#5मोठ्याबातम्या : बाल हक्क आयोगाची राहुल गांधींना नोटीस

राहुल गांधी

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/Getty Images

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. बाल हक्क आयोगाची राहुल गांधीना नोटीस

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातल्या अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण करण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगानं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, जळगाव जिल्ह्यातल्या वाकडी इथं मुलांना विहिरीत पोहल्यामुळे नग्न करुन मारहाण करण्यात आली होती.

या घटनेचा व्हीडिओ राहुल गांधींनी ट्वीटरवर पोस्ट केला होता. या व्हीडिओतून अल्पवयीन मुलांची ओळख उघड झाल्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झालं असल्याची तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली होती.

बाल न्याय अधिनियम कायद्यातील 'कलम 74' नुसार कुठल्याही पीडित बालकाची ओळख पटूर नये यासाठीची तरतुद आहे. राहुल गांधी यांनी पीडित मुलांचा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकल्यानं या कायद्याचा भंग झाला असल्याचं यात म्हटलं आहे.

2. इंग्लंडचा वन-डेत सर्वाधिक रन्सचा विक्रम

इंग्लंडनं पुरुषांच्या वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नावावर केल्याचं वृत्त सकाळनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Twitter/@ICC

मंगळवारी नॉटिंगहॅम इथं झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत इंग्लंडनं अलेक्स हेल्स आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शतकांच्या बळावर 481 धावांचा डोंगर उभारला.

याआधीचा विक्रमही इंग्लंडच्याच नावावर होता. दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध त्यांनी 444 धावा केल्या होत्या.

कालच्या मॅचममध्ये बेअरस्टोनं 15 फोर आणि 5 सिक्सच्या साह्यानं 139 धावा केल्या. हेल्सनं 92 बॉलमध्ये 147 तर जेसन रॉयनं 61 बॉल्समध्ये 82 धावा केल्या.

बेअरस्टो-रॉय जोडीनं पहिल्या विकेटसाठी 159 धावांची तर हेल्स-बेअरस्टो जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाचा अँड्यू टाय सगळ्यांत महागडा गोलंदाज ठरला. त्यानं 9 षटकात 100 धावा दिल्या.

3. गायीमुळेच जमावाने त्याचा खून केला?

द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातल्या हापूडमधल्या पिलखुवा इथं उसाच्या शेतात कासीम (45) यांना जमावानं मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर 65 वर्षीय समीउद्दीन हे गंभीर जखमी झाले.

फोटो स्रोत, Getty Images

जनावर विक्रेते कासीम यांच्या मृत्यूला गायच कारणीभूत असल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. त्यामुळेच जमावानं त्यांना मारले असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण पोलीस मात्र हा रस्ते अपघात असल्याचं सांगितलं आहे. पण, पीडिताच्या भावानं दिलेली तक्रार मात्र पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.

हापूडचे पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी हे प्रकरण जर जनावरांच्या तस्करीशी किंवा कत्तलिशी संबधित असल्याचा आरोप होत असेल तर त्यादृष्टीनंही तपास करू असं सांगितलं आहे.

4. तामिळनाडूची अनुकृती यंदाची 'मिस इंडिया'

तामिळनाडूची अनुकृती वास यंदाची 'फेमिना मिस इंडिया २०१८' ठरली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Twitter/@feminamissindia

फोटो कॅप्शन,

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं अनुकृतीला 'मिस इंडिया' चा मुकुट घातला.

हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी उपविजेती ठरली आहे. स्पर्धेतल्या २९ स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीनं हा किताब पटकावला.

'मिस इंडिया' ठरलेली अनुकृती वास ही एक खेळाडू आणि नृत्यांगना आहे. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुकृती फ्रेंच भाषेत बीए करत आहे.

अनुकृतीला भविष्यात सुपर मॉडल व्हायचं आहे. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं अनुकृतीला 'मिस इंडिया'चा मुकूट घातला.

5. शिपाई ललित साळवे रिपोर्टिंग सर!

लिंगबदलाची पहिली शस्त्रक्रिया केल्यानंतर ललिताचा ललित झालेले ललित साळवे हे मंगळवारी ललितकुमार म्हणून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले.

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, ललिता 2010मध्ये महिला पोलीस म्हणून खात्यात रुजू झाली.

फोटो स्रोत, Lalit Salve

फोटो कॅप्शन,

कॉन्स्टेबल ललिता साळवे शस्त्रक्रियेपूर्वी आणि ललित साळवे याचं शस्त्रक्रियेनंतर गावात स्वागत झालं तेव्हा.

शरीरातील बदलांमुळे त्यांना आपण पुरुष असल्याचं जाणवल्यानंतर त्यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करवून घेतली. ललित साळवे गावाकडे परतल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांचं स्वागत केलं.

पोलीस खात्यात आता त्यांच्या नावाची नोंद ललितकुमार साळवे अशी करण्यात येणार असल्याची माहिती माजलगावचे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)