#5मोठ्याबातम्या : भाजपचं काश्मीरमधून इंग्रजांप्रमाणेच पलायन - शिवसेना

शिवसेना आणि भाजप Image copyright Getty Images

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. 'भाजपचे काश्मीरमधून इंग्रजांप्रमाणेच पलायन'

नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचंही एक कारण सांगितलं गेलं. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावानं बोटं का मोडत आहात? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

काश्मिरात दहशतवाद वाढला, पाकड्यांची घुसखोरी आणि हल्ले वाढले. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढलं. हे सर्व रोखणे आणि राज्य करणं कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीनं देश सोडला होता. काश्मीर वाचविण्यासाठी कोणती योजना मोदी आणि त्यांच्या भक्तांकडे आहे? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

2. DSKcase: 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या 'एमडी'सह ६ अटकेत

पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता यांच्यासह चार जणांना आज अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना अधिकारांचा गैरवापर करून नियमबाह्य कर्ज दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटक केलेल्यांमध्ये डीएसकेंच्या सीए आणि अभियंत्याचाही समावेश आहे.

Image copyright DSKGROUP.CO.IN

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, रवींद्र मराठे, गुप्ता यांच्यासह डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता विभागातील अधिकारी राजीव नेवासेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं पुण्यातून, बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांना जयपूरमधून आणि बँकेचे अधिकारी नित्यानंद देशपांडे यांना अहमदाबादमधून अटक केली आहे.

या सर्वांनी अधिकारांचा गैरवापर करून डीएसकेंना बेकायदेशीररित्या कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. या सर्वांच्या चौकशीतून आणखी काही बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.

3. 'नरेंद्र मोदी विवाहित; ते माझ्यासाठी प्रभू रामच'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी लग्न केलं असून ते माझ्यासाठी प्रभू रामच आहेत, असं जशोदाबेन यांनी म्हटलं आहे.

Image copyright DEEPA/EPA

लोकसत्तानं दिेलेल्या बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याचं विधान मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलं होतं.

त्यावर, जशोदाबेन यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली आहे. हा व्हीडिओ त्यांचाच असल्याचं जशोदाबेन यांचे बंधू अशोक यांनी स्पष्ट केलं आहे.

आनंदीबेन यांचं विधान अशोभनीय आहे. त्यांच्या विधानामुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, असंही जशोदाबेन म्हणाल्या आहेत.

4. नव्या पनामा पेपर्समध्ये दोन भारतीय उद्योजकांची नावं?

पनामातल्या करकायदेविषयक सल्लागार कंपनी मोझॅक फोनसेका यांच्या काही ई-मेलमधून पूर्वी नोंदणी झालेल्या काही कंपन्यांच्या प्रत्यक्ष लाभधारक मालकांची नावं उघड झाली आहेत.

त्यात भारतातील केविन भारती मित्तल आणि जलज अश्विन दाणी यांची नावं पुढे आली आहेत.

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या सविस्तर बातमीनुसार, डिसेंबर 2008मध्ये मोझॅक फोनसेकानं ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील केबीएम ग्लोबल लिमिटेड या कंपनीची नोंदणी केली होती.

त्यात थेट लाभार्थी म्हणून केविन यांचं नाव पुढे आलं आहे. तर, केविन यांच्या प्रवक्त्यानं या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जलज दाणी यांनीही त्यांची कोणतीही गुंतवणूक बेकायदा नसल्याचं म्हटलं आहे.

5. 'पासपोर्ट हवा तर धर्म बदला....'

तन्वी सेठ आणि अनस सिद्दकी या दांपत्यानं लखनऊमध्ये केलेल्या पासपोर्ट अर्जावर कार्यवाही न करता सिद्दकी यांना पासपोर्ट नुतनीकृत करायचा असेल तर धर्म बदलून हिंदू व्हा, असा सल्ला विकास मिश्रा यांनी दिला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, तन्वी सेठ यांनी या प्रकरणाची तक्रार ट्विटरवरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.

विभागीय पासपोर्ट अधिकारी पियुष वर्मा यांनी, असा प्रकार घडल्याचं मान्य केलं. तसंच, त्या दांपत्याला गोमतीनगर कार्यालयात बोलावलं असून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : 'मल्लखांब म्हणजे योगा ऑन पोल'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)