ग्राऊंड रिपोर्ट : गाय, मुस्लीम आणि हल्ला करणाऱ्या जमावाचे सत्य

हापुडा

इथल्या मातीला लागलेल्या डागांमुळे कुणाचंतरी रक्त वाहिल्याचं स्पष्टपणे लक्षात येतं. जमावानं आणखी एका माणसाची हत्या केली, मृत व्यक्ती मुस्लीम आहे हेही तितकंच स्पष्ट आहे आणि गायीचं असणं किंवा नसणं या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातल्या हापुड जिल्ह्यातल्या मदापूर गावातली आहे. तिथं राहणाऱ्या मोहम्मद कासिम यांची गाय चोरल्याच्या कारणावरून हत्या झाली आहे. FIR मध्ये हा मृत्यू रस्त्यावर झालेल्या भांडणांमुळे झाल्याची नोंद आहे.

जमावानं 60 वर्षांच्या समीउद्दीन यांनासुद्धा मारहाण केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

ही घटना राजधानी दिल्लीपासून 65 किमी अंतरावर घडली आहे.

गाय चरण्यावरून जुनं भांडण

मोहम्मद वकील हे शेती आणि पशुपालन करणाऱ्या समीउद्दीन यांचे पुतणे आहे. ते सांगतात, "काका त्या दिवशी आपल्या शेतातून चारा आणायला गेले होते कासिम कुठूनतरी येत होते. कासिम काकांना ओळखत होते म्हणून त्यांच्याशी बोलण्यासाठी शेतात आले."

जवळच असलेल्या राजपूतबहुल बझैडा खुर्द गावातले लोक गाय चरवण्यासाठी तिथं जातात. मदापूर मुस्तफाबाद हे मुस्लीम बहुल गाव आहे. तिथं राहणाऱ्यांच्या मते गायी चरण्यासाठी त्यांना मुद्दाम तिथं पिटाळलं जातं.

दुसऱ्या बाजुला मदापूर मुस्तफाबादच्या लोकांच्या मते त्यांच्यावर गाय आणि वासरांना कापून खाण्याचा आरोप लावला जातो.

"शेतकऱ्याच्या शेताचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा तो त्यांना हाकलणार की नाही? या लोकांनी असं सांगितलं की त्यांच्या जनावरांना आम्ही आमच्या शेतात बांधून ठेवलं आहे," समीउद्दीन यांचे भाऊ उद्वेगानं सांगत होते.

समीउद्दीन यांच्या पुतण्याच्या मते समीउद्दीन यांची म्हैस तिथं होती आणि त्यांच्याबरोबर गुरांचा व्यापार करणारे कासिमसुद्धा होते.

जवळच्याच शेतात आणखी दोन लोक काम करत होते. पण जेव्हा त्यांनी बझैडा खुर्दच्या जवळून जमावाला येताना पाहिलं तेव्हा ते घाबरून पळाले. पण कासिम आणि समीउद्दीन त्यांच्या हाती लागले.

लाल रंगाची तुटलेली चप्पल

मुस्लीमबहुल मदापूर आणि राजपुतांचं बझैडा खुर्द ही गावं जवळजवळ आहेत. गावात मंदिर, मशीद, दुकानं, शेतीवाडी सगळं जवळजवळच आहेत.

प्रतिमा मथळा रुग्णालयात दाखल असेलेले समीउद्दीन.

मोहम्मद वकील आम्हाला समीउद्दीन यांच्या शेतात घेऊन गेले. तिथंच त्यांच्या काकांना आणि कासिम यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. ज्यात 45 वर्षीय कासिम यांचा मृत्यू झाला.

शीसव आणि जांभळाच्या झाडांच्या मध्ये एका शेतातल्या मातीत रक्ताचे डाग अजूनही स्पष्ट दिसतात. त्याचबरोबर बंद तुटलेली एक लाल रंगाची चप्पल सुद्धा दिसते. कदाचित पळण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा पाय दबल्यामुळे ती चप्पल तुटली असावी.

ही चप्पल कासिम यांची आहे की समीउद्दीन यांची आहे याबाबत कल्पना नाही.

पोलिसांनी बझैडा गावातल्या दोन लोकांना हत्या, खुनाच्या उद्देशानं केलेला हल्ला, हत्यारांसह दंगल (भारतीय दंड संहिता 302,307, 147,148) या आरोपांखाली अटक केली आहे. दोघंही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

म्हैस खरेदी करायला निघाले होते

पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांच्यामते "हे दोघंही जमावाला भडकावणारे होते."

बझैडा खुर्द आणि मदापूर मुस्तफाबाद पासून दूर पिलखुआ शहरातल्या सिद्दीकीपुरा भागात कासिम यांचं एक घर आहे. दोन मजली घरात त्यांची एक खोली आहे.

प्रतिमा मथळा हापुडचे पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा.

जिथं सांत्वन व्यक्त करायला येणाऱ्या लोकांची रिघ लागली आहे. जे लोक येतात त्यांना समोरच्या घरात खुर्चीवर बसवलं जात आहे.

गुरांच्या खरेदी-विक्रीचा व्यापार करणाऱ्या कासिम यांचे भाऊ मोहम्मद सांगतात की त्यांना कोणाचा तरी फोन आला की "तुमच्या भावाला मारून 100 नंबरच्या जिप्सीत ठेवलं आहे." जेव्हा नदीम रुग्णालयात ते पोहोचले तेव्हा कासिम यांचा मृत्यू झाला होता.

कासिम यांच्या भावानं सांगितलं की ते 60-70 हजार घेऊन घरातून निघाले होते. त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की त्या किंमतीत त्यांना चांगली म्हैस मिळेल. त्यानंतर लोकांनी त्यांना घेरून मारून टाकलं.

प्रतिमा मथळा बझैडा खुर्द येथील मंदिर.

शवविच्छेदनानंतर कासिम यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना रात्री 2.30 वाजता सोपवण्यात आला. मंगळवारी सकाळी त्यांना दफनविधी झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते त्यांना FIR दाखल करू दिली नाही.

मोहम्मद सलीम यांच्यामते, "पोलीस म्हणत आहे की एका खटल्यात दोन गुन्हे दाखल करता येणार नाही."

कासिम यांचे भाऊ मोहम्मद सलीम म्हणतात, "पोलिसांनी मला मुख्य साक्षीदार करण्याचं आश्वासन दिलं आहे."

प्रतिमा मथळा कासिम यांची कबर.

त्याचवेळी जर समीउद्दीन आणि दुसऱ्या पक्षानं तडजोड केली तर आम्ही मधल्यामध्ये अडकून पडू अशी सलीम यांना शंका आहे. पोलिसांकडे सुद्धा त्यांनी ती व्यक्त केली आहे.

18 जूनला या घटनेची FIR यासिन नावाच्या एका व्यक्तीनं दाखल केली आहे. ही FIR अज्ञात व्यक्तींच्या विरोधात दाखल हे.

बझैडाच्या बाजूनं येणाऱ्या एका मोटरसायकलस्वारानं त्यांचे भाऊ समीउद्दीन यांना टक्कर मारली आणि त्यांचा भावानं विरोध केल्यावर 25-30 लोक तिथं जमा झाले आणि त्यांनी समीउद्दीन आणि कासिम यांना लाठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

Image copyright AMAR UJALA

19 जूनच्या अमर उजाला वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर या घटनेची बातमी छापून आली आहे. वर्तमानपत्रात गाय आणि वासराचं छायाचित्र आहे.

वर्तमानपत्रानं त्यांना "घटनास्थळावरून जप्त केलेलं गोवंश" असं सांगितलं आहे. या फोटोत पोलीस दिसत आहे. वर्तमानपत्रानं लिहिलं आहे की, "घटनास्थळावरून दोन गायी आणि एक वासरू जप्त झालं आहे."

गाय आणि हत्यारं मिळाली नाहीत

सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यात गंभीर जखमी असलेल्या कासिम यांना काही लोकांनी घेरल्याचं दिसत आहे. त्यात "दोन मिनिटं उशीरा पोहोचला असतात तर कापलेली गाय मिळाली असती, तीन गायी खुंट्याला बांधून ठेवल्या आहेत," अशा प्रकारची चर्चा होताना दिसत आहे.

प्रतिमा मथळा कासिम

स्वत:ला बझैडा गावातले राहिवासी म्हणवणारे राम कुमार कश्यप सांगतात, "काही स्त्रिया चारा घ्यायला शेतात गेल्या होत्या. त्यांनी येऊन सांगितलं की चार माणसं गायींना घेऊन जात आहेत. इथून काही लोक गेले तर त्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पण, दोन लोक पळून गेले आणि दोन लोकांना घेरलं."

पण पोलिसांच्या मते त्यांना घटनास्थळावरून गाय मिळाली नाही किंवा गायींची कत्तल करण्याचं हत्यार मिळालं नाही.

व्यवसायानं ड्रायव्हर असलेले मोहम्मद यासिन आपल्या जखमी भावाला घेऊन हापुडच्या एका रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत.

प्रतिमा मथळा समीउद्दीन यांचे भाऊ मोहम्मद यासिन.

जेव्हा FIR दाखल करणाऱ्या मोहम्मद यासिन यांना विचारलं की गावातले लोक हिंदू, मुस्लीम दोन्ही लोक सांगतात की ही घटना गायीमुळे झाली आहे.

पण FIR मध्ये गायीचा उल्लेख नाही आणि रस्त्यावरील भांडणाचा उल्लेख आहे, असं कसं झालं? याचं उत्तर देताना ते म्हणाले, "मी तर उशिरा आलो होतो. गावात आणि पोलीस ठाण्यातही. जसं जसं लोक बोलत गेले तसं तसं लिहिलं गेलं आणि त्यावर माझी सही झाली."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)