात काय काय घडलं

पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकारे मेहबुबा मुफ्ती सरकारची मदत करण्याचा प्रयत्न केला, असं राम माधव म्हणाले. Image copyright EPA
प्रतिमा मथळा पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकारे मेहबुबा मुफ्ती सरकारची मदत करण्याचा प्रयत्न केला, असं राम माधव म्हणाले.

भाजपनं पाठिंबा काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये राज्यपालांचं शासन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा दिवसभरात काय काय घडलं?


संध्याकाळी 6.45 : 'राज्यपालांच्या राजवटीतही नुकसान होत राहणार'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप-PDP युती संधीसाधू होती, असं म्हणत त्यांच्यामुळेच जम्मू काश्मीरमधली शांतता भंगली, असं म्हटलं आहे.

"अनेक हिंसक प्रकरणांमध्ये निरपराधांचे जीव गेले, यात आपल्या जवानांचाही समावेश आहे. डावपेचात्मक दृष्ट्याही देश म्हणून आपलं नुकसान झालं. UPA सरकारने या राज्यासाठी, तिथल्या जनतेसाठी केलेलं काम वाया गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास जम्मू काश्मीरवासीयांचं होणारं नुकसान वाढतच जाईल. अव्यवहार्य, गर्विष्ठ आणि द्वेषामूलक विचारांच्या पदरी अपयशच पडतं," असं ते म्हणाले.


संध्याकाळी 6.40 : 'सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय'

स्थानिक नेते, जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन जम्मू काश्मीर भाजपने देशहितासाठी हा निर्णय घेतला आहे. भाजप यापुढेही जे काही देशहिताचं असेल, तोच निर्णय घेईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.


संध्याकाळी 5.01 - मेहबुबा मुफ्ती यांची पत्रकार परिषद

- भाजपनं पाठिंबा काढल्यानंतर मी राजीनामा दिला आहे

- खूप विचारपूर्वक आम्ही ही युती केली होती. राज्यातल्या लोकांचं हित लक्षात घेऊनच हा निर्णय झाला होता.

- लोकांमध्ये कलम 370 वरून भीती. त्यात कुठलाही बदल नको

- जम्मू-काश्मीर शत्रू राज्य नाही

- हे पाऊल आमच्यासाठी धक्कादायक अजिबात नाही

- आम्ही दुसरी कुठलीही युती किंवा आघाडी करणार नाही

- आम्ही सत्तेसाठी युती नव्हती केलीसंध्यकाळी 5 - गृहमंत्र्यांच्या घरी बैठक

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, गृह सचिव तसंच जम्मू काश्मीरचे सहसचिव आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.


दुपारी 4.45 - उद्धव ठाकरेंची टीका

"जम्मू काश्मीरचं सरकार नालायक आहे हे कळायला तीन वर्षं आणि 600 सैनिकांचे बळी का जावे लागतात?" असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सेनेच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत ठाकरे बोलत होते.

"PDPशी युती तोडली, म्हणून मी भाजपचं अभिनंदन करतो, आता तुम्ही पाकिस्तानला चिरडून टाका तर तुम्हाला डोक्यावर घेऊ," असं ठाकरे म्हणाले.


दुपारी 4.20 - राज्यपाल शासन लावा - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लावण्याची मागणी नॅशनल काँफरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली. तसंच त्यांच्या पक्षाकडून सरकार स्थापन करण्याच्या सर्व शक्यता त्यांनी फेटाळल्या. राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्या, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली.


दुपारी 3.45 - ओमर अब्दुल्ला राज्यपालांच्या भेटीला

नॅशनल काँन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे विरोधी पक्षनेते ओमर अब्दुल्ला हे श्रीनगरमध्ये राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.


दुपारी 3.22 - PDP ची तातडीची बैठक

PDP नं दुपारी 4 वाजता तातडीनं पक्षानं बैठक बोलावली आहे. यामध्ये कारणांचा आढावा घेतला जाईल, असं पक्ष प्रवक्ते राफी अहमद मीर यांनी सांगितलं आहे.


दुपारी 3.18 - काँग्रेसची टीका

काश्मीरमध्ये भाजप विफल ठरल्याचं काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद म्हणाले.

"जे घडलं ते चांगलं घडलं. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या सरकारच्या सव्वा तीन वर्षांच्या कार्यकाळात सर्वांत जास्त जवान मारले गेले आहेत," असं आझाद म्हणाले.

PDP बरोबर युती करून सरकार स्थापन करण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे.


दुपारी 3.15 - मेहबुबा मुफ्ती यांचा राजीनामा

मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिल्याची माहिती PDPचे नेते नईम अख्तर यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितलं आहे. संध्याकाळी 5 वाजता अधिक माहिती देऊ, असंही ते म्हणाले.


दुपारी 3.05 - हा काही आश्चर्यकारक निर्णय नाही - PDP

भाजपनं काढलेले पाठिंबा हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचं PDPचे नेते राफी अहमद मीर यांनी म्हटलंय. "ही आघाडी टिकावी यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केले, पण ती टिकू शकली नाही. भाजपनं पाठिंबा काढण्याचे संकेत सुद्धा दिले नव्हते," असं ते म्हणाले.


दुपारी 2.30 - युती देशविरोधीच होती - शिवसेना

भाजप आणि PDPची ही युती देशविरोधी आणि अनैसर्गिक होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. ही युती टिकणार नाही, असं उद्धव ठाकरे आधीच म्हणाल्याची त्यांनी आठवण करून दिली आहे.


दुपारी 2.15 - भाजपनं पाठिंबा काढला

भाजपचे प्रवक्ते राम माधव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मेहबुबा मुफ्ती यांच्या Peoples Democratic Party बरोबरची युती मोडत असल्याचं जाहीर केलं.

जम्मू काश्मीर विधानसभेत 87 जागा आहेत. त्यात PDP चे 28 आमदार आहेत. भाजपचे 25 आमदार आहेत. तर 12 जागांसकट काँग्रेस चौथ्या स्थानावर आहे. बहुमतासाठी 44 जागांची गरज आहे.

"गेल्या काही दिवसांत ज्या घटना झाल्या त्यावर सगळी माहिती घेतल्यावर आम्ही पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा सल्ला घेतला. त्यातून आम्ही असा निर्णय घेतला की आता ही युती पुढे जाऊ शकणार नाही," असं माधव म्हणाले.

"आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो. मोदींनी सहकार्य केलं. 80 कोटींचं विकास पॅकेज दिलं. अनेक प्रकारच्या विकास कामात मदत केली आहे. लडाखमध्ये मोदींनी भेट दिली आहे. राज्याची सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी गृह मंत्र्यांनी दौरा केला. सीमेपार पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे भारत सरकारने शक्य ती सगळी मदत दिली आहे. आम्ही सरकारमध्ये होतो, पण ज्यांच्याकडे नेतृत्व होते ते परिस्थिती सांभाळण्यात अयशस्वी झाले आहेत," असं राम माधव म्हणाले.

"मागच्या तीन वर्षांत आम्ही भाजपकडून चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या तिन्ही भागात विकासाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज जी परिस्थिती आहे त्यानुसार हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कट्टरवादही वाढत आहे. नागरिकांचे नैतिक अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे," ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)