Miss India 2018 अनुकृती वास : 'रूढी परंपरांच्या कैदेतून बाहेर पडा आणि यशस्वी व्हा'

अनुकृती वास

फोटो स्रोत, Twitter / @anukreethy_vas

फोटो कॅप्शन,

अनुकृती वास

अनुकृती वास या तामिळनाडूच्या ब्युटीने आपल्या ब्रेनच्या जोरावर फेमिना मिस इंडिया 2018 स्पर्धेचा मुकुट पटकावला आहे. 29 स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने हा मान पटकावला. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी उपविजेती ठरली आहे.

मंगळवारी रात्री मुंबईत एका प्रतिष्ठित सोहळ्यात 'मिस वर्ल्ड 2017' मानुषी छिल्लरने अनुकृतीला 'मिस इंडिया'चा मुकुट घातला. मानुषी हिच्याशिवाय अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेता बॉबी देओल, कुणाल कपूर, फॅशन डिझायनर गौरव गुप्ता, क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि इरफान पठाण तसंच पत्रकार फाये डिसूझा यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं.

तर अभिनेत्री माधुरी दीक्षित, करीना कपूर, जॅकलिन फर्नांडिस यांच्या धमाकेदार डान्स परफॉ़र्मन्सनी या सोहळ्याची रंगत वाढवली. दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराना यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

फोटो स्रोत, Twitter/Miss India

कोण आहे अनुकृती?

19 वर्षांची अनुकृती वास मूळ तामिळनाडूची असून ती एक खेळाडू आणि नृत्यांगनाही आहे. बॉलिवुड नाईटमध्ये तिने माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स केला होता.

आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुकृती फ्रेंच भाषेत B.A. करत आहे. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमध्ये ती दुसऱ्या वर्षाला आहे. पुढे तिला सुपर मॉडल व्हायचं आहे.

आपल्या एका व्हीडिओमध्ये ती सांगते, "मी तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये लहानाची मोठी झाली जिथे अजूनही मुलींचं आयुष्य बंदिस्त आहे. इथे संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर पडू शकत नाही. मी अशा वातावरणाच्या पूर्ण विरोधात आहे. मला ही साचेबद्ध विचारसरणी मोडून काढायची आहे. म्हणूनच मी मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला."

"आता मी इथपर्यंत पोहोचल्यानंतर हे सांगू इच्छिते, की तुम्ही सुद्धा आता या रूढी परंपरांच्या कैदेतून बाहेर पडा आणि तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करा," ती म्हणाली.

फोटो स्रोत, Twitter/Miss India

फोटो कॅप्शन,

'मिस वर्ल्ड २०१७' मानुषी छिल्लर अनुकृतीला 'मिस इंडिया' चा मुकुट घालताना

अनुकृती सांगते की तिची इमेज टॉम बॉय मुलीसारखी आहे, जिला बाईक चालवण्याची क्रेझ आहे. नुकतंच 'पॉप डायरीज' नावाच्या एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुकृतीने या बाईकप्रेमाचा उल्लेख केला आहे.

सोनम कपूर, कायली करदाशियान आणि रणवीर सिंग तिला खूप आवडतात, असंही तिने यावेळी सांगितलं होतं.

अनुकृती सांगते, "मला आजवर कधीच जग फिरण्याची किंवा बघण्याची संधी मिळाली नाही. पण आता जर संधी मिळाली तर तुम्हाला मी घरी दिसणारच नाही. कारण मला फिरायला आणि अॅडव्हेंचर करायला आवडतं."

"मी एक अॅथलीट आहे, आणि माझे मित्र मला सांगतात की पॅराग्लाइडिंग हा सगळ्यांत थरारक अनुभव आहे. मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच हिमाचल प्रदेशात जाऊन पॅराग्लाइडिंग करेन. मी असं ऐकलं आहे की पॅरा ग्लाइडिंग करण्यासाठी ते जागातलं सर्वांत सुंदर ठिकाण आहे," ती सांगते.

हेही वाचलंत का?

नक्की पाहा :

व्हीडिओ कॅप्शन,

वर्णभेद असल्याचं सांगतेय गडद रंगावरून टोमणे सहन करणारी आफ्रिकन मॉडल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)